बीड — विविध मागण्यांसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शेषराव वीर हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तेरा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.उपोषणाच्या तेराव्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी आणि उपोषणकर्त्याला भक्कम पाठिंबा देण्यासाठी दि.17ऑगस्ट 2026 रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘निष्क्रिय प्रशासनाच्या तेराव्याचा विधी लोकशाही मार्गाने घालण्यात आला.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंतवाडी येथे महिलांशी झोंबाझोंबी करणार्या आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा पीडितेला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या लेडीज कॉन्स्टेबल तुरुकमारे व कॉन्स्टेबल बांगर यांच्यावर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाला जबाबदार असलेले तहसीलदार चंद्रकांत शेळके व मंडळाधिकारी नाईकवाडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
याशिवाय नवगण राजुरी ता.जि.बीड येथील गणेश घुले यांचा हायवा गाडीने चिरडून घातपात केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पठाण यांचे निलंबन करून सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा,यासह अन्य मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्राण गेला तरी चालेल पण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेषराव वीर यांनी घेतल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून मागण्यांवर योग्य तो तोडगा काढावा,अन्यथा या आंदोलनाचे लोण जिल्हाभर पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, आंदोलकांचे मार्गदर्शक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,ऑल इंडिया पँथर सेनेचे राज्य प्रवक्ते नितीन सोनवणे,किष्किंदा पांचाळ,आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे,राजकुमार कदम,शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस, ज्ञानेश्वर राऊत,शिवराय फुले शाहू आंबेडकर आघाडीचे भीमराव कुटे, आपचे शहराध्यक्ष सय्यद सादेक, हनुमान घोडके,माऊली शिंदे,दत्ता सुरवसे,जयसिंग वीर,राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचे विठ्ठलराव डोळस, नारायण सावंत,रफिक पठाण, सुंदर वाघमारे,राजेश वडमारे,पप्पू धन्वे,मीठूभाऊ पवार,राधाबाई घुले यांच्यासह विविध पक्ष,संघटना व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

