मुंबई — राज्यात बळजबरीने आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या नव्या कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंजुरी दिली. या अधिनियमाच्या मसुद्यात जबरदस्तीने धर्मांतर करून घेणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून तो मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होईल.
सक्तीने आणि आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी कडक कायदा करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. त्यानुसार हा कायदा करण्यात येत असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.देशातील काही राज्यांनी फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा जोरजबरदस्तीने केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदे केले आहेत. राज्यात जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने उपाययोजना सूचवण्यासाठी तसेच इतर राज्यातील यासंदर्भातील कायद्यांचा आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अर्धािनयम, २०२६” अस्तित्वात आणण्याच्या अनुषंगाने विधेयकाचा मसुदा राज्य सरकारला सादर केला होता.
महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार
अंबाजोगाईमध्ये दहा लाखाचा गांजा पकडला
अंबाजोगाई — तालुक्यातील धर्मापुरी शिवारात मूर्ती फाट्याजवळ पट्टीवडगाव रोडवरील एका शेतात कारवाई करून दहा लाखाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकाला पकडले आहे. ही कारवाई अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन कांदे आणि भाऊसाहेब चौधरी हे दोघे धर्मापुरी येथील भास्कर रोकडोबा फड याच्या शेतातील पत्र्याच्या खोलीत गांजा विक्री करण्यासाठी घेऊन आले होते. हा गांजा भास्कर फड याने आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मागवला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह धर्मापुरी शिवारात छापा टाकला. या ठिकाणी दोन पोत्यांमध्ये पान, फुले आणि बियांसहित दाबेलेला उग्र वासाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी यावेळी जप्त केलेल्या गांजाच्या पोत्याचे वजन 24 किलो 560 ग्रॅम आणि दुसऱ्या पोत्याचे वजन 8 किलो 800 ग्रॅम असे एकूण 33 किलो 360 ग्रॅम भरले.बाजारभावाप्रमाणे याची अंदाजे किंमत 10 लाख 800 रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी नितीन लिंबाजी कांदे वय 30 वर्ष रा. कांदेवाडी रंगेहात पकडले. फरार आरोपी भाऊसाहेब चौधरी आणि बबलू फड पोलीस कारवाई वेळी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस शोध फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
नेकनूर : चोरीच्या 17 मोटार सायकल,16 चेसिज्,30 इंजनसह 25 लाखाच्या मालासह 3 आरोपी जेरबंद
बीड — गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत नेकनूर मधून 50 हून अधिक चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस कारवाईत मोटार सायकल चेसिज् , इंजन, स्पेअर पार्टस् असा 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर गेवराई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपासाला सुरुवात करत गाडी चोरी करणाऱ्या आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. मिळत गेलेल्या माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी नेकनूर मधील टिपू सुलतान चौक परिसरात छापा टाकला.
यावेळी पोलिसांना 17 मोटार सायकल 16 मोटार सायकलचे सांगाडे तीस मोटरसायकल इंजन व मोटार सायकलच्या विविध कंपन्यांचे साहित्य असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विविध ठिकाणी मोटार सायकल चोरी करून आरोपी शेख असेम शेख मझर रा. नेकनूर यांच्याकडे घेऊन जात व असीम शेख हा अवघ्या दोन तासात मोटार सायकलचे सर्व स्पेअर पार्ट वेगळे करून मोटार सायकलची विल्हेवाट लावत असे.पोलिसांनी छापा मारला
त्यावेळी सय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन वय 31 वर्ष व्यवसाय गॅरेज रा.छ. संभाजीनगर एमआयडीसी, सय्यद इमदाद हुसेन अरशद हुसेन वय 22 वर्ष व्यवसाय प्लंबिंग रा. मासूम कॉलनी,मोमीनपुरा बीड, शेख असेम शेख मझर वय 32 वर्ष व्यवसाय भंगारवाला रा. नेकनुर यांना पोलिसांनी जेरबंद केले. एक आरोपी अद्याप फरार आहे. पकडलेल्या आरोपींनी छत्रपती संभाजी नगर, बीड परभणी हिंगोली जिल्ह्यातील चोरी केलेल्या मोटार सायकलचे सांगाडे व इंजन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चेसिज् व इंजन नंबर घेऊन तपासाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनी दीपक लंके, सपोनी संतोष जंजाळ, उपनि प्रदीप आढाव,पोउपनि निशिगंधा खुळे सुरेश पारधी श्रीमंत उबाळे रवींद्र राऊत अशोक हंबर्डे कल्याण राठोड घोलप राजू सांगळे ऋषी पोटे व महादेव पाटोळे यांनी कामगिरी पार पाडली.
सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे जेरबंद
बीड — वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा कपिलधार कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानी जवळ मृतदेह आढळला होता. जाधवर आत्महत्येस कारणीभूत ठरलेला व पोलिसांना सापडत नसलेला आरोपी प्रदीप फाटे यास पुण्यातील वाघोली मधून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी बाळराजे दराडे यांना यश मिळाले आहे.
जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा 17 जानेवारी 2026 रोजी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीजवळ गाडीत संशयास्पद रित्या मृतदेह आढळला होता. ड्युटीला जातो म्हणून घरातून सांगून गेलेले जाधवर परत आले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. दरम्यान सचिन जाधवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे गुन्हा दाखल होऊनही फरार होता. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात देखील धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने फाटेचा जामीन अर्ज फेटाळला होता. प्रदीप फाटे अटक केली जात असल्याच्या कारणावरून पोलीस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते. दरम्यान मयत सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 25 फेब्रुवारी रोजी उपोषण देखील केले. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात येईल अस आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणानंतर मात्र पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी देखील चांगलेच उचलून धरले होते. अखेर पुण्यातील वाघोली येथून आरोपी प्रदीप फाटे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक दुबाले, महेश विघ्ने तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी बाळराजे दराडे यांनी पार पाडली.
चौसाळाचे माजी आ.स्व. चांदमल लोढा यांच्या पत्नी मदनबाई लोढा संथारा व्रतात कालवश
प्रेमचंद, दिलीप, अशोक लोढा यांना मातृशोक
बीड — पूर्वीच्या चौसाळा मतदार संघाचे आमदार स्व. चांदमल लोढा यांच्या धर्मपत्नी श्रीमती मदनबाई चांदमल लोढा यांना ३ मार्च मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान संथारा व्रतामध्ये वीरमरण प्राप्त झाले. मृत्यू समयी त्या 89 वर्षाच्या होत्या.
श्रीमती मदनबाई लोढा आहे यांच्या पार्थिवावर ४ मार्च बुधवारी मोंढा रोडवरील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता त्यांची डोली जालना रोडवरील गणेश हाउसिंग सोसायटीतील अशोक लोढा यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.दिवंगत मदनबाई लोढा यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी (पुष्पा संदीप भंडारी, पुणे), सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद (बाबुशेठ) लोढा, स्व. सतीश लोढा, दिलीपचंद लोढा, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्या त्या मातोश्री होत. लोढा कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे
नांदूर घाट मध्ये घरकुल घोटाळा; युपी बिहार च्या लोकांनाही दिली घरकुल
केज — तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेत एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. येथील ९ स्थानिक लाभार्थ्यांच्या हक्काची घरकुलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता, चक्क बिहार आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या प्रकरणी दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोनाली अमोल जाधव आणि प्रा. सतीश मोराळे यांनी केली आहे.

शनिवारी (दि. २८) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सन २०२४ मध्ये मंजूर झालेल्या यादीतील ९ लाभार्थी हे परराज्यातील असून त्यांची नावे ना स्थानिक मतदार यादीत आहेत, ना ते येथील रहिवासी आहेत. तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.बीड तालुक्यातील धावज्याची वाडी येथील याबरोबरच “काटकर”आडनावाच्या माय लेकरांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. दोघेही नांदुर घाट चे रहिवासी नाहीत.
युपी बिहार मधील संतोष कृष्णा कुमार, पिंटू दुधनाथ बिन, रंजन देवनारायण कुमार, राहुल कुमार मनजी , मानोन कुमार, पप्पू मुंशी मीयान, मोहम्मद इर्शाद अन्सारी, कुंदन छंदादीप कुमार यांच्या नावावर प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये देण्यात आले
स्थानिक गरिबांची फसवणूक करून शासनाचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भगवान शिरसाट यांनी सांगितले की, आम्ही स्थानिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांसह रीतसर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले होते. मात्र, तरीही ९ जणांचे हप्ते परराज्यातील लोकांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चूक नेमकी कुठे झाली आणि किती रक्कम वर्ग झाली, याची यादी आम्ही पंचायत समितीकडे मागितली आहे. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रीतसर तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड येथील तांत्रिक विभागाच्या ‘टेक्निकल एक्सपर्ट’ मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
धुलीवंदन साजरा करायला निघाले, तरुणांच्या गाडीला अपघात; एक ठार,3 जखमी
बीड — धुलीवंदन साजरा करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना बीड ते शिरूर रोडवर रायमोह जवळ घडली. कृष्णा मुळे असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुलिवंदनाचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रोडवरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत कोसळली नाही.परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण यामध्ये जखमी झाले आहेत. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती. त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा मुळे यालाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. कृष्णा मुळे याच्या इतर मित्रांवर सध्या उपचार सुरू आहेत
सांगवीत मुलांना सापडली अडीचशे चांदीची नाणी; उत्खननाची मागणी
आष्टी — घराच्या बांधकामासाठी उकरलेल्या मातीत ब्रिटिश कालीन चांदीची नाणी सांगवी पाटण मध्ये खेळणाऱ्या मुलांना सापडली. शनिवारी ही घटना उघडकीस येताच प्रशासनाने धाव घेऊन अडीचशे नाणी जप्त केली आहेत. जमिनीखाली आणखी साठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगवी (पाटण) मध्ये शशिकांत नारायण खूटाळे यांच्या घराचे बांधकामासाठी पाया खणण्याचे काम सुरू होते. यातील मातीचा बाजूला ढिगारा केलेला असताना शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही मुले या ढिगार्यावर खेळत बसली. यावेळी त्यांना एका गाडग्यामध्ये चांदीची नाणी सापडली ती त्यांनी खिशातही भरली. ही बाब मालकाच्या लक्षात येताच मुलांना दमदाटी करून ती नाणी काढून घेतली. यामुळे सगळ्या गावात या घटनेची चर्चा रंगली. ही बाब प्रशासनाच्या कानावर गेल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली गेली. पहिल्या दिवशी प्रशासनाने 98 तर दुसऱ्या दिवशी 152 नाणी जप्त करण्यात आली. हि नाणी ब्रिटिश कालीन असून 1941 असा नाण्यांवर उल्लेख करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेली ही अडीचशे नाणी शुद्ध चांदीची असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेत आणखी मोठा खजिना असण्याची शक्यता वर्तविली जात असून पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करावे अशी मागणी केली जात आहे.
कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट सह दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले
तोंडाच्या वाफा काढत मुंडेंची बदनामी करणाऱ्या अंजली दमानियांना उच्च न्यायालया पाठोपाठ लोकायुक्तांकडून चपराक

मुंबई — राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले, त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.
लोकायुक्त यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे संपूर्णतः ऐकून घेऊन, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल तसेच संविधानिक तरतुदींचा अभ्यास करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा स्वयंस्पष्ट असून या प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सदर आरोप फेटाळून लावत असल्याचे आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पडगिलवार यांच्यासह विविध जनहित याचिका यांच्यावरती एकत्रित निकाल देताना हे आरोप केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून व खोट्या पुराव्यांच्या आधारे केलेले असून राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर व्यवसायिक दृष्टीने खोटी माहिती समोर आणून शंका उपस्थित करणे हे कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट करत, सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. तसेच याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
त्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांना जर निकाल मान्य नसता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विरोधात अपील करायला हवे होते मात्र त्यांनी अद्याप अपील न करता दंड भरला; याचाच अर्थ याचिका करते यांना सुद्धा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य होता.
उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असेही लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
कृषी साहित्य खरेदी सोबतच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ऑफिस प्रॉफिट सह विविध आरोप केले होते.
यासंदर्भात धनंजय मुंडे यांचे वकील श्री शार्दुल सिंह यांनी धनंजय मुंडे यांची बाजू मांडताना खासदार जया बच्चन यांच्या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा संदर्भ देत ऑफिसर प्रॉफिट बाबत लोकायुक्तांकडे देण्यात आलेली माहिती ही चुकीची व अर्धवट असल्याचे नमूद केले.
या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही; तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, त्यातही धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
दरम्यान मागील एका वर्षापासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे काही आरोप केले ते उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता लोकायुक्तांनी देखील सदर आरोप फेटाळून लावले असल्याने, अंजली दमानिया यांच्या केवळ तोंडाच्या वाफा व धनंजय मुंडे यांच्या बदनामीचा असफल प्रयत्न होता, हे सिद्ध झाले आहे, अंजली दमानिया यांना या निकालाने एकप्रकारे न्यायव्यवस्थेने एक प्रकारची चपराक लावली आहे, असे म्हणावे लागेल.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वरती मागील काही महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले, त्यावरून त्यांची बदनामी करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही, मात्र मुंडे यांच्या विरोधातील एक एक आरोप खोटा सिद्ध होण्याची मालिका देखील सुरू असून आज त्यात या निकालाने महत्वाची भर पडली आहे.
महत्त्वाचे निकाल
कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीबाबत करण्यात आलेल्या आरोपात उच्च न्यायालय त्यापाठोपाठ आता लोकायुक्त यांनी देखील मुंडेंच्या बाजूने निकाल दिला.
पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा झाला नसून राज्यात मागील दहा वर्षातील सर्वाधिक पीकविमा धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाला, असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषित केले.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथ पत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपातून क्लीन चीट, मुंडेंच्या बाजूने निकाल.
ऑफिस ऑफ प्रॉफिट संदर्भाने केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात ” मार्च हिट”वाढणार; हवामान विभागातून अलर्ट जारी

मुंबई — राज्यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे.मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस कमाल तापमानात सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. १ मार्च रोजी राज्यभर प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज असून ढगाळ हवामान किंवा पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू शकतो आणि दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात उष्णतेसोबत दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. मुंबई शहरात कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान २३ ते २५ अंशांच्या दरम्यान राहू शकते. सकाळी तसेच संध्याकाळीही उष्णतेची जाणीव कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. पुण्यात दिवसा तापमान झपाट्याने वाढताना दिसेल, तर रात्री तुलनेने थोडा गारवा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. वाढते तापमान आणि कोरडे हवामान यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातही तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.











