Home Blog Page 16

मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांचे दागिने लुटणारी आंतरजिल्हा टोळी पकडली

0

आष्टी — तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अंभोरा पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी असून, यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ही टोळी गडावरील गर्दीचा फायदा घेत लूट करायचे.महिला भाविकांना धक्काबुक्की करणे, बोलण्यात गुंतवणे किंवा गळ्यात हात टाकून हातचलाखीने दागिने लंपास करणे, अशी यांची पद्धत होती. १९ डिसेंबर २०२५ रोजी या संदर्भात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे पाथर्डी येथील सुधीर कराळे याला ताब्यात घेतले. चौकशी अंती त्याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. या मोहिमेत पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आदिनाथ भडके, हरिभाऊ बांगर, कृष्णा नरवडे आणि जयराम उबे यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

पतीकडून अनैसर्गिक कृत्य पैशासाठी छळ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

केज — एका  विवाहित महिलेने पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच दहा लाख रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिलेचा पती तिला वारंवार जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने संबंध करण्यास भाग पाडत असून फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता. यास नकार दिल्यास तिच्यावर मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यही पैशाच्या मागणीसाठी तिचा छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, दोन नंदा व इतर अशा सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ८५, ६४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरकुलधारकांना मोफत वाळूचे तहसीलदार शेळकेंच्या हस्ते वितरण

0

बीड –“घरकुल उभं राहावं , भिंतींना आधार मिळावा ,गरीबाच्या घरावर वाळूचा भार न पडावा…”या भावनेतून राज्य शासनाने राबविलेली मोफत वाळू वितरणाची योजना बीड जिल्ह्यात प्रभावीपणे आकार घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे .
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी बीड जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू असून, ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना थेट दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न प्रत्यक्ष जमिनीवर उतरल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर हे वेळोवेळी विभागस्तरावर आढावा घेत मार्गदर्शन करत असून, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हास्तरावर संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बीडचे अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क साधून वाळू उपलब्धता, प्रस्ताव व वितरण याबाबत समन्वय साधला आहे.
बीड तालुक्यात घरकुल योजनेंतर्गत एकूण २५ हजार ३५३ लाभार्थी उद्दिष्ट असून त्यापैकी २३ हजार ३८६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १९ हजार ८७५ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला असून सध्या सुमारे ७ हजार १०० घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या घरकुल बांधकामासाठी वाळू ही अत्यावश्यक बाब असल्याने मोफत वाळू वितरण योजना ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
बीड तालुक्यात दहा वाळू घाट निश्चित –

बीड तालुक्यासाठी दहा वाळू घाट निश्चित करण्यात आले असून सिंधफणा नदीपात्रातील विविध ठिकाणी हे घाट आहेत. रंजेगाव, रामगाव, बऱ्हाणपूर, आडगाव, कुक्कडगाव, खुंड्रस , साक्षाळ पिंपरी आदी ठिकाणी वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अंधापुरी, पिंपळादेवी, नागापूर बु., खांडे पारगाव , पारगाव सिरस या गावांमध्ये नव्याने नोंदणी केलेले प्लॉट असून येथून वाळू उपलब्ध करून देण्यात येत आहे .
खांडे पारगाव येथे प्रत्यक्ष वितरण

या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील अथरवन पिंपरी जवळील टुकूर नदीपात्रात खांडे पारगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वितरण करण्यात आले. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
या वेळी घरकुल लाभार्थी मधुकर तुकाराम सपकाळ व विकास बाबुराव आमटे यांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत मोफत वाळू वाटप करण्यात आले. २५ पैकी १२ लाभार्थ्यांना वाळू वाटप पूर्ण – याबाबत माहिती देताना ग्राम महसूल अधिकारी अक्षय ढोपे यांनी सांगितले की, आतापर्यंत एकूण २५ घरकुल लाभार्थ्यांपैकी १२ लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वितरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने वाळू दिली जाणार आहे . सध्या सुमारे ६०० ब्रास वाळूचे वितरण होणार असून, ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध आहे तेथील प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा सहभाग 

या वेळी खांडे पारगाव गावचे उपसरपंच अनील आबा आमटे , दत्ता सुरवसे, नवनाथ बापू सपकाळ, रवींद्र सपकाळ तसेच अथरवन पिंपरी येथील उपसरपंच अशोक शिंदे, प्रवीण शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रशासनास सहकार्य करत हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले,
“ बीड तालुक्यातील लहान नद्या, ओढे, नाले यामध्ये नैसर्गिकरित्या साठणारी वाळू शासन धोरणानुसार घरकुलधारकांना मोफत देण्यात येणार आहे. यामुळे अवैध वाळू उपसा थांबेल आणि गरजू नागरिकांना थेट लाभ मिळेल. ”
“घरकुलासाठी वाळू मिळवणे आमच्यासाठी मोठी अडचण होती. प्रशासनाने थेट नदीपात्रातून वाळू उपलब्ध करून दिल्यामुळे आमचा खर्च वाचला,” अशी प्रतिक्रिया एका लाभार्थ्याने व्यक्त केली. गावकऱ्यांनी प्रशासन व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले.
ग्रामीण घरकुलांसाठी दिलासादायक उपक्रम – एकीकडे अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई आणि दुसरीकडे शासन निर्णयानुसार पारदर्शक पद्धतीने मोफत वाळू वाटप — या दोन्ही बाबींचा समतोल राखत बीड जिल्ह्यात प्रशासन काम करत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.
“घर बांधणं स्वप्न नाही ,योग्य हात मिळाले तर सत्य होतं…”ग्रामीण भागातील घरकुलधारकांसाठी हा उपक्रम निश्चितच दिलासादायक ठरणार असून, पुढील काळातही शासन धोरणानुसार अशीच कार्यवाही सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, भरारी पथकांच्या माध्यमातून 10वी12वी परीक्षा होणार!

0

गैरप्रकार करणारांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करणार — जॉन्सन

बीड — जिल्ह्यात फेब्रुवारी–मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भात संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले असून, परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
परीक्षांचा पारदर्शकपणा राखणे, विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर येणे आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणे, या उद्देशाने हे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर आवाज रेकॉर्डिंगसह सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कंट्रोल रूमच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवरील चित्रणावर थेट नजर ठेवण्यात येणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार असून, परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांच्या दिवशी भरारी पथक व बैठे पथक सक्रिय राहणार असून, परीक्षा केंद्र परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा स्तरीय दक्षता समिती गठीत

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अध्यक्ष, पोलीस अधिक्षक नवीनीत कॉवत सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जितिन रहेमान सदस्य, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी सदस्य योजना शिक्षणाधिकारी सदस्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव आहेत. दरम्यान कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असे मत व्यक्त करत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पालक, शिक्षक, अधिकारी व नागरिकांनी या अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे बीडकरांनी घेतले दर्शन; पूर्णाकृती पुतळा उभारणार

0

श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथे झाले अस्थीचे विसर्जन

गेवराई — बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचा अस्थीकलशन दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी शोकाकुल वातावरणात अस्थीकलशाचे दर्शन घेताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बीडकरांचे डोळे पानावले. यावेळी अतिशय जड अंतःकरणाने उपस्थितांनी अस्थीकलशाचे दर्शन घेताना माना झुकवल्या.

दुपारी २ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कार्यालयात अस्थीकलश ठेवण्यात आला होता. त्यानंतर आ. विजयसिंह पंडित अस्थीकलश घेऊन श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथे रवाना झाले. शोकाकुल वातावरणात अस्थी विसर्जन होताना उपस्थितांनी अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या. आपला लाडका नेता आपल्याला सोडून गेल्याची भावना प्रत्येकाने यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे अकस्मिक दुःखन निधन झाले. स्व.अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आजही स्व.अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत हे मन मानायला तयार नाही. स्पष्टोक्तेपणा, धाडसी निर्णय आणि कामावरचा विश्वास ही दादांची खरी ओळख होती. संकाटातही न डगमगता राज्याच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून अजितदादा कायम स्मरणात राहतील. स्व.दादांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील जनतेने नगर पालिका निवडणुकीत भरभरून आशिर्वाद दिले. बारामतीसारखा बीड शहराचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय दादांनी केला होता, असे दादा बीडकरांच्या कायम स्मरणात राहावेत यासाठी शहरात स्व.अजितदादा पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही केला असेही ते यावेळी म्हणाले.

दुपारी २ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कार्यालयात स्व.दादांचा अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर आ. विजयसिंह पंडित अस्थीकलश घेऊन श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथे रवाना झाले. यावेळी उपस्थितांनी अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी भावनिक वातावरण बनले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आमदार बाळासाहेब आजबे, भिमराव धोंडे, संजय दौंड, रमेश आडसकर, बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कल्याण आखाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, सभापती शेख निजाम, दिलीप गोरे, अमर नाईकवाडे, संपादक शेख मुजीब, शेख तय्यब, बळीराम गवते, जैतुल्ला खान, जकी सौदागर, बाळासाहेब गुंजाळ, संजय उडान, अशोक हिंगे, प्रज्ञाताई खोसरे, ॲड.राजेंद्र राऊत, सुनिल पाटील, राजाभाऊ औताडे, अयुब पठाण, वैजिनाथ साळुंके, कल्याण आबुज, भागवत तावरे, भाऊसाहेब नाटकर, जगन्नाथ काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बीड शहरातील अजितदादाप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यावर कर्जाचा डोंगर, तिजोरीवर ताण; अर्थसंकल्पातून खर्चाला लागणार कात्री ?

0

मुंबई — राज्याचा आगामी अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, यंदाचा अर्थसंकल्प  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असल्याची चर्चा आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्याआधीच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, मंजूर तरतुदींपैकी निम्म्याहून थोडाच अधिक निधी विभागांना देण्यात आला असून प्रत्यक्षात खर्च झालेला निधी त्याहूनही कमी आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला मोठी कपात लागण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम विकासकामे, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय खर्चावर होणार आहे. राज्यावर वाढत चाललेले कर्ज आणि महसूल संकलनाची मंद गती ही सरकारसमोरील मोठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी सुमारे 52 टक्केच निधी विविध विभागांना वितरित करण्यात आला आहे. यातील प्रत्यक्ष खर्च मात्र केवळ 40 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. यामुळे अनेक विभागांची कामे रखडली असून नियोजन आणि अंमलबजावणीतील तफावत पुन्हा एकदा समोर आली आहे.

वित्तीय शिस्त पाळली जाईल, मार्चअखेर घाईगडबड होणार नाही, असे दावे दरवर्षी केले जातात. मात्र प्रत्यक्षात आर्थिक वर्षाच्या शेवटी मंत्रालयात निधीसाठीची हालचाल वाढलेलीच दिसते. यंदाही येत्या काही आठवड्यांत विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे.

वित्त विभागाने यंदा खर्चावर कडक नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत. वेतनावर होणारा खर्च मर्यादित ठेवण्यात येणार असून, दैनंदिन कार्यालयीन खर्च, वीज-पाणी बिले, इंधन, भाडे आणि इतर बाबींवरही मर्यादा घालण्यात येणार आहेत. मात्र कर्जाची परतफेड, त्यावरील व्याज, जिल्हा नियोजन निधी आणि आमदार निधी यांना कपातीपासून वगळण्यात आले आहे.

लोकप्रिय योजनांचा तिजोरीवर ताण
लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला सुमारे 36 हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या मोठ्या खर्चामुळे नियमित विकासकामांसाठी उपलब्ध निधी कमी होत असून, अनेक योजनांना कात्री लावावी लागत आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये 20 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उत्पन्न आणि कर्जाची स्थिती
राज्याचे अंदाजित महसूल उत्पन्न 5.61 लाख कोटी रुपये असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत केवळ 66.24 टक्के उत्पन्न जमा झाले आहे. त्याचवेळी राज्यावर सध्या 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, दरवर्षी सुमारे 64 हजार कोटी रुपये परतफेडीसाठी खर्च करावे लागत आहेत. पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज आवश्यक असले तरी हे कर्ज लवकरच 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविद्यालयात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार; आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

0

बीड — नेकनूर येथील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.२) दोषी ठरवले. न्यायालयाने या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशाल जाधव रा. नेकनूर, ता. जि. बीड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही संतापजनक घटना २८ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. पीडित महिला नेकनूर येथील एका महाविद्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी दुपारी विद्यार्थी आणि शिक्षक बाहेर गेल्याने ती एकटीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत बसली होती. त्यावेळी आरोपी विशाल जाधव महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत आला. पीडितेने त्याला हटकले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

संशय आल्याने महिलेने तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशालने बळजबरीने तिचे तोंड दाबले आणि तिला ओढत भिंतीच्या बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक सरकारी वकील अनिल बी. तिडके यांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी विशाल जाधव याला दोषी ठरवले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल तिडके यांनी बाजू मांडली, त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सहकार्य केले.
तत्कालीन तपास अधिकारी, महिला पोलिस उपनिरीक्षक एस. के. कोळी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा जबाब, डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पुरावे महत्त्वाचे ठरले.

बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

0

गेवराई — तालुक्यातील तलवाडा येथील अंबिका नगर येथील रहिवासी असलेला रामेश्वर मोहन शिंगणे वय २५ वर्ष काहीं कारणास्तव रागाच्या भरात दि.३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी आपल्या आईला सांगून तो बाहेर निघून गेला होता. मात्र घरी न परतल्याने त्याची सर्वत्र शोधा-शोध घेतली परंतू तो सापडला नाही. अखेर आज रामेश्वर शिंगणे याचा मृतदेह अंबिका नगर भागातील विहिरीत रामेश्वर उर्फ गोरख शिंगणे याचे प्रेत नागरिकांना आढळूनआले. याप्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि मनोज निलगेकर यांना माहिती मिळताच उपनिरीक्षक कैलास अन्नादास, बीट अंमलदार अंजन गडदे, पोह नारायण काकडे घटनास्थळी दाखल झाले.पाण्यामुळे रामेश्वरचा मृतदेह पुर्णपणे छिन्न-विच्छिन्न झाला होता. त्यामुळे जागीच शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

लग्नात बदनामी होईल या भीतीने नवरदेवानेच मित्राचा काढला काटा

0

बीड — पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी वय 30 वर्ष याचा मृतदेह आढळून आला होता.या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चांदचा मित्र अतिक गुलाब तांबोळी रा. इस्लामपुरा पेठ बीड यानेच दीड लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत चांद याचे आरोपी अतिककडे १ लाख ५० हजार रुपये होते. तो या पैशांचा सतत तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होते. पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन, असा इशारा चांदने दिला होता. यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीने ग्रासलेल्या अतिकने रविवारी रात्री चांदला गाठले आणि दगडाने ठेचून हत्या केली.
सोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपी अतिक तांबोळीला बेड्या ठोकल्या.
चांद रविवारी बीडला आला होता, तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याने पुतण्याला फोन करून गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल, असे सांगितले होते. ही त्याची शेवटची विचारपूस ठरली. आरोपी अतिक तांबोळी यास तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे,अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड,बाळु सानप, राहुल शिंदे,मारूती कांबळे,युनुस बागवान, यादव, सुरवसे, अशफाक, परझणे,शेख, हराळे यांनी केली आहे.

बीड व पुणेच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार

0

मुंबई — अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. शनिवारी त्यांनी शपथही घेतली. त्यानंतर आज बीड तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे. आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. ही जबाबदारी कोणाला मिळणार, याची चर्चा रंगली होती. परंतु तेव्हा अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले होते. ते अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.