ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली १३.४८ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

केज — ऊसतोड मजूर पुरवठा करण्याच्या बहाण्याने ट्रॅक्टर मालकाची तब्बल १३ लाख ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कल्याण बापूराव मुंडे (रा.ताडसोन्ना, ता.बीड) याच्या विरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होळ (ता.केज) येथील भीमराव उत्तमराव घुगे हे ट्रॅक्टर वाहतूक व्यवसाय करतात. सन २०२४-२०२५ च्या ऊसतोड हंगामासाठी त्यांनी कर्नाटकातील बालाजी शुगर फॅक्टरी येथे ऊस वाहतुकीचा करार केला होता. त्यासाठी ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ताडसोन्ना (ता.बीड) येथील कल्याण बापूराव मुंडे याच्याशी १५ मे २०२४ रोजी बैठक झाली. या बैठकीत १६ कोयते (३२ ऊसतोड मजूर) पुरविण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार घुगे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपये रोख दिले. त्यानंतर विविध टप्प्यांत ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण १५ लाख रुपये मुंडे याला अदा केले. मात्र, करारानुसार १६ कोयत्यांऐवजी केवळ ६ कोयते (१२ मजूर) पुरविण्यात आले. हे मजूरही काही दिवसांत काम सोडून निघून गेले. उर्वरित मजूर पुरविण्याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपीने टाळाटाळ केली. अखेर जानेवारी २०२५ मध्ये पैसे परत देण्याचे आश्वासन देऊनही त्याने रक्कम परत केली नाही किंवा मजूरही उपलब्ध करून दिले नाहीत. या व्यवहारात पुरविण्यात आलेल्या मजुरांकडून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचे काम झाले असून, उर्वरित १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी भीमराव घुगे यांच्या फिर्यादीवरून कल्याण बापूराव मुंडे याच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ.अमजद सय्यद हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles