Home जिल्हा अविवेकी’ जिल्हा प्रशासन, शेतकऱ्यांवर “कांवत” राहणारी पोलीस, राज्य कायद्याचे का पवनचक्कीच्या गुंडांचे?

अविवेकी’ जिल्हा प्रशासन, शेतकऱ्यांवर “कांवत” राहणारी पोलीस, राज्य कायद्याचे का पवनचक्कीच्या गुंडांचे?

0
11

पोलिसांच्या धमक्या ; दोन शेतकऱ्यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

बीड — ऊसतोड कामगारांचा, आत्महत्याग्रस्त    शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून गौरव असलेल्या बीडमध्ये “विवेक” विसरून शेतकऱ्यांसारखा “किटाणू” मारण्यासाठी “जॉन्सन” सोप चा वापर करत पवनचक्क्या कंपन्यांनाची हूजरेगिरी करतांना जिल्हाधिकाऱ्यांच्या महसूल विभागाने लाज लज्जाच सोडली. शेतकऱ्यावरच काव(ण्या)त पटाईत असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा ढोल वाजवणाऱ्या पोलीसी खाक्याची “नव नीत” कहानी आज पुन्हा  पाहायला मिळाली. पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांना साथ देत शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शेतकऱ्यांना दमदाटी इतकी केली की पोलिसांसमोर दादासाहेब कदम आणि प्रदीप कदम या दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पाटोदा तालुक्यातील सौंदाना परिसरात काल संध्याकाळी घडला. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कारभाराने रझाकारीचा काळ अनुभवायला मिळू लागला आहे.

भीषण दुष्काळाच्या संकटात जिल्हा होरपळून निघत आहे. 1972 पेक्षा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना पिक पंचनामे ,दुष्काळी उपाय योजना,स्थलांतर रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना ही सगळी काम सोडून महसूल विभागातील सगळेच अधिकारी पवनचक्की कंपन्यांच्या फेकलेल्या तुकड्यापूढे गोंडा घोळताना दिसून येत आहेत. नाव जरी “विवेक” असलं म्हणून काय झालं “नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा” असा कारभार मात्र म्होरक्याचा “अ”विवेकी बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. तीच स्थिती पोलीस अधीक्षकांची आहे. संवेदनहिनतेची अनेक उदाहरणं त्यांच्या कारभाराची पाहायला मिळाली.

शेतकऱ्यावर काव(ण्या)त च ते पटाईत आहेत. कायदा सुव्यवस्थेची रोज लत्तर निघत असताना कर्तव्यदक्षतेचा ढोल नव”नीत” पद्धतीने रोज वाजवला जात आहे. आज तो ढोल पवनचक्की कंपन्यांसाठी वाजवला गेला.

सोनेगाव- सौंदाना ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पवनचक्की कंपनीचे काम सुरू आहे. शेतातून शेतकऱ्याची परवानगी न घेता रस्ता पाडणे, ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र न घेता, शेतकऱ्यांना मोबदला न देता, शेतकऱ्यांची सहमती पत्रावर सही न घेता जे एस डब्ल्यू एनर्जी पावर कंपनी व शेतकऱ्यांमधील वादाला तोंड फुटले. पवनचक्की कंपनी चे अधिकारी गुंडांना सोबत घेऊन आले. त्या गुंडांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी आला. शेतकऱ्यांना मारहाण करत दाबदडप करण्यात आली. पोलिसांच्या धमक्यांचा अनुभव यापूर्वी देखील आला आहे. चौसाळा लिंबागणेश परिसरात एका मुजोर पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला “तुझे कॅरेक्टर खराब करेल बेट्या” अशी धमकी दिली होती. पुढे हाच पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडला गेला. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेच त्यावेळी “नाक” छाटलं गेलं होतं. या ठिकाणी मात्र अशाच धमक्यांचा वापर केला गेला. परिणामी दादासाहेब सुंदरराव कदम व प्रदीप भालचंद्र कदम या दोन शेतकऱ्यांनी पोलिसांसमोर अक्षरशः विषाची बाटली तोंडातून रिकामी केली. नवनीत कावत यांची पोलीस यंत्रणा इतकी कर्तव्यदक्ष आहे की त्या शेतकऱ्यांना अडवण्याची भूमिका देखील त्यांनी घेतली नाही. शेवटी या दोन्ही शेतकऱ्यांना गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पाटोदा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून‌ अवैध धंदे सुरू असताना पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोर दिवसाढवळ्या मारामाऱ्या होत असताना तिथे मर्दुमकी दाखवण्यात कमी पडणारे पोलीस निसर्गाच्या अवकृपेने “त्राहीमाम्” करायची वेळ आलेल्या शेतकऱ्यावर दाखवू लागले आहेत.दरम्यान या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ माजली असून प्रशासनाच्या विरोधात सगळीकडे छीऽऽथूऽऽ होऊ लागली आहे. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांचा “विवेक” जागा होणार का? पोलीस यंत्रणा गुंडावर मर्दूमकी दाखवणार का? राज्य कायद्याचे आहे पवनचक्कीच्या गुंडांचे नाही हे सिद्ध होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here