मुंबई — भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे मिळाली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती झाली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या तिन्ही नियुक्त्यांमुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्राचे राजकीय आणि संघटनात्मक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पियुष गोयलांकडे पुन्हा आर्थिक जबाबदारी
पियुष गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून सध्या ते उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आता पक्षाने पुन्हा त्यांच्यावर आर्थिक व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या कुटुंबाचीही भाजपशी दीर्घकाळाची राजकीय नाळ आहे. त्यांच्या आई चंद्रकांता गोयल या भाजपच्या माजी आमदार होत्या, तर वडील वेदप्रकाश गोयल यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम केले होते.
विनोद तावडेंचे राष्ट्रीय संघटनेतील स्थान कायम
महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील अनुभवी नेते म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत चिटणीस आणि त्यानंतर सरचिटणीस म्हणून काम केलेल्या तावडे यांची आता पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या संघटनात्मक राजकारणात त्यांचे स्थान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. भारती पवारांवरही मोठी जबाबदारी
माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय चेहऱ्याला राष्ट्रीय संघटनेत स्थान मिळाल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीलाही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे
भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने राज्याचा राष्ट्रीय संघटनेतील प्रभाव अधोरेखित झाला आहे. पियुष गोयल यांच्याकडे आर्थिक व्यवस्थापन, विनोद तावडे यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी आणि डॉ. भारती पवार यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपद अशी महत्त्वाची विभागणी झाली आहे.आगामी काळात महाराष्ट्रातील संघटनात्मक विस्तार आणि निवडणूक रणनीतीसाठी भाजप या तिन्ही नेत्यांच्या अनुभवाचा कशा पद्धतीने वापर करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




