बीड — शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच शस्त्रधारी आरोपींना महिंद्रा थारसह जेरबंद केले. पोलिसांच्या गस्ती पथकाने आरोपींचा दुचाकीवरून पाठलाग करत राष्ट्रवादी भवनाजवळ त्यांना अडवले. या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

1 सप्टेंबर रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरात प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी शेती खरेदीच्या कारणावरून तसेच पूर्वीच्या वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी एका गटाकडून दुसऱ्या गटावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सचिन आगलावे आणि बाळू रहाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे लक्षात येताच संशयितांनी वाहनातून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला.
राष्ट्रवादी भवनाजवळ थार अडवली
पाठलाग करत पोलिसांनी राष्ट्रवादी भवनाजवळ आरोपींचे वाहन अडवले. त्यानंतर इतर पोलीस अधिकारी व अंमलदारही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी थारमधील पाच आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे शस्त्रे असल्याने परिस्थिती गंभीर होती. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संशयितांना वेळीच ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाच आरोपी अटकेत
अटक केलेल्या आरोपींमध्ये बाबू उर्फ मिनिनाथ शहादेव जाधव, हनुमान शहादेव जाधव, संभाजी संतराम जाधव, यशराज रामा जाधव आणि सागर गंगाराम जाधव यांचा समावेश आहे. सर्व आरोपी वायभटवाडी, बीड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.
काळ्या रंगाची थार जप्त
पोलिसांनी गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेली महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची थार (MH 23 BS 0808) जप्त केली आहे. याशिवाय इतर वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
तपासात परिसरातील CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी नागरिकांची माहिती आणि मोबाईलवर रेकॉर्ड झालेले व्हिडिओ महत्त्वाचे पुरावे ठरण्याची शक्यता आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शीतलकुमार , सहायक पोलीस निरीक्षक सतीश, पोलीस अंमलदार सचिन, बाळू , बालाजी , रवी, अनिल , अनंत , राजेभाऊ आणि नितीन यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश करीत आहेत.

