Home Blog Page 29

परळीच्या माती, माणसांची बदनामी करणाऱ्यांना जनतेने उत्तर दिले – धनंजय मुंडे

0

नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी १५,६६४ मतांच्या लीडने विजयी

३५ पैकी २५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, ६ अपक्ष, तर तुतारी गटास केवळ दोन जागा

परळी — नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे या बहीण भावांनी मिळून महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकहाती विजय मिळवत, नगरपरिषदेसह मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या तब्बल 15 हजार 664 मतांनी विजयी झाल्या आहेत.

दरम्यान परळीतील 35 पैकी 25 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले असून सहा जागांवरती महायुतीतील बंडखोर असलेले सहा उमेदवार अपक्ष निवडून आले असून, या सहापैकी पाच उमेदवारांनी महायुतीच्या पॅनलला निकाला दिवशीच पाठिंबा दिला आहे; तर उर्वरित एक उमेदवार ही लवकरच पाठिंबा देणार असल्याचे कळते.

दुसरीकडे तुतारी गटाला केवळ दोन जागांवर विजय प्राप्त करता आला असून, पॅनल प्रमुख दीपक देशमुख यांचा वार्ड क्रमांक सहा मध्ये दारून पराभव झाला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या यश:श्री निवासस्थानी जाऊन पंकजाताईंना शुभेच्छा देत विजयी जल्लोष साजरा केला.

परळीच्या जनतेने आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद दिले, मात्र मागील काही दिवसांमध्ये परळीच्या मातीची आणि इथल्या माणसांची जी बदनामी राजकीय द्वेषातून केली जात होती, त्याला आज परळीच्या जनतेने मतांमधून उत्तर दिले असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. तर पंकजाताई मुंडे यांनी देखील महाराष्ट्रातील क्वचितच घडलेला संपूर्ण महायुतीचा हा परळी येथील प्रयोग यशस्वी ठरला असून आगामी निवडणुकांमध्ये देखील परळी मतदारसंघात महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाऊ असे सूतोवाच करत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

खा. बजरंग सोनवणे यांचा परळीतील दीर्घ मुक्काम वाया

परळीत मुंडे बहीण भावाला टक्कर देऊन पराभव करून दाखवतो म्हणणारे तुतारी गटाचे सर्वच नेते तोंडघशी

परळी व्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी लक्ष घातलेल्या गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तथा मुंडेंच्या भगिनी सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे विजयी

दीपक देशमुख यांचा प्रभाग क्रमांक ६ मधून ७०० पेक्षा अधिक मतांनी दारून पराभव

बीडमधील क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपली; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे विजयी

0

बीड — नगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामातून बीडकरांनी परिवर्तन घडवत क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे 3 हजार 779 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हातातून गेवराई निसटली असली तरी बीडमध्ये धक्कादायक कामगिरी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नगरपालिका निवडणुकीत आपलाच वर चष्मा असावा, नगरपालिका आपलीच मक्तेदारी असं समजून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे तरी न प निवडणुकीत रंगत चढली गेली. संपलेल्या भाजपला संजीवनी मिळाल्यामुळे नगरसेवक पदाच्या 14 जागा मिळवता आल्या. त्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये बळ देण्याचं काम केलं. परिवर्तनासाठी स्वतःची यंत्रणा कामाला लावली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी सोशल इंजिनिअरिंग चा वापर करत नगराध्यक्षपदाच्या विजयाची माळ पदरात पाडून घेतली. त्यांना 35 हजार 812 मत पडली. मतमोजणीच्या जवळपास दहाव्या फेरीपर्यंत भाजपने चुरशीची लढत दिली. निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विजय कोणाचा होईल हे सांगणं अवघड झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती बीडमध्ये पाहायला मिळाली.आ. संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत शहर पिंजून काढलं असलं तरी यंत्रणा काही प्रमाणात कमी पडली. अति आत्मविश्वास पराभवाला कारणीभूत ठरला. एकंदरच बीडचा राजकीय इतिहास पाहिला तर क्षीरसागर घराण्याची विशेषतः डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या घराची एकाधिकारशाही नगरपालिकेमध्ये निर्माण झाली होती. ही एकाधिकारशाही मोडीत काढण्याचं काम या निवडणुकीत झालं. त्यांनीही जनतेला गृहीत धरून स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर यांच्या सर्व धर्म समभावाच्या शिकवणीला तिलांजली दिली. त्यामुळे हक्काचा मतदार देखील दुरावला गेला. त्यामुळे परिवर्तन सहज शक्य झालं. 35 वर्षापासून सुरू असलेली मक्तेदारी मतदारांनी मोडीत काढल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजप उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना 35 हजार 33 मत पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे यांना 25 हजार 440 मत पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार — 18 ,भाजप — 14 राष्ट्रवादी शरद पवार – 11 शिवसेना ठाकरे गट – 01, शिवसेना शिंदे गट – 03,एमआयएम – 02 ,काँग्रेस – 01 असे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले आहेत

लिंबागणेश वाणीवस्तीवर बिबट्याचा हल्ल्यात  शेळी ठार, परिसरात भीतीचे वातावरण

0

लिंबागणेश.— तालुक्यातील लिंबागणेश येथील वाणीवस्ती परिसरात मध्यरात्री बिबट्याने घुसखोरी करत बाबुराव वाणी यांच्या गोठ्यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वाणीवस्ती तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील असा की, वाणीवस्ती येथील बाबुराव वाणी यांचे एकत्रित कुटुंब असून घरासमोर असलेल्या गोठ्यात गायी, म्हशी आणि शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोठ्यात जनावरांची धडपड सुरू झाल्याने बाबुराव वाणी यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काही जनावर पळताना दिसले.

बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करत असताना एका शेळीचा नरडा तोडलेला असून मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसले. याचवेळी बॅटरीच्या प्रकाशात समोरच बिबट्या उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकाश पडताच बिबट्या तात्काळ पळून गेला.

या घटनेनंतर वाणीवस्ती व परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याच्या भीतीने अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांमध्ये विशेषतः भीती असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना अयोध्या वाणी म्हणाल्या,“आम्ही शेतात राहतो. आमच्या अंगणात लहान मुले खेळत असतात. कुटुंबातील पुरुष कामानिमित्त बाहेर जातात. रात्री बिबट्याने शेळी ठार केल्यामुळे आम्हाला मोठी भीती वाटत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा.”

दरम्यान, वनविभागाने पिंजरे लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात लिंबागणेश परिसरात बिबट्या आढळून आल्यामुळे डॉ. ढवळे यांच्या मागणीनुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन जनजागृती केली होती.

परिसरात ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवावी, पिंजरे लावावेत, तसेच गस्त वाढवावी. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून सुरक्षिततेची हमी द्यावी

डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर 

सामाजिक कार्यकर्ते

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत

0

आष्टी — अहिल्यानगर पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या आष्टी तालुक्यातील चिंचाळ्यातील पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे वय 29 वर्ष यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.                                 कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली.सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा ता.आष्टी येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.

विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा

0

केज — विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजीत राडा झाला.कुऱ्हाड, कत्ती, काठ्यांचा वापर मारहाणी साठी केल्यामुळे काही जण जखमी झाले. ही घटना केज तालुक्यातील येवता या ठिकाणी घडली याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.‌
केज तालुक्यातील येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते 53 वर्ष यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. “आपण बारीने पाणी घेऊ” असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह
चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोकाटेच्या घोटाळ्यातल्या “माणिक”ला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

0

मुंबई — सदनिकेच्या घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.त्याची ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा कायम ठेवण्यात आली. ज्यानंतर कोकाटेंनी बुधवारीच 17 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज दि.19 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर कोकाटेला जामीन मंजूर करण्यात केला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटेंच्या दोन वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसली तरी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या कोकाटेंना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. त्यांना या क्षणाला कोणतीही अटक होणार नाही. पण, कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असेही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोकाटेंच्या आमदारकीबाबत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका घेताना स्वतःच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक माहिती सादर करावी लागते, असे असताना मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 ते 1997 या कालावधीत खोटी कागदपत्रे सादर करून नाशिक शहरात मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. त्या वेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली होती. या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या. मात्र सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर करण्यात आला. 1995 साली माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानुसार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात हा खटला सुरु होता. तीन वर्षांनी न्यायालयाने निकाल देत कोकाटे बंधूंना शिक्षा सुनावली. माजी मंत्री दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1997 पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे यांनी हे प्रकरण लावून धरलं. अखेर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच प्रकरणात आता कोकाटेंना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

तुपानंतर “पतंजलीच” लाल तिखटही खराब; सापडली घातक कीटकनाशके — केंद्र सरकार

0

नवी दिल्ली — योगगुरु रामदेव बाबा यांच्या “पतंजली फूडस्” उत्पादनावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पतंजलीचा तूप वादात सापडल्यानंतर आता लाल मिरची पावडर मध्ये देखील कीटकनाशकांचे प्रमाण दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2024 -25 या वर्षात मसाल्यांच्या गुणवत्तेसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पतंजलीच्या उत्तराखंडमधील उत्पादन युनिटमधून लाल मिरची पावडरचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणीत कीटक नाशकांचे अवशेष निर्धारित मॅक्सिमम रेसिड्यू लिमिटपेक्षा जास्त आढळले आहेत.या धक्कादायक निष्कर्षानंतर संबंधित प्राधिकरणाने तातडीने रिकॉल आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, पतंजली फूड्सने बाधित उत्पादने बाजारातून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, अमुल ब्रँडच्या कोणत्याही उत्पादनात अशा प्रकारची त्रुटी आढळली नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. पतंजलीच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह
पतंजलीची उत्पादने वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांतही अशा घटना घडल्या आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला पतंजलीचे तूप क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले होते, ज्याबद्दल उत्तराखंडमधील न्यायालयाने कंपनीला 1.40. लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मे 2024 मध्ये सोन पापडीच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे पतंजलीच्या एका असिस्टंट मॅनेजरसह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने निलंबित केले होते. यामध्ये मधुग्रिट, लिपिडोम आणि स्वसारी सारख्या प्रसिद्ध औषधांचा समावेश होता.
खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारे मिळून एफएसएसएआयच्या माध्यमातून वर्षभर तपासणी मोहिमा राबवतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या काही काळापासून एमडीएच आणि एव्हरेस्ट नंतर आता पतंजलीचेही मसाले वादात सापडल्याने भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.

बहिणी सोबत ऊस तोडीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

केज — मोठ्या बहिणी सोबत ऊस तोडणी साठी आलेल्या बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील एका गावातून उघडकीस आली आहे.याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अत्याचार पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नाही.ती नातेवाइकांकडे असते. अशा भीषण परिस्थितीत 6 वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहीण आणि दाजी धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते. सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते.यावेळी आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय 34 वर्ष, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई हा देखील तिथेच होता. दरम्यान सहा वर्षांची बालिका नैसर्गिक विधीसाठी जात असताना, नराधम लक्ष्मणने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. ही घटना माहिती होताच पोलिसांत धाव घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला होता. मात्र, युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीला कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले. बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात पाॅक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

गेवराईतून भर दिवसा अपहरण झालेली मुलगी अखेर सापडली;आरोपी मात्र फरार

0

गेवराई — शहरातील पंचायत समिती जवळील चौकातून अपहरण केलेल्या मुलीला सोडवण्यासाठी पथक तयार करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी अपहरण नाट्यात पाठलाग करून परभणी शहरातून मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात यश मिळाले. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून तीन जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या चौकातून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी घराकडे पायी जात होती यावेळी अचानक एक चार चाकी गाडी तिच्याजवळ आली आणि फिल्मी स्टाईलने त्या मुलीला गाडीत टाकून पळवून नेले. मुलीने विरोध करत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण तीला दोघांनी मारहाण करुन जबरदस्तीने वाहनात घातले ही घटना गुरूवारी दुपारी 12 वाजता दिवसाढवळ्या घडल्याने खळबळ उडाली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सदरील वाहन हे शास्त्री चौकातून महामार्गाने शहागडच्या दिशेने गेले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबंधित गाडीचा पाठलाग करून शोध सुरू केला होता.तर सर्वत्रच हा संदेश पोहोचवला होता. यामुळे तपासाला वेग आला. पोलीस सर्वत्र तपास करीत असताना अपह्रृत मुलगी परभणी शहरात सुखरुप असल्याची माहिती मिळाली आणि सुटकेचा निःश्वास सोडून गेवराई पोलीस परभणीच्या दिशेने गेले. या ठिकाणी अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतले आहे. काही तासात गेवराई पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण आरोपी काही हाती लागले नाही. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर, दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारधी, पोलीस कॉन्स्टेबल आरेफ बागवान यांनी व परभणी पोलिसांनी केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाचे अटकेचे आदेश

0

माणिकराव कोकाटे याचा राजीनामा

मुंबई — नाशिक सत्र न्यायालयानं अटकेचं फर्मान काढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पदरी निराशा पडली आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पण न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होईल. त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाची पत्र विधिमंडळाला मिळाल्यावर कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याच वृत्त मिळत आहे ‌

शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. दुसरीकडे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोकाटे आजारी असल्यानं, त्यांच्यावर उपचार सुरु असल्यानं या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती कोकाटे यांच्या वकिलांकडून न्यायालयाला करण्यात आली होती. पण कायद्यापुढे सगळे समान आहेत, असं न्यायालयानं कोकाटे यांच्या वकिलांना सुनावलं. त्यामुळे कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. अटक टाळण्यासाठी कोकाटे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, एखाद्याला २ किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होणं निश्चित मानलं जात आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधिमंडळ यासंदर्भात निर्णय घेईल. अद्याप तरी विधिमंडळाला न्यायालयाच्या निकालाची पत्र मिळालेली नाही. माणिकराव त्यांच्या विधानांमुळे सातत्यानं वादात राहिले आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषिमंत्रिपद देण्यात आलं होतं. पण त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारवर अनेकदा नामुष्की ओढवली. अखेर त्यांच्याकडून कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं. त्याऐवजी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.