जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सरकारसमोर यापूर्वी मांडलेल्या मागण्या, त्यासंदर्भातील कायदेशीर बाबी तसेच सरकारने जारी केलेल्या एसओपीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही त्रुटी असल्यास त्या मान्य करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली.
बैठकीनंतर बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरबाबत भूमिका स्पष्ट केली. हैदराबाद गॅझेटियर, ओबीसी सवलती आणि आगामी जीआरमध्ये कोणते बदल व सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत अभ्यासकांकडून माहिती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“आतापर्यंत सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही बदल करायचे आहेत का? पुढे काढण्यात येणारे जीआर कसे असावेत? तसेच ओबीसी सवलतीबाबत काय भूमिका असावी?” असे तीन प्रमुख प्रश्न अभ्यासकांसमोर ठेवण्यात आल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका ठाम असल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आंदोलनात जीव गेला तरी चालेल, मात्र मागण्यांवरून माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अभ्यासकांनी समाजाच्या टीकेला घाबरू नये, आपण वेळ दिल्यामुळे ते बैठकीला आले आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले. आता सरकारने पुढील निर्णय घ्यायचा आहे; मात्र मराठा समाजाला जे हवे आहे, ते मिळवून राहणार, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
दरम्यान, 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकारने काढलेल्या जीआरमधील त्रुटी दूर करणे आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेणे, हे सरकारसमोरील महत्त्वाचे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

