पुणे — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झालेल्या या कार्यक्रमात राहुल गांधी मंचावर येताच ‘राहुल-राहुल’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी राजकीय भाषण न करता विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याची संधी दिली. “आज मी राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही. तुम्ही काय विचार करता आणि काय करू इच्छिता, हे मला सांगा,” असे म्हणत त्यांनी संवादात्मक पद्धतीने चर्चा केली.
महिला म्हणून नव्हे, सर्वप्रथम माणूस म्हणून पाहते
महिलांवरील नियंत्रण आणि पितृसत्ताक व्यवस्थेबाबत राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी चर्चा केली. पुरुष महिलांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का करतात, असा प्रश्न त्यांनी एका विद्यार्थिनीला विचारला.
यावर संबंधित विद्यार्थिनीने आपण स्वतःकडे सर्वप्रथम एक माणूस म्हणून पाहत असल्याचे सांगितले. ‘तू एक महिला आहेस’ अशा चौकटीत आपली ओळख मर्यादित केली जाते, तेव्हा राग येतो, अशी भावनाही तिने व्यक्त केली.
महिलांच्या हक्काला ‘हिस्सेदारी’ का?
कुटुंबातील मालमत्ता आणि हक्काच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी संवाद साधला. पुरुष कुटुंबातील हिस्सा मागतो तेव्हा त्याला ‘अधिकार’ म्हटले जाते; मात्र महिला त्याच हक्काची मागणी करते तेव्हा त्याला ‘हिस्सेदारी’ म्हटले जाते, असे त्यांनी नमूद केले.
यावर एका महिलेने सांगितले की, अनेक कुटुंबांमध्ये महिलांकडून नोकरी करण्यासोबतच घरकाम, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्याचीही अपेक्षा केली जाते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ नोकरी केल्यानंतरही घरातील जबाबदाऱ्या महिलांवरच टाकल्या जात असल्याचे तिने सांगितले.
७० कोटी महिलांची स्वप्ने ही भारताची ताकद
भारताच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना केवळ सैन्य किंवा इतर शक्तींकडे पाहण्यापेक्षा देशातील महिलांच्या क्षमतेकडे पाहण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशातील ७० कोटी महिलांची स्वप्ने आणि त्यांचे विचार हीच भारताची खरी ताकद आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.
महिलांची ओळख केवळ पत्नी, मुलगी किंवा आई या नात्यांपुरती मर्यादित करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही नाती महत्त्वाची असली तरी प्रत्येक महिलेची स्वतंत्र ओळख, तिची स्वप्ने आणि तिचे विचार यांनाही तितकेच महत्त्व असले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मनुस्मृतीचा उल्लेख करत पितृसत्ताक विचारांवर टीका
राहुल गांधी यांनी यावेळी मनुस्मृतीचा संदर्भ देत महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. बालपणी वडील, तारुण्यात पती आणि वृद्धापकाळात मुलांवर महिला अवलंबून राहावी, अशा विचारसरणीचा उल्लेख करत त्यांनी अशा मानसिकतेवर टीका केली.
दरम्यान, पुण्यातील या कार्यक्रमाला पोलिसांकडून ३० अटींसह परवानगी देण्यात आली होती. विद्यार्थिनींशी झालेल्या या संवादात महिलांचे स्वातंत्र्य, समान हक्क, कुटुंबातील भूमिका आणि स्वतंत्र ओळख हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.

