Home Blog Page 51

बीडच्या कारागृह अधीक्षकांकडून कैद्यांच्या धर्मांतराचे प्रयत्न -आ. पडळकर

0

सांगली — बीडच्या जेलमध्ये सर्वच महापुरुषांचे फोटो काढून टाकले असून त्या ठिकाणी बायबलचे श्लोक लिहित धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड वर केला आहे.
बीड मधील जेल या ना त्या कारणामुळे वादग्रस्त ठरत आहे. आता जेलमधील कैद्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपाने खळबळ माजली आहे. जेलमधील कीर्तन बंद करण्यात आलं. तर कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी केली.
बीडच्या तुरुंगात कैद्यांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न

गोपीचंद पडळकर म्हणाले की, “बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबल मधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेल आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारच आमिष दाखवत धर्मांतर घडवून आणण्याची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत.”
बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास करावा तसेच पेट्रस गायकवाडला बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली.

मुंबईत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट

0

कपिलधारवाडी, हिंगणी खुर्दचे पुनर्वसन, नाट्यगृह, डीपी रस्त्यांना निधी मिळणार

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची सोमवारी (दि.६) भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी बीड व शिरूर कासार तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांचे पुनर्वसन, विकास प्रकल्प आणि आगामी स्थानिक निवडणुका या विषयांवर सखोल चर्चा झाली.

बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीबाबत डॉ.क्षीरसागर यांनी अजितदादांचे लक्ष वेधले. त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्री अजितदादांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. हिंगणी खुर्द गावात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीबाबतही चर्चा झाली. या भागातील पंचनामे, मदत व गाव पुनर्वसनाच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी डॉ.क्षीरसागर यांनी केली. तसेच बीड शहरातील डीपी रस्ते प्रकल्पालाही अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच, अन्य रस्त्यांसाठी डीपीसीव्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे.

नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ठोक तरतूद हेडमधून मिळणार साडेआठ कोटींचा निधी

बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी नगरविकास विभागाच्या ठोस तरतूद हेडमधून नाट्यगृह उभारण्यासाठी लवकरच साडेआठ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक निर्णय अजितदादांनी घेतल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत झाली चर्चा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत डॉ.योगेश क्षीरसागर व अजितदादा पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी अजितदादांनी मार्गदर्शन केले असून पूर्ण ताकदीने निवडणुका लढविल्या जाणार आहेत.

नगराध्यक्षपदांचे आरक्षण झाले जाहीर; अनेकांच्या स्वप्नाचा चुराडा

0

बीड — राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूक तयारीने वेग घेतला आहे.अध्यक्षपदाची सोडत सुरु असून बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. आणखी इतर प्रवर्गाचे आरक्षण सुरु असून सुरुवातीला अनुसूचित जातींसाठी अधिसूचित नगरपालिकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
बीडला अनुसूचित महिला आरक्षण जाहीर झाले आहे.तर ओबीसी प्रवर्गात माजलगाव ओबीसी महिला आणि अंबाजोगाई ओबीसी आरक्षण असणार आहे. धारूर, परळी नगरपालिका खुल्या प्रवर्गासाठी असून यात गेवराई, परळीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असणार आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 6ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली आहे. राज्यातील 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर 34 नगर परिषदांमधील नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामध्ये इगतपुरी, भोकरदन, जुन्नर, दौंड, माजलगाव, कर्जत, रोहा या नगपरिषदांचाही समावेश आहे. नगराध्यक्षपदाच्या या सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात. त्यामुळे आता या आरक्षणाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार,राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाली आहे.

असे आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण

अनुसूचित जाती महिला : बीड
ओबीसी महिला : माजलगाव
ओबीसी : अंबाजोगाई
सर्वसाधारण महिला : परळी,गेवराई
सर्वसाधारण :धारूर

7 वर्षाच्या चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

0

केज — घराशेजारील शेतात आई वडील गेले असता घरी असलेली आर्या अमोल बजगुडे ही सात वर्षीय मुलगी उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिंचोली माळी येथील बजगुडे वस्तीवर रविवारी घडली.
या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पहिली वर्गात शिकत असलेल्या
आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. संध्याकाळी पाच वाजता आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली. या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. अचानक, आर्याचा या खड्ड्यात तोल गेला आणि ती साचलेल्या पाण्यात पडली. बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने आईने घरी धाव घेतली. तेव्हा आर्या खड्यातील पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.दरम्यान आर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नाका-तोंडात पाणी जाऊन आर्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने बजगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, बजगुडे वस्तीवर आणि चिंचोलीमाळी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एबीपी माझा’चे प्रमोद जोशी यांना पितृशोक

0

बीड — शहरातील जटाशंकर गल्ली मध्ये राहणारे प्रभाकरराव (पोपट काका) जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते.

अतिशय बोलका व प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ते सर्वपरिचित होते. एबीपी माझाचे कॅमेरामन तथा चॅनल प्रतिनिधी प्रमोद (पिंटू) जोशी व प्रवीण अण्णा जोशी यांचे  ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता अमरधाम स्मशानभूमी मोंढा रोड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा” सहभागी आहे.

38 लाखाची 30 टन हळद गायब करणाऱ्या ट्रक चालक मालकावर गुन्हा दाखल

0

अंबाजोगाई — सांगली येथे ३० टन हळद ट्रक मधून घेऊन जात असताना  तब्बल ३७ लाख ८१ हजार रुपयांची हळद स्वतः ची लंपास करून  चोरी झाल्याचा कांगावा ट्रक मालक व चालकावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोखंडी सावरगाव, कळंब फाटा परिसरात चोरी झाल्याचं ट्रक चालक व मालक यांनी खोटंच सांगितलं होतं.

प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी हे छत्रपती संभाजीनगर येथील हे दुर्वा कमोडीटी प्रा.लि. या कंपनीचे संचालक असून, ते सांगली येथे हळद दळून विक्री करतात. त्यांनी दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी राधा सर्वेश्वर कंपनी सोलापूर मार्फत ३० टन हळद खरेदी करून स्टार अॅग्रो वेअरहाऊस, लिंबाळा (एमआयडीसी, हिंगोली) येथून सांगलीकडे पाठवण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच २६ एडी २९३५ या वाहनाद्वारे वाहतूक ठरवली होती. ट्रक मालक नदीम खान मुजाहेद खान (रा. अपना कॉर्नर, परभणी) आणि चालक सय्यद अजगर सय्यद सज्जान (रा. दर्गारोड, परभणी) यांच्याकडे माल ताब्यात देण्यात आला. मात्र, सांगलीला पोहोचण्याआधी नदीमने सोनी यांना कळवले की अंबाजोगाईजवळ कळंब फाटा येथे अज्ञात लोकांनी ट्रक लुटल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सोनी घटनास्थळी पोहोचले असता ट्रकमध्ये फक्त ३० पोते शिल्लक असून उर्वरित ५७० पोते हळद गायब असल्याचे दिसून आले. चौकशीत चालक सय्यद अजगरने कबुली दिली की ट्रक कोणत्याही चोरट्यांनी चोरलेला नसून ट्रकमालक नदीम खान यांनी संगणमत करून ट्रकमधील हळद कोठेतरी विल्हेवाट लावली व पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि जगताप हे करीत आहेत.

परभणी: शिक्षकासह तीन मुलांचा AI तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

परभणी — शाळेची सहल गेलेली असताना शिक्षकाने विद्यार्थीनीचा कपडे बदलताना व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला. दरम्यान याच पीडित मुलीचा आणखी एका मुलांने AI(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार केला तो व्हायरल करण्याची धमकी देत आपल्या मित्रासह लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सेलू शहरात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,संतोष मालसवाड हा सेलू शहरातील नूतन विद्यालयात शिक्षक आहे. या शाळेची सहल रायगड आणि महाबळेश्वर येथे गेली होती. या दरम्यान संतोष याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा कपडे बदलताना अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान पीडित मुलगी ट्युशन ला गेलेली असताना एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह तिथे येऊन तिचा फोटो काढला. हा फोटो AI तंत्रज्ञानाद्वारे अश्लील करून तो फोटो समाज माध्यमातून व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. आपल्या मित्रांना सोबत घेत या तरुणाने देखील पीडितेवर अत्याचार केले. तरुणीने हे प्रकरण कुटुंबियांना सांगताच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणात तरुणीने दिलेल्या फिर्यादी नुसार, आरोपी शिक्षक संतोष मसलटवाड,अल्पवयीन तरुण त्याचा मित्र नितीन परदेशी व इतर एक जण अशा चार जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ६४(२)(I)(M)(F)75,78,351(2)(3),3(5)BNS सह कलम 4,8,9 (L)(F)10,12,पोक्सो एक्ट २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान या घटनेने सेलू सह परभणी संताप व्यक्त केला जात आहे.

“पिंजरा” फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

0

मुंबई — पिंजरा फेम अभिनेत्री आणि व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी संध्या शांताराम यांचं निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्या दिग्ग्ज नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जायच्या. शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एका नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आजही तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. या सिनेमात संध्या शांताराम यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. व्ही शांताराम यांनी तीन लग्न केली होती. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले. त्यांची तिसरी पत्नी संध्या या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व कुशल नर्तिका होत्या. दुसरी पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी फारसे चित्रपट केले नसले, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

संध्या यांनी व्ही. शांताराम यांच्यासोबत ‘दो आंखें बारह हाथ’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली आणि आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते.

अखेर ..! राहुल गांधींनी केलेले ‘मत चोरी’चे आरोप सिद्ध, पुरावेच सापडले

0

मुंबई — काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपावर वोट चोरीचा आरोप लावला होता. या वोट चोरीला निवडणूक आयोगाने मदत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयोगाने त्यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन राहुल गांधी यांना केले आहे.दुसरीकडे आयोगावरचे आरोप भाजपचे नेते खोडून काढताना दिसत आहे. यातच राहुल गांधी यांच्या आरोप खरे असल्याचे काही पुरावे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आढळले आहेत. या मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक भाजप कार्यकर्त्याशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. हे बघता व्होट चोरीचा मुद्दा आणखीच तापणार असल्याचे दिसून येते.

राहुल गांधी यांनी आपल्या लेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठोपाठ राजुरा विधानसभा मतदारसंघात व्होट चोरी झाल्याचा आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक ते १५ ऑक्टोबर या दरम्यान ११ हजार ६६७ बोगस मतदार नोंदणी केल्याची तक्रार काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारी नंतर ६ हजार ८५३ मतदार वगळण्यात आले होते. याची तक्रार तहसीलदारांनी पोलिसात केली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे तीन हजार मतांनी विजयी झाले. धोटे हे पराभूत झालेत. या काळात पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या बोगस मतदार नोंदणीसाठी वापरण्यात आलेले आयपी ॲड्रेस आणि ओटीपीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली होती.

मात्र निवडणूक आयोगालने पोलिसांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले होते. मात्र राहुल गांधी यांच्या आरोपानंतर पुन्हा हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. धोटे यांची शंका बळावली. त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन या घोळाची माहिती सादर केली. राजुराच्या पलिसांनी केलेल्या तक्रारीत काही मोबाईल क्रमांकांच उल्लेख आहे. मात्र त्याची चौकशी केली जात नसल्याने वरूनच निवडणूक यंत्रणेवर दबाव असल्याचे बोलले जाते.
या मतदार संघातील तिसऱ्या क्रमांवर असलेले शेतकरी संघटनेचे उमेदवार व माजी आमदार वामनराव चटप यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. पोलिस तक्रारीत नमूद असलेले मोबाईल क्रमांक मिळवले. ते भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे असल्याचे आढळून आले आहे. असे असताना पोलिस त्यांना चौकशीला बोलवत नसल्याचा आरोप चटप यांनी केला आहे. त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करून पोलिस तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पूरग्रस्तांसाठी बीड पोलिसांनी केला मदतीचा हात पुढे

0

बीड – अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच स्वप्न धुळीला मिळालं. जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेले असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपये दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पोलीस यंत्रणेने देखील सहा लाख 39 हजार रुपयाचा निधी जमा करत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी सध्याची परिस्थिती पाहता देशाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेतून 50 हजारांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली होती.यानंतर इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे अनुकरण करत अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.त्यामुळे बीड पोलिसांकडून मदतीचा ओघ वाढत तब्बल 6 लाख 39 हजारांची मदत पुरग्रस्तांसाठी जमली होती.बीड पोलिसांनी खाकीतून दाखविलेले माणुसकीचे दर्शन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.