Home राज्य अजित पवार अपघात: ‘मफलरवाला नेता’ कोण? रोहित पवार म्हणाले, 10 ऑक्टोबरला नाव-फोटो...

अजित पवार अपघात: ‘मफलरवाला नेता’ कोण? रोहित पवार म्हणाले, 10 ऑक्टोबरला नाव-फोटो जाहीर करणार

0
7

मुंबई —  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या एका बड्या नेत्याचा १० ऑक्टोबर रोजी पर्दाफाश करणार, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सरकार आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघाताला आठ महिने उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती दिसत नसल्याचे ते म्हणाले. या प्रकरणातील तांत्रिक आणि गुन्हेगारी तपासाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

‘मफलरवाला नेता’ कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार

रोहित पवार यांनी एका बड्या नेत्याचा उल्लेख ‘मफलरवाला नेता’ असा केला. संबंधित नेत्याने एका कार्यक्रमात डिझाइनचा मफलर परिधान केला होता, त्यामुळे आपण त्याला हे नाव देत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मफलर’च्या मागे एक चेहरा असून त्या व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल, असा दावा रोहित पवार यांनी केला.

व्हीएसआर कंपनीला आणि तिला वाचविणाऱ्या संबंधित व्यक्तीला सत्तेचा वापर करून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणते पुरावे आहेत, याचा तपशील त्यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला नाही.

अजित पवार अपघाताच्या तपासावर प्रश्न

अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात काही बाबी दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. विमानातील घडामोडी, ब्लॅक बॉक्स आणि त्याच्या तपासासंदर्भात आपण यापूर्वीही प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात एआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले. ब्लॅक बॉक्सची शहानिशा सुरू असून तो कॅनडा आणि अमेरिकेला पाठविण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘अजित पवारांना लोक विसरतील असे सरकारला वाटत असेल तर…’

अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने उलटले असले तरी हे प्रकरण विस्मरणात जाणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. ‘अजित पवार यांना लोक विसरतील, असे सरकारला वाटत असेल तर तसे होणार नाही,’ असे ते म्हणाले.

‘मोठा नेता असल्याने सुरक्षेचा सल्ला’

१० ऑक्टोबरला आपण ज्या व्यक्तीविषयी माहिती जाहीर करणार आहोत, तो मोठा नेता असल्याने काही जणांनी सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, ‘माझे लोकच माझे संरक्षण करतील,’ असे त्यांनी म्हटले.

१० ऑक्टोबरच्या सादरीकरणाच्या अनेक प्रती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आता १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार नेमका कोणता खुलासा करतात आणि ‘मफलरवाला नेता’ म्हणून कोणाचे नाव घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here