Home Blog Page 70

जामखेडमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश, राहुरी तालुक्यातील दोघे ताब्यात

जामखेड —  तालुक्यातील फक्राबाद परिसरात शनिवारी (दि.14) अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दूध भेसळीचा पर्दाफाश केला.                                       याप्रकरणी राहुरी तालुक्यातील दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिवनाथ लबडे यांनी स्वतंत्र पंचांसह फक्राबाद येथे तपासणी केली.तपासणीदरम्यान वाहन क्रमांक एम.एच. 17 के. 7946 उभे आढळले. वाहनात एकूण दहा प्लास्टिक ड्रम आढळले, त्यापैकी सहा ड्रममध्ये पांढर्‍याा रंगाचे दुधासारखे द्रावण असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता. राहुरी) आणि आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) यांनी हे द्रावण दूधाची फॅट कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी पराफिन तेल व इतर अज्ञात रसायन वापरून तयार केले असल्याचे सांगितले. त्यांनी हे द्रावण रामदास नवनाथ उबाळे (मु.पो. फक्राबाद, ता. जामखेड, व्यवसाय – दुध संकलन व पुरवठा) यांना पुरवठ्यासाठी आणले असल्याचे मान्य केले.

तपासणी दरम्यान द्रावणाचे दोन लिटर नमुने घेण्यात आले. तसेच घराच्या परिसरात पांढरट पिवळसर पावडर आणि दूध साठा आढळला. उबाळे यांनी सांगितले की, ही पावडर दुधातील घटक (एसएनएफ) वाढविण्यासाठी वापरली जात होती. बडे यांच्या तपासणीनंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि अन्न सुरक्षा नियम 2011 चे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी तीन व्यक्तींविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्यांशी विश्वासघात? अमेरिका-भारत व्यापार करारावर राहुल गांधींचे मोदींना थेट 5 प्रश्न !

नवी दिल्ली –अमेरिका आणि भारत यांच्यात नुकताच मोठा व्यापार करार झाला.यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला ‘विश्वासघात’ असल्याचं गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एपिस्टीन फाईल वरून तसेच नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत सरकारला घेरले. त्यातच अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावरून शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचं आक्रमकपणे मांडत आहेत.सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 प्रश्न विचारले आहेत आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींचे 5 प्रश्न
१. डीडीजी आयातीचा नेमका अर्थ काय? भारतीय गुरांना जीएम अमेरिकन मक्यापासून बनवलेले डिस्टिलर धान्य खायला दिले जाणार का? यामुळे आपली दुग्ध उत्पादने अमेरिकन कृषी उद्योगावर अवलंबून राहणार नाहीत का?

२. जर आपण जीएम सोया तेलाच्या आयातीला परवानगी दिली, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे काय होणार? ते किमतींचा हा धक्का कसा सहन करतील?

३. जेव्हा आपण “अतिरिक्त उत्पादने” म्हणता, तेव्हा त्यात कशाचा समावेश होतो? हा कालांतराने डाळी आणि इतर पिके अमेरिकन आयातीसाठी खुले करण्याचा संकेत आहे का?

४. बिगर-व्यापारी अडथळे (नॉन ट्रेड बॅरियर) हटवण्याचा अर्थ काय? भविष्यात भारतावर जीएम पिकांवरील आपली भूमिका शिथील करण्यासाठी, खरेदी कमकुवत करण्यासाठी किंवा एमएसपी आणि बोनस कमी करण्यासाठी दबाव टाकण्यात येईल का?

५. हा दरवाजा एकदा खुला झाला की, दरवर्षी तो आणखी उघडण्यापासून आपण कसे रोखणार? हे रोखले जाईल का, की प्रत्येक करारात हळूहळू आणखी पिकांचा यात समावेश होईल?

शेतकऱ्यांना स्पष्टिकरण मिळायला हव –
या प्रश्नांव्यतिरिक्त, “शेतकऱ्यांना स्पष्टीकरण मिळायला हवे. ही केवळ आजची बाब नाही, हे भविष्याशी संबंधित आहे, असे म्हणत, आपण दुसऱ्या देशाला भारताच्या कृषी उद्योगावर दीर्घकालीन नियंत्रण मिळवू देत आहोत का? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्तित केला.

एसबीआय बँकेच्या वाडीगोद्री शाखेत चोरीचा प्रयत्न

वडीगोद्री — धुळे-सोलापूर महामार्गावरील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या मागील बाजूचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी बँकेत शिरून लुटण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. मात्र, बँकेतील  मुख्य लॉकर सुरक्षित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला रुमाल बांधून तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न  चोरट्यांनी केला.

चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता उघडकीस आली. बँकेत चोरी झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.बँकेकडे येताना व जाताना पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, यामध्ये दोन बुरखाधारी चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या मागील बाजूला असलेल्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल परिसरातील कॅमेऱ्यातही हे चोरटे कैद झाले असून, शाळेजवळील शेतात मोठा गॅस सिलेंडर, एक फोटो गॅस टाकी आणि एक बॅग आढळून आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमद्वारे पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती

या घटनेमुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास चालू  आहे.

अहिल्यानगर,यवतमाळमध्ये मध्यरात्री एटीएसचं सर्च ऑपरेशन

अहिल्यानगर — महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 14 फेब्रुवारीच्या रात्रीपासून राज्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई केली आहे. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण 21 ठिकाणांवर एटीएसच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले तरुणांचे कट्टरपंथीय विचार सरणीकडे वळण आणि संशयास्पद दहशतवादी हालचालींच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एटीएसने 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेली ही शोधमोहीम पहाटेपर्यंत सुरू होती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड शहरांतील 14 ठिकाणी, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एटीएसच्या विविध पथकांनी संशयितांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेतली.
या छापेमारीत एटीएसच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांच्या ठिकाणांहून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या साहित्यावरून तरुणांना भडकवण्याचे किंवा दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र, प्राथमिक चौकशीसाठी 12 पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे देशविरोधी संघटनांशी काही संबंध आहेत का, याचा कसून तपास एटीएस करत आहे.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएसने अल-कायदा आणि इतर प्रतिबंधित संघटनांशी संबंधित असलेल्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील तरुणांना ऑनलाईन माध्यमातून कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ही 21 ठिकाणची छापेमारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तपास अधिकारी सध्या जप्त केलेल्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करत असून, यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार — फडणवीस

‘महा पशुधन एक्स्पो’२०२६ ला मुख्यमंत्र्यांची भेट

 बीड —परळी  “आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट  करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल,” असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी  एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.

शेतीला ‘क्लायमेट रिस्क’ मधून वाचवणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “हे प्रदर्शन केवळ एक सोहळा नसून कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन ‘राज्यमाता’ दर्जा दिला आहे.”

तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, “पंजाबमध्ये गाय १०-१५ लिटर दूध देते, तर आपल्याकडे २.५ लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.  पशुधन संवर्धन,  आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन’ चा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात ‘मदर्स डेअरी’ सोबत करार देखील करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास नको

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतील, या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गावातला तरुण होईल ‘पशुधन उद्योजक’: पंकजा मुंडे

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी मालक बनावे, यासाठी आम्ही लवकरच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ आणत आहोत. महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत आहे.” तसेच पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. हा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मंत्री मुंडे यांनी आभार मानले.

माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनीही परळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या समोर मागण्या मांडल्या. तसेच बीड व परळीचे विकासासाठी कायम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले.

 विजेत्यांचा गौरव

अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी पालन योजनेतील विजेत्यांना आणि गोपाळ रत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या 10व्या अंकाचे प्रकाशन व विभागाच्या ‘दिनदर्शिका 2026’चे अनावरण केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  ‘महापशुधन एक्स्पो 2026’मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण केले. जिरेवाडी, ता. परळी येथील तुळजाई महिला स्वयंसहायता समूहास ₹15,00,000 इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील ‘उमेद सखी – महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ला शासन अनुदानाच्या ₹12,27,500 या प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले.

सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

विदर्भ मराठवाडा दुग्धोत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळ नागपूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल मुकणे आणि मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोमनाथ माने त्यासोबतच डॉ. दिनकर बोर्डे उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा व विदर्भ मराठवाडा उत्पादन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोराडे यांना यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कराराच्या प्रति हस्तांतरित करण्यात आल्या.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली, स्मृती दालनाचे उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध पशुधनाची पाहणी केली. पाहणीत त्यांनी पशु पालकांचे कौतुक केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृती दालनाचे उदघाटनही त्यांनी केले. मुख्य कार्यक्रम ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परळी नगर परिषदेच्या स्व. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025” पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रीमती श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्रीमती ढवण  सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सायली संजीव यांनी केले. आभार सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी मानले. या सोहळ्याला परळीतील नागरिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती.

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

🕳️ उदगीर प्रकल्प:  उदगीरचे दूध भुकटी केंद्र १०० कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार.

🕳️ नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार    होणाऱ्या ‘जीवामृता’ला प्रोत्साहन.

🕳️   आरोग्य सेवा: राज्यातील २८४१ पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे  जाळे.

🕳️   विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या ४-८% वरून २५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

🕳️   राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३६६ प्रकल्पांना मंजुरी.

फलटण: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी गोपाळ बदने चा जामीन अर्ज फेटाळला

फलटण — येथील सरकारी डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत माहिती अशी, फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी संशयित गोपाळ बदने 35 वर्ष, मुळ रा.चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण व प्रशांत किसन बनकर 29 वर्ष रा. बनकर निवास लक्ष्मीनगर, फलटण हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. यामधील गोपाळ बदने याने जामिनासाठी फलटण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.या दाखल जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने दोषारोप पत्रातील प्रथमदर्शनी आलेले तांत्रिक पुरावे व युक्तिवादाच्या आधारे बदने याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयामध्ये आरोपी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली. त्यास सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव काटकर व सरकारी पक्षाला मदत म्हणून मूळ फिर्यादीचे वकील सदाशिव सानप यांनी यूक्तीवाद केला.

पहिली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई — शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे. यासाठी 165 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळांना यापूर्वी गणवेशासह मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती. यासोबतच आता दप्तरही मोफत मिळणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी 13 फेब्रुवारीला जारी केला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.ही योजना ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे’ या विद्यमान योजनेंतर्गतच राबवली जाणार आहे. दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने त्यासाठीचा खर्च संबंधित निधीतूनच करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.या दप्तरांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, खरेदी प्रक्रियेत उद्योग विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

संतोष देशमुख प्रकरणात एटीआर समितीत केला बदल

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ अर्थात कृती आराखडा (एटीआर) तयार करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ समितीमध्ये सरकारने बदल केला आहे. 9डिसेंबर 2024 रोजी झाल्या नंतर 9 जानेवारी रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीत सह सचिव व्यंकटेश भट यांचा समावेश होता. मात्र, शासनाने शुक्रवारी काढलेल्या नवीन निर्णयानुसार भट यांच्या जागी आता सह सचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहे. न्यायमूर्ती ताहलियानी समितीच्या अहवालाची छाननी करण्यासाठी गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही उच्चस्तरीय समिती कार्यरत आहे. या बदलामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात सादर केलाच जाण्याची शक्यता आहे. हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा ही समिती तयार करणार आहे. या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे, अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान उच्चस्तरीय समिती अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून यामध्ये प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे, हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते, ज्यावर आता ही नवीन समिती आपले मत मांडणार आहे. ही समिती जो काही अहवाल सादर करणार आहे, त्याचे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.सह सचिव स्तरावरील या बदलामुळे आता अहवालाच्या छाननीमध्ये नेमके काय नवीन मुद्दे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीडमध्ये वेठबिगारी उघड; मारहाण करत डांबून ठेवलेल्या 15 मजुरांची सुटका

बीड — उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील मजुरांना ऊसतोड मजूर म्हणून आणले. त्यांना कामाचा कोणताही मोबदला न देता, मारहाण व धमकी देत डांबून ठेवलं याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार यांनी बुधवारी कारवाई करून १५ मजुरांची सुटका केली. वेठबिगारीची ही घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली.
धारूर तालुक्यातील आमला-हिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील काही मजुरांना नोव्हेंबर महिन्यात ऊसतोड मजूर म्हणून आणले.त्यांच्याकडून काम करून घेत असताना त्यांना कोणताही आर्थिक मोबदला दिला नाही. कामाच्या मजुरीची मागणी केल्यास मजुरांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. या संदर्भात मजुरांच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची माहिती ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणाची माहिती बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र व दूरध्वनीद्वारे दिली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, मंडळ अधिकारी लहु केदार, सोपान वाघमारे, संबंधित तलाठी व दिंद्रुड पोलीस सहभागी होते. या पथकाने कारवाई करून सर्व मजुरांची सुखरूप मुक्तता केली. जाचातून सोडवण्यात आलेल्या आलेल्या मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर एक रात्र विश्रांती दिल्यावर सर्व मजुरांना विशेष वाहनाने त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी सुखरूप रवाना करण्यात आले.या प्रकरणी आरोपी ओम चंद्रकांत सोळंके याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सिद्धेश्वर डोईफोडे तपास करीत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा; पाठलाग करणारावर दरोडेखोराचा सशस्त्र हल्ला

वडवणी — मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखाची रक्कम लुटली. दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या एकावर सशस्त्र हल्ला करुन जखमी केल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खळवट निमगाव मध्ये 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास अभिमान मारुती राऊत यांच्या घराचे मुख्य गेट तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या मंडळींना धारदार शस्त्राचा धाक दाखवत धमकावलं आणि कपाटातील ठेवलेले साडेसात तोळे सोने, 1 लाख 24 हजार रुपयांची रक्कम लुटली त्यानंतर हरिभाऊ दिगंबर राऊत यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले दोन तोळे सोने लुटले. त्यानंतर दरोडेखोर पळून जात असताना हरिभाऊ राऊत यांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पळापळी करत असताना एका दरोडेखोराने त्यांच्या पाठीवर शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे खळबळ माजली असून जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.