Home शिक्षण फिजिओथेरपी प्रवेशाचा मार्ग मोकळा; गुरुकृपासह ६ कॉलेजांना हायकोर्टाचा दिलासा

फिजिओथेरपी प्रवेशाचा मार्ग मोकळा; गुरुकृपासह ६ कॉलेजांना हायकोर्टाचा दिलासा

0
18
बीड — राज्यातील फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या महाविद्यालयांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. माजलगाव येथील ‘गुरुकृपा’ शिक्षण समूहाच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गुरुकृपासह याचिका दाखल केलेल्या अन्य पाच महाविद्यालयांची नावे तात्काळ प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फिजिओथेरपी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचे पर्याय पुन्हा उपलब्ध झाले आहेत.

फिजिओथेरपी अभ्यासक्रमातील महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आणि मान्यतेसंदर्भात केंद्रीय पातळीवर नियमांमध्ये बदल करण्यात आला. या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल ८० फिजिओथेरपी महाविद्यालयांची नावे प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आली होती. सीईटी सेलच्या या निर्णयामुळे संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरही अडचण निर्माण झाली होती.

यापूर्वी फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या मंजुरीसह प्रवेश क्षमतेचे नियमन राज्य परिषदेकडून केले जात होते. मात्र फिजिओथेरपीची केंद्रीय परिषद अस्तित्वात आल्यानंतर देशभर प्रवेश क्षमतेबाबत एकसमान व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील संबंधित महाविद्यालयांकडून ५० किंवा १०० प्रवेश क्षमतेबाबत माहिती मागवली होती.
महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिल्यानंतरही सीईटी सेलने राज्यातील ८० महाविद्यालयांची नावे प्रवेश प्रक्रियेतून वगळली. याच निर्णयाला माजलगावच्या ‘गुरुकृपा’ फिजिओथेरपी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.
महाविद्यालयाला यापूर्वी राज्य परिषद तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता असल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
या याचिकेवर न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने गुरुकृपा फिजिओथेरपी महाविद्यालयासह याचिका दाखल केलेल्या अन्य पाच महाविद्यालयांची नावे प्रवेश प्रक्रियेत तात्काळ समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.
या आदेशामुळे आता गुरुकृपासह संबंधित सहा महाविद्यालयांमध्ये फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिजिओथेरपीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here