Home Blog Page 35

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार – सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडत आहे, या प्रकरणी आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीवर स्थगितीचा आदेश दिलेला नाही. अंतिम निर्णय 21 जानेवारी 2026 रोजी दिला जाणार आहे. तोपर्यंत या निवडणुका न्याय प्रविष्ठ राहील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेतच होणार आहेत. 57 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम निर्धारित वेळेत होईल, मात्र येथील निवडणूक ही न्याय प्रविष्ठ असणार आहे. 21 जानेवारी 2026 रोजी यावर अंतिम निर्णय येईल, तो निर्णय या नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बांधील असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी मे महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे. आजच्या न्यायालयाच्या निर्देशामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला निर्धारित वेळेत निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असतानाच या निवडणुकीमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा मुद्दा समोर आला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागले. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. निवडणुका स्थगित न करता निवडणुकीचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देताना सरन्यायाधीस सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या खंडपीठाने ज्या 40 नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील असे आदेश दिले.

या प्रकरणी पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल, असेही आज कोर्टाकडून सांगण्यात आले. त्यामुळे 21 जानेवारी रोजी होणारी सुनावणी ही त्या पद्धतीने सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मागील पाच ते सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झालेली नाही. त्यामुळे आता निवडणुकीला स्थगिती मिळाली तर पुन्हा निवडणुकीवर टांगती तलवार राहण्याची शक्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर खंडपीठाने नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार घेण्यास परवानगी दिली आहे.

ज्या 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक आहे, त्यांचा निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील अर्थात निकाल न्यायप्रविष्ट असेल.

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यात अनेक वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सध्या निर्माण झालेला आरक्षण मर्यादेचा वाद फक्त नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्येच आहे. त्यामुळे इतर महापालिकांची निवडणूक टांगणीला लावून ठेवणे योग्य होणार नाही, असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला. त्यानंतर खंडपीठाने उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे स्वातंत्र्य असेल, असे निर्देश दिले. मात्र, या संस्थांमधील आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक नसावे. ही अट देखील प्रकरणाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल.

योगेश भैया…! निवडणुकी पुरतच दारात जायचं अन् मत मागायचं विधानसभेसाठी तुम्हाला नाकारलं मग पालिकेत का स्वीकारायचं ?

0

बीड — स्व. काकूंची धर्मनिरपेक्ष शिकवणं मातीमोल करून स्वार्थाच्या राजकारणासाठी पक्ष बदललेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत यापूर्वीच जनतेने नाकारलं आहे. ज्यांचं बोट धरून भाजपात प्रवेश केला त्यांना देखील लोकसभेत बीडकरांनी घरची वाट दाखवली. योगेश भैया…! तुम्हीच सांगा निवडणुकी पुरतचं दारात जायचं अन् मत मागायचं एरवी घरात बसायचं मग बीडकरांनी तुम्हाला व तुमच्या उमेदवाराला का स्वीकारायचं ? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
स्वार्थाच राजकारण किती करायचं याला देखील मर्यादा असतात.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. योगेश क्षीरसागर सक्रिय झाले. उमेदवारी मिळावी यासाठी जंग जंग पछाडली. उमेदवारी मागण्यासाठी मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म घेतला पैसा खर्च करण्याची धमक होती. एवढीच काय ते पात्रता होती. समाजकारण राजकारण याचा फारसा गंध त्यांना नव्हता.परिणामी ऐन निवडणुकीच्या मैदानात हाबुक ठोकून उतरले असले तरी जनतेने त्यांना घरीच बसवणं पसंत केलं. निवडणुका संपल्या नंतरच्या कालावधीत तरी समाजकारण करून जनतेशी नाळ जोडायला पाहिजे होती. शांततेच्या काळात युद्धाची तयारी करावी लागते म्हणतात. त्यावेळी योगेश क्षीरसागर काही महिने विजनवासात राहिल्यासारखे समाजापासून अलिप्त राहिले. कधीतरी एखादं पत्रक काढायचं शहरात होत असलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं. एवढाच फंडा त्यांनी सुरू केला होता. विशेष म्हणजे अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानीच्या काळात देखील ते फारसे जनतेत मिसळलेले दिसले नाहीत. बांधकाम विभागाचे अधिकारी घरी बोलवायचे. टेबल पुढे उभे करून स्वतः खुर्चीवर बसायचं व आपण कसे जनतेसाठी काम करत आहोत. आपल्याच आदेशाने कशा यंत्रणा हलतात मला जनतेची किती काळजी आहे. याचा भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना उभे करून आदेश द्यायला योगेश क्षीरसागरांकडे कुठलंच संवैधानिक पद नव्हतं. मग त्यांनी त्यावेळी काढलेल्या बातम्यांच्या माध्यमातून दाखवलेला मुजोरपणा जनतेला आवडला नाही. या पलीकडे फारसं काम त्यांच्याकडून झालं नाही.
न.प.निवडणूकीच बिगुल वाजताच योगेश क्षीरसागर तंद्रीतून जागे झाले.35 वर्ष आपल्याच घरात सत्ता राहिली आहे आपण बीडचे राजकुमार आहोत अशा अविर्भावात निवडणुकीच्या तयारीला लागले. त्यांची ही स्वार्थी मानसिकता अजित पवारांना आवडलीच नाही. त्यांनी सरळ नाकारण्याची भूमिका घेतली. त्यानंतर
लगेच आपल्यावर खूप काही अन्याय झाला आहे.अस दाखवत सहानुभूती मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत भाजपची वाट धरली. भाजपच्या उत्साहाला इतकी उकळी फुटली की त्यात मग्रूरीचा उत मात चूलीला विझन पडण्याच्या स्थिती निर्माण झाली. हे सगळं पक्ष बदल करत असताना योगेश क्षीरसागर यांनी स्व. काकूंनी दिलेली धर्मनिरपेक्षतेची शिकवण एका क्षणात पायदळी तुडवली. यामध्ये क्षीरसागर कुटुंबीयांशी नाळ जोडला गेलेला प्रत्येक जाती-धर्माची लोक तुटली गेली. याचा विसर मात्र स्वार्थी राजकारणात योगेश क्षीरसागर यांना पडला.
स्व. काकूंच्या शिकवणीवर ठाम राहायचंच एवढं जरी ठरवलं असतं वेगळी आघाडी स्थापन केली असती तर कदाचित जनतेने डोक्यावर घेतला असतं. तीच बीडची जनता पुन्हा पायदळी तुडवायला मागे पुढे पाहणार नाही अस सध्याचं तरी चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत का नाकारलं याच एकदा अवलोकन जरी केला असतं तरी त्याचा फायदा झाला असता. बरं ज्याचं बोट धरून भाजप प्रवेश केला त्यांच्या जीवावर नगरपालिकेची सत्ता आपल्याच हातात येणार याचा कैफ (धुंदी) डोक्यात चढला आहे.त्या नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत बीड शहराच्या जनतेने सपशेल नाकारलं होतं. याचा विसर मात्र योगेश क्षीरसागर यांना पडलेला आहे. बीडच्या जनतेला वेड्यात काढण्याचा धंदा जनता हाणून पाडणार असं एकंदर निवडणुकीचं वातावरण असल्याचं राजकीय जाणकार सांगू लागल्या आहेत.

नरेगा वर्क कोड डिलीट; लाभार्थ्यांसाठी तातडीने उपाययोजनांची मागणी

0

 लाभार्थ्यांनी तात्काळ पंचायत समिती येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा

बीड  —  नरेगा योजनेअंतर्गत राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व प्रकारच्या कामांचे वर्क कोड डिलीट झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये कामे थांबली असून मजुरांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. या गंभीर प्रश्नी तातडीने कार्यवाही करून निलंबित कामे सुरू करणे व मस्टर तात्काळ चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली  सतीश शेळके पाटील यांच्या वतीने  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठजी गोगावले  यांनी  आयुक्त , नरेगा विभाग, नागपूर,  जिल्हाधिकारी बीड,  मुख्य कार्यकारी अधिकारी  जि.प. बीड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), बीड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प. सत्वर कार्यवाहीसाठी आदेशीत केले आहे. तसेच गटविकास अधिकारी राठोड  यांनी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे. कामांच्या पुनर्मंजुरीसाठी (दुबार वर्क कोड) मूळ संचिका व चालू तारखेचा 7/12 उतारा घेऊन तातडीने पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व गावांना वर्क कोड डिलीट होण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पुनर्मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मस्टर तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

कृष्णा आंधळेचा शोध लागेना; अहवाल सादर करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्‍चितीवर 12 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी विशेष मकोका न्यायालयात संशयित विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. घटनेतील फरारी कृष्णा आंधळे सापडत नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या.

संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष तपास पथकाने वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर अपहरण, खंडणी आणि हत्येचा ठपका ठेवला. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. मात्र, घटनेला वर्ष लोटत आले तरी यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.गुरुवारी झालेल्या सुनावणीत विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे, याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यावेळी या प्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणांकडे याबाबतची विचारणा करून तो का सापडत नाही, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. तसेच पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार असून, या दिवशी आरोप निश्‍चिती करून सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; आ.सुरेश धस अडचणीत

0

बीड — शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री 10 ते 15 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला  झाला आहे.या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती आणखी गंभीर झाल्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.मात्र हल्ला कुणी केला कारण काय या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान या प्रकरणात आ. सुरेश धस यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. यापूर्वी आ. धस यांचा जमीन देवस्थान घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाल्याचा देखील सांगितलं जात आहे.

राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आणि नंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला.

यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते.दरम्यान, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. खाडे यांच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

पीएसआय चा कारनामा; सराफा व्यापाऱ्याला लुटले!

0

बीड — जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले असताना पोलिस ही गुन्हेगारीत बरबटले असल्याचे समोर येत आहे. यामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.बीडमध्ये लॉजवर थांबलेल्या एका सराफा व्यावसायिकाला चक्क पोलीस अधिकाऱ्याने आणि इतर पोलिसांनी लुटले असल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे कामासाठी बीड येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने ते शहातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक शहरातील शिवाजीनगर येथील पोलीस उप निरिक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि मोबाईल पोलिसांनी जप्त करून सर्व प्रकारचा संपर्क बंद केला.त्यानंतर त्यांच्यावर सतत दबाव टाकत 7 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र जैन यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी नकार दिल्यावर पोलिसांनी कथितपणे “मेडिकल खर्च” सांगत दुसऱ्या एका स्थानिक व्यापाऱ्याकडून 4 लाख रुपये मागवण्यास भाग पाडले.ही रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष घेतल्याचे सांगितले जाते. इतक्यावरच न थांबता, जैन यांना रात्री उशिरा दुसऱ्या एका लॉजवर नेऊन संपूर्ण रात्र डांबून ठेवण्यात आले. पहाटेच्या सुमारास आरोपींनी उर्वरित 3 लाख रुपये सकाळी 12 वाजेपर्यंत आणण्याचे आदेश देत त्यांना सोडून दिले.या घटनेनंतर जैन यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

योगेश भैया..! स्व. काकूंच्या विचाराला मूठ माती दिली मग सामाजिक,सांस्कृतिक चळवळीचा चेहरा असलेल्या दीपाताई क्षीरसागर प्रचारापासून अलिप्त का?

0

बीड — राजकारणा सोबतच नाट्य, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचा चेहरा असलेल्या दीपाताई क्षीरसागर यांनी बीडच्या सर्वांगीण विकासात मोलाचा हातभार लावला. त्या मात्र या वेळेच्या न.प. निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त का? बीडच्या विकासात या चळवळीचं महत्व नाही का? स्व. काकूंच्या विचारधारे सारखीच सांस्कृतिक चळवळींना देखील मूठ माती देत झुंडशाहीला बळकटी द्यायचीय का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.
बीड शहर तसं सांस्कृतिक वारसा जोपासणारं आहे.डॉ. भारतभूषण क्षीरसागर व दीपाताई क्षीरसागर यांनी नाट्य, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक यासारख्या चळवळी राबवून बीडच्या सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान दिलं.त्यामुळे या चळवळींच्या माध्यमातून बीडची नवी ओळख निर्माण झाली. नुसता शहराचा रस्ते ,नाल्यांचा विकासच नाही तर समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यशैलीचाच परिणाम म्हणून प्रत्येक वेळी न प निवडणुकीत डॉ. भारतभूषण बुद्धिवादी वर्गांने डोक्यावर घेतलं. प्रचंड जनसंपर्क, व्यक्तिगत संबंधाच्या जोरावर जातीपाती धर्माचा राजकारण न करता विरोधकांनाही आपलंस करण्याची वृत्ती प्रत्येक निवडणुकीत यश देत गेली. मात्र योगेश भैया तुम्ही स्व. काकूंच्या विचारधारेलाच मूठ माती दिली नाही तर बीडच्या सर्वांगीण विकासाला खिळ बसवण्याचा चंग देखील बांधला आहे असं चित्र सध्यातरी दिसत आहे. सामाजिक शैक्षणिक राजकीय ,नाट्य, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळत असते त्या चालनेला खंडित करायचं काम होत असल्याचं दिसू लागला आहे. नुसतं काँक्रेट जंगल तयार करून शहराचा विकास होत नसतो, तर क्रियाशील समाज निर्मितीतूनच शहरं आपली ओळख निर्माण करतात याचा विसर पडल्यानेच डॉ. दीपाताई क्षीरसागर यांना प्रचारात पासून अलिप्त ठेवण्याचं काम केलं जाऊ लागला आहे. त्यामुळे बुद्धिवादी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून याचा फटका निवडणुकीत बसणारच असं राजकीय विश्लेषक सांगू लागले आहेत. शेवटी तो तुमचा घरचा विषय आहे पण बीडच्या जनतेला दीपाताईंची अनुपस्थिती खटकू लागली आहे. त्यातच दीपाताई क्षीरसागर यांनी कधीच निवडणूक काळात मर्यादा भंग होईल अशी भाषा वापरली नाही. मात्र स्थानिक दैनिकाला सारिका क्षीरसागर यांना मर्यादांचे भान ठेवा असा सल्ला द्यावा लागला. हे बीडच्या सांस्कृतिक अध: पतन कसं होणार आहे याचा नमुना ठरणार उदाहरण आहे.
योगेश भैय्या…! तुम्ही काकूंच्या विचाराचे होणार नाहीत.तुम्हाला दीपाताईंसारखे सुसंस्कृत चेहरे नकोत ? मग तुम्हाला जनतेने का स्वीकारायचं? तुमच्या हातात न प ची सत्ता देऊन शहर बकाल करायचं का? ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षाची स्वार्थासाठी तुम्ही धरलेली कास जनतेच्या पचनी का पडावी? असे एक ना अनेक प्रश्न जनतेला पडू लागले आहेत.

साहेबांनो कुठपर्यंत भरणार नाही तुमच्या पोटाचा खड्डा; तहसील कार्यालय बनलय भ्रष्टाचाराचा अड्डा

0

बीड — एखाद्या गोष्टीचं व्यसन जडलं की, आपोआप व्यसनाच्या आहारी माणूस जातो. काही केल्या ते सुटत नाही. असच काहीच चित्र बीड तहसील कार्यालयात देखील पाहायला मिळतं. पैठण येथे वाळू उपसा करून वाहतूक करण्यासाठी लाच घेऊन एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या तहसीलदारांनी बीडच्या तहसीलची अवस्था देखील भ्रष्टाचाराचा अड्डा बनवून ठेवली आहे. याचा फटका गोरगरिबांना बसू लागला आहे.
बीडच तहसील कार्यालय सध्या भ्रष्टाचाराने पोखरलं जात आहे. यामध्ये गोरगरीब जनता भरडली जात आहे. शेवटी कारभार हाकणाराच्या सवयीचे पडसाद देखील उमटायला लागतात याचीच प्रचिती जनतेला येऊ लागली आहे. सध्याचा बीड तहसील कार्यालयाचा कारभारी अतिवृष्टीमुळे शेतात वाहून आलेली वाळू उपसा करून वाहतूक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून एक लाख तीस हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पैठण येथे तहसीलदार पदावर असताना पकडला. नारायण वाघ नावाचा इसम तहसीलदार च्या चेंबर मधून एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडला. यावेळी पैठण तहसील कार्यालयाचे कारभारी चंद्रकांत शेळके आपल्या केबिनमध्ये उपस्थित होते. मात्र त्यांच्यावर कारवाई टाळण्यात आल्याचा आरोप त्यावेळी पैठणच्या नागरिकांनी केला होता. याच सवयीचे पडसाद बीड तहसील कार्यालयावर देखील पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. बीड तहसील कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. सध्या कोट्यावधी रुपयाच्या धान्य घोटाळ्याची चर्चा रंगली जात आहे. नेकनूर आणि चौसाळा येथील गोदाम कीपर विनोद दोडके यांचा धान्य गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. गरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतांना स्वतःची तुंबडी भरायची एवढाच विचार केला गेला.साठा नोंदी आणि वितरण चलनामध्ये विसंगती आढळली असून गेल्या वर्षभरातील रेकॉर्डमध्ये गडबडी समोर आली आहे. या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती नेमावी अशी मागणी होऊ लागली आहे.

मारहाणीच सत्र सुरूच; अपंग विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण

0

शिरूर (का) — तालुक्यातील रायमोह येथे रविवारी घडलेल्या घटनेने
खळबळ माजली आहे. अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने घेरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ही मारहाण दोन दिवसांपूर्वी घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शाळेच्या गेटबाहेरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेत सहभागी विद्यार्थी हे जालंदर विद्यालय, रायमोह येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप उघड झालेलं नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप शिरूर कासार पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार वा गुन्हा दाखल केलेला नाही. सतत घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तरुणांच्या गटागटातले वाद, शाळा-कॉलेज परिसरातील हाणामाऱ्या आणि रस्त्यावरची गुंडगिरी वाढल्याचं दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यावर झालेला हा हल्ला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देतो. दरम्यान, पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा परिसरात सुरक्षा वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या प्रकारावर पोलिसांकडून काय पावलं उचलली जातील आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अंबाजोगाईत 25 लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

0

बीड — बर्दापूरहून अंबाजोगाई कडे येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कार मधून प्रतिबंधित गुटखा तस्करी होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. गुटख्यासह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला. ही कारवाई बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास केली.
अंबाजोगाई भागात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अंबाजोगाई कडे गुटखा आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अंबाजोगाई जवळील शेलू आंबा टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा लावला. दरम्यान बर्दापूरहून अंबाजोगाई कडे येत असलेल्या इनोव्हा क्रिस्टा क्र.MH.14 GU.0699 ची थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीत पाच लाख 26 हजार दोनशे रुपयाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी बुधवारी पहाटे पाच वाजता केलेल्या या कारवाईत फारोख हामीद सय्यद वय 45 वर्षे रा. सय्यद गल्ली माजलगाव ता. माजलगाव या चालकाला पकडण्यात आले.गुटखा व इनिव्हा क्रिस्टा कार क्रमांक MH.14GU.0699 असा एकुण 25 लाख 26 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला.याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने केकान, गिते, भताने ,आंधळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.