तीव्र पाणीटंचाईची भीती; कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचीही धनंजय मुंडेंची मागणी
मुंबई — यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने तीव्र ताण दिला असून ऑगस्ट अखेर सरासरीच्या १०% सुद्धा पाऊस बीड जिल्ह्यात पडलेला नाही, परिणामी शेतकरी व सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सवलती देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
यावर्षी अवर्षणामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी यांसह सर्वच पिके ओलाव्याअभावी करपू लागली आहेत. यंदाचा खरीप हंगाम १००% हातातून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तलाव, विहिरी आदींमधील पाणी पातळी झपाट्याने खालावली असून तलाव कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे ऊसा सारख्या पिकांना पाणी मिळण्याचे तर दूरच राहिले पण पिण्याच्या पाण्याचे देखील तीव्र संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले असून, या दुष्काळ चक्रामुळे बीड जिल्ह्यात विदारक परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने महसूल व कृषी विभागाच्या वतीने सर्व महसूली मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना प्राथमिक आर्थिक मदत देण्याची विनंती केली असून, पर्जन्यमानाच्या आकडेवारी तपासून अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मिळणाऱ्या शासकीय सवलती देण्याची मागणी केली आहे.
भविष्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होणार असून या सर्वच गोष्टींचा विचार करून बीड जिल्ह्यात कृत्रिक पावसाचे प्रयोग करण्याचीही मागणी श्री मुंडे यांनी केली आहे.




