Home Blog Page 115

एकादशीला ‘योग’जुळले; जयदत्त क्षीरसागरांच्या रूपाने “या” पुतण्याला पांडुरंग पावले!

0

बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातली लढत रंजक व चूरशीची बनत असताना निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने पुतणे योगेश क्षीरसागर यांना एकादशीला पांडुरंग पावले असे म्हटले जाऊ लागले आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आज पत्रकार परिषद घेऊन जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जाती जातीतील संघर्षाची दरी कमी करण आज काळाची गरज आहे.अंतर्मनाने जी हाक मला दिली त्यावरुन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला.जनता माझा परिवार आहे.विस्तारीत परिवाराची जबाबदारी असून विकासाची घडी बसवण्यासाठी संघटीत होऊन योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही ही बाब लक्षात आली.त्यामूळे वाढप्या आपला असला की,शेलक ताटात पडत हे वाढप्याच काम योगेश करणार असल्याने त्यांच्या पाठीशी सर्व जनतेने मतदानाच्या रूपाने उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

अनिल जगताप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; जिल्हा प्रमूख पदाचा राजीनामा

0

बीड — गेल्या चाळीस वर्षांपासून मी प्रामाणिकतेने आणि निष्ठेने शिवसेनेत सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून मी जनसेवा करत आलो आहे, सर्वसामान्यांचे समस्या अडचणी सोडवत आलो आहे. परंतु वारंवार शिवसेनेने माझ्यावर अन्याय करत मला डावलले आहे. जेंव्हाही विधानसभा निवडणुकीची तयारी केली तेंव्हा तेंव्हा मला सोडून उमेदवारीची माळ दुसर्‍याच्या गळ्यात घालण्यात आली.

बीडमधील अठरा पगड जाती धर्मातील जनसमुदाय माझ्याजवळ येऊन वारंवार दुःख व्यक्त करतो की, सातत्याने शिवसेनेकडून अन्याय तुमच्यावर होतो तरी तुम्ही का हा अन्याय सहन करतात? पण आता बस्स, मी वैतागलोय या अन्यायाला. आता सहन होत नाही. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी पदाधिकारी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र ठोकून माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत. असे अनिलदादा जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. इथून पुढे मला मानणारी सर्व जाती धर्मातील जनताच माझी नेता आणि सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील हाच पक्ष आहे. मी बीड विधानसभेचा अपक्ष उमेदवार असून माझा विजय निश्‍चित होणार आहे आणि मी विजयी झाल्यानंतर कोणत्याच पक्षात जाणार नाही व कोणत्याच पक्षातील नेत्याला मानणार नाही.असे शिवसेनेला वैतागलेल्या अनिलदादा यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
अनिलदादा जगताप यांनी आज दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला कार्यलयात पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाला वैतागून आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. याबरोबरच बीड शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी देखील आपला राजीनामा दिला असल्याचे अनिलदादा यांनी स्पष्ट केले.

पवार साहेबांच्या सभेतून अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश;आ.संदीप क्षीरसागरांना मिळणार बळ

0

बीड — मतदारसंघातील अनेक मातब्बरांचा खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या सभेत जाहीर प्रवेश झाला. बीड शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रभाव असलेले अनेक प्रभावी चेहरे आ.संदीप क्षीरसागरांच्या सोबत आले आहेत.

शनिवारी (दि.९) रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ खासदार शरदचंद्र पवार यांची विजयी सभा झाली. यावेळी बीड मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील अनेक मातांनी खासदार पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये बीड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विष्णू वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष हाजी नसीम इनामदार, माजी उपनगराध्यक्ष शाकेर भाई, बीड माजी पंचायत समितीचे उपसभापती नारायण परजणे, बहिरवाडीचे माजी सरपंच आसाराम गायकवाड, माजी नगरसेवक शेख शाकेर, माजी नगरसेवक अजीम खान, माजी नगरसेवक जलील खान पठाण, बीड पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर (बी.एस.)कदम, फारोकी साहेब, अय्युब खान साहेब आदी प्रभावी असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात हे प्रवेश झाल्याने आ.संदीप क्षीरसागरांना या मंडळींच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे.

हाताने भोकं पाडलेल्या नौकेत प्रकाश सोळंके स्वार; ती खोल गर्तेतच बुडणार!

0

बीड — नौकेतून प्रवास करायचा तर ती चांगली असावी लागते. मात्र त्या नौकेलाच स्वतःच्या हाताने भोक पाडून त्यावर स्वार होत पैलतीरावर नेण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मघात समजला जातो. हाच नियम राजकारणात देखील आहे. माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेली भूमिका.रस्त्यांची झालेली चाळणी, शेतकऱ्यांची साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेली पिळवणूक, पेशवाईच्या राजवस्त्रासाठी रघुनाथराव पेशव्यांसारखी पुतण्यासोबत खेळलेली घातकी चाल या गोष्टी घातक ठरू लागल्या आहेत. मतदारांनी इतके वर्ष ठेवलेला विश्वास आता पूर्ण उडाल्याने सोळंकेची नाव निवडणुकीच्या गर्तेत बुडणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.

प्रकाश सोळंके यांनी माजलगावच्या राजकारणात थोडं थोडं कर नव्हे तर वीस वर्षापासून आधीराज्य गाजवलं. जनतेने नेहमीच आता तरी सुधारणा करतील मतदार संघाचा कायापालट होईल अशी धारणा ठेवली मात्र ही भावना माजलगावकरांसाठी आत्मघातकी ठरली. मतदार संघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली. 90 ते 100 गावातील लोकांना जायला यायला धड रस्ता नाही. माजलगाव तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या मनूर देवी मंदिराचा माजलगाव- मनूर -गोविंदपूर – लूखेगाव या रस्त्यावरून जाणाऱ्यांना गुडघ्या एवढ्याल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. ढोपराची हाड या रस्त्यावरून जाताना खिळखिळी होतात. तीच स्थिती दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या माजलगाव मंजरथ रस्त्याची आहे. एकूणच पाहिलं तर हे धर्मकार्य विरोधीच भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे अशी भावना या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांची निर्माण होते. कालवा दुरुस्ती असो की उपसा जलसिंचन योजना असो याचे प्रत्येक काम स्थानिक गुत्तेदारांना कधीच दिले नाही. मतदारसंघा बाहेरील लोकांना ही काम देऊन कमिशन घेतल्याचा आरोप अनेक वेळा प्रकाश सोळंके यांच्यावर केला गेला. तीच स्थिती जलजीवन च्या कामात देखील झाली. येणाऱ्या काळात या कामात झालेल्या भ्रष्टाप्रचारामुळे अनेक गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही कर्तबगारी कमी की काय ? म्हणून पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनात वादग्रस्त भूमिका घेऊन समाजाला डिवचत वातावरण कलूषीत करण्याचं काम प्रकाश सोळंके यांनी केलं. राजकारणाच्या नौकेला त्यांनी स्वतःच्या हातानेच मोठं भगदाड पाडलं. याच पडलेल्या भगदाडामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेत त्यांचा चाहता वर्ग माजलगाव मतदार संघात मोठा असताना देखील आघाडी घेता आली नाही. परिणामी त्यांना कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाला देखील सोळंकेच्या कर्तबगारीची काळी किनार लागलेली आहे.
साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील गोरगरीब शेतकऱ्यांची जितकी पिळवणूक करता येईल तितकी पिळवणूक प्रकाश सोळंके यांनी केली. शेतकरी आंदोलन या भागात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तरी त्यांच्यावर काही प्रमाणात का होईना वचक राहिला. नाहीतर जुन्या काळातील सरंजामशहासारखं त्यांनी शेतकरी जात्यातून अक्षरशः दळून काढला असता. अशी परिस्थिती या भागात त्यांनी निर्माण करून ठेवली. अनेक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जावा यासाठी रक्ताचे अश्रू गाळावे लागले आहेत. हे शेतकरी कसा बरे विसरेल? जे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर त्यांची जी वर्तवणूक राहिली तीच वर्तवणूक स्वतःच्या घरात देखील राहिली. दिलेलं वचन पाळायचं नाही. घातकी राजकारण करत स्वतःची पोळी भाजायची एवढंच धोरण अजूनही कायमच ठेवलं. परिणामी लागलेल्या सवयीमुळे त्यांनी पेशवाईचा इतिहास कसा घडला होता. याचं उदाहरण देखील त्यांनी दाखवून दिलं. पेशवाईची राज वस्त्र अंगावर चढावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा घात केला होता. तशीच स्थिती यांनी देखील केली. राजकीय निवृत्तीची घोषणा करून उत्तराधिकारी आपला पुतण्या असल्याचं मोठ्या थाटात जाहीर केलं. त्यातून काही काळ का होईना मतदारसंघात त्यांचा मोठेपणा जनतेला भावला मात्र ऐनवेळी आमदारकीची राजवस्त्र स्वतःच्या अंगावरच राहावीत यासाठी राजकीय सारीपाटावर अनुभवी चाली खेळत पुतण्याचा पत्ता कट केला. स्वतःच्या नावाची (उमेदवारीची) घोषणा पक्षश्रेष्ठींना करायला लावली. इथंच सगळ्यात मोठं कधीच न बूजल्या जाणार आणखी एक भोक पडलं. या घटनेची सारवासारव करत त्यांचा पुतण्या राजकीय मंचावरून हा आमचा कौटुंबिक निर्णय होता. मी काकावर नाराज नाही असं सांगत असला तरी जनमताला मात्र हे पटलेलं नाही.
ही राजकीय नौकेला हाताने पाडलेली भोक नाहीत का? “बुंद से गई वो हौद से नही आती” अशी म्हण प्रचलित आहे. आठ दहा दिवसाच्या प्रचारकाळात न बुजवता येणारी भोकं सोळंके कशी बुजवणार? राजकीय नौका निवडणुकीच्या पैल तीरावर कशी पोहोचणार? ती गर्तेतच बुडणार असल्याचं सध्या तरी चित्र माजलगाव मतदार संघात दिसत आहे. सोळंकेच्या नौकेत पाणी शिरत असून नौका बुडण्याच्या मार्गावर आली आहे.सोळंके विरोधात वातावरण प्रचंड तापू लागलं आहे.

अठरापगड जातींचा डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा

0

बीड —  महायुतीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा मिळत आहे. बीड शहरात रविवारी (दि.१०) माळी, विरशैव लिंगायत, भावसार, कोष्टी, साळी, गवळी, लोणारी, रंगारी, बुरुड समाजबांधवांशी मेळाव्यातून डॉ.योगेश क्षीरसागर यांनी संवाद साधला.

विविध समाजाच्या बैठकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याची ग्वाही समाजबांधवांनी दिली. माळी समाजाच्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगराध्यक्ष बाबुराव दुधाळ, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, नामदेव दुधाळ, मोहनराव गोरे, सतीश शिंदे, ॲड.राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक किशोर काळे, लक्ष्मण दुधाळ, नितीन साखरे यांच्यासह माळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, विविध जातीधर्माच्या संयुक्त मेळाव्याला डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी संबोधित केले. या मेळाव्यास गवळी समाजाचे नेते तथा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, दत्ता परळकर, तेली समाजाचे आदित्य पवार, रजपूत समाजाचे सूरजसिंग जयसिंग चुंगडे, माजलगावकर मठाचे प्रमुख अनिलअप्पा मिटकरी, विरशैव लिंगायत समाजाचे अशोकअप्पा चिफाडे, शिवप्रकशअप्पा कानडे, कोष्टी समाजाचे दगडूअप्पा म्हेत्रे, सुरेश आसलेकर, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू ताटे, भावसार समाजाचे प्रकाश कानगावकर, लोणारी समाजाचे अनिलअप्पा मुळेकर, बुरुड समाजाचे अर्जुन वडतिले यांच्यासह समाजाचे नेते, संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत; वीर सावरकर प्रतिष्ठानचा पाठिंबा

वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व संस्था संचालक, हितचिंतकांची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेत सामाजिक परिस्थिती विषयांवर चर्चा केली. तसेच, परशुराम आर्थिक विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत केले. यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यात आला.

बाबुराव पोटभरे यांचा मिळाला पाठिंबा

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोठभरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. काल बाबुराव पोटभरे यांनी बीडमध्ये पक्षाची बैठक घेतली. त्यांनतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला. या बैठकीस महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

निवडणूक कर्तव्यात कसूर; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

0

बीड — निवडणूक काळात सतर्कता बाळगली जात असताना चेक पोस्टवर नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने कामात दांडी मारल्याच्या कारणावरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरसुंबा रोडवरील रत्नागिरी फाट्यावर वाहनांची तपासणी करण्यासाठी चेक पोस्ट उभारण्यात आला आहे या ठिकाणी पोलीस अंमलदार सुदाम सुखदेव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंमलदारांना या ठिकाणी बारा तासांची ड्युटी देण्यात आलेली आहे. मात्र 9 नोव्हेंबर रोजी सुदाम शेलार हे गैरहजर राहिले. ते कर्तव्यावर हजर झाले नाही म्हणून त्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सहशिक्षक अण्णा कसबे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात सुदाम शेलार यांच्या विरोधात कलम 134 लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भैया ना निवडून द्या; त्यांना सत्तेत मोठी जबाबदारी देणार — खा.शरदचंद्र पवार 

0

शरद पवारांच्या सभेने संदीप भैय्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

बीड — बीड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.शरदचंद्र पवार यांनी रविवारी (दि.१०) रोजी बीड शहरात सभा घेतली. यावेळी, “राज्यात सत्ता आल्यानंतर संदीपभैय्या महत्वाच्या पदावर बसलेले असतील, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.” असे उद्गार बीडच्या सभेत खा.पवार साहेबां यांचे होते.


बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवारी (दि.९) रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ, खा.शरदचंद्र पवार यांनी विजयी सभा घेतली. यावेळी, राज्यात आणि देशातील जनतेच्या मनात या सरकारच्या धोरणांमुळे एकप्रकारची अस्वस्थता आहे. बळीराजाला आपला जीव द्यावा लागत आहे. राज्यात उद्योगधंद्याची गरज असताना उद्योगधंदे बाहेर पाठवले जात आहेत. आमचे सरकार आल्यानंतर उद्योगधंदे वाढीसाठी आम्ही काम करू. अडचणीच्या काळात संदीपभैय्या विचारासोबत आणि भूमिकेसोबत राहीले त्यामुळे आता तुम्ही संदीपभैय्यांच्या मागे उभे रहावे. आता चांगला आल्यानंतर‌ सर्वप्रथम संदीप भैय्यांसारख्या निष्ठावंताचा विचार होईल.‌ खा.पवार साहेबांच्या सभेला बीड

लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, राजे भूपनसिंह होळकर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.बदामराव पंडीत, माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी आ.संगिताताई ठोंबरे, प्रा.नितेश कराळे सर, रविंद्र दळवी, अजिंक्य चांदणे, राहुल सोनवणे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, उल्हास गिराम, कॉ.नामदेव चव्हाण, कॉ.मोहन गुंड, अशोक येडे, सुभाष लोनके आदी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

सिमेंट ट्रकच्या टायर खाली येऊन पोलिसाचा मृत्यू

0

बीड — सिमेंट घेऊन जाणार्‍या ट्रकच्या पाठीमागील टायरच्या खाली आल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास शहरातील अंबिका चौकात पांगरी रोडवर घडली.

सुनील सुंदरराव घोळवे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. आज दुपारी 12 च्या सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. 44 यू. 9871 सिमेंट
घेऊन अंबिका चौकातून पांगरी रोड कडे चालला होता. यावेळी पोलीस कर्मचारी दुचाकी क्रमांक एम. एच. 44 ए ए 9076 वरून जात होते. यावेळी ट्रक जवळून जाताना अचानक ते दुचाकीवरुन पडले अन् ते ट्रकच्या पाठीमागील चाका खाली आले.यात पोलीस कर्मचारी सुनील घोळवे यांचा जागीच मृत्यु झाला. घटना घडताच पोलीस उपाधीक्षक विश्‍वांभर गोल्डे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काहींच्या डोक्यात सत्ता गेली; परळीत गुंडगिरी वाढली त्यांना हद्दपार करा — शरद पवार

0

परळी — परळी सह जिल्ह्यात वाढलेल्या गुंडगिरीने जनतेत दहशत आहे. व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसत आहे. ज्याला संकटाच्या वेळी आम्ही मदत केली त्यानेच आमचा पक्ष फोडला काहींच्या डोक्यात सत्ता लवकर गेल्यामुळे हे घडत आहे अशा व्यक्तीला कायमचा हद्दपार करा यासाठी राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असा आवाहन शरद पवार यांनी केले.

परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी बीड जिल्ह्यात शरद पवार यांनी परळीत सभा घेतली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अडचणीच्या काळात ज्यांना साथ दिली. मदतीचा आधार दिला. संकटकाळात धिर दिला. त्यांनी माझा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला, असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले की काही वर्षापूर्वी स्व.पंडित अण्णा मुंडे हे आपल्या मुलाला धनंजयला घेऊन माझ्याकडे आले. आम्हाला तुमची मदत हवी आहे असे म्हणत आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली. संकटकाळात त्यांना मदत करण्याचा मी शब्द दिला. तो शब्द पूर्ण करत धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर मोठी संधी दिली. एवढेच नाही तर विधान परिषदेचा विरोधी पक्षनेते पद देखील दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळातही त्यांना संधी दिली.सत्ता कधी डोक्यात जाऊ द्यायची नसते. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली.काही वर्षातच त्यांनी आमचा पक्ष फोडला. मोठा धोका दिला, अशा गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा.परळीत गुंडगिरी वाढली आहे. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबल पाहिजे ही गुंडगिरी संपविण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. या गुंडगिरीला पोसणाऱ्या लोकांना पराभूत करायचे आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

डॉ. योगेश क्षीरसागरांची ताकद वाढू लागली; पक्षप्रवेशाचा ओघ वाढला

0

बीड —  विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी बीड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बीड मतदारसंघातून हजारो शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होत असतानाच आता विकासाच्या मुद्द्यावर १० सरपंच व २ उपसरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढली आहे.

बीडच्या मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामे न झाल्याने नाळवंडी सर्कल आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावातील सरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. पाठिंबा देणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच यामध्ये कैलास घुगे सरपंच (बोरफडी), अशोक शिंदे सरपंच (हिवरापहाडी), संजय सलगर सरपंच (बाबुळखुंटा), अभिजीत खाडे सरपंच (जांब), सतीश वनवे सरपंच (पाटोदा बेलखंडी), शिवमूर्ती सानप सरपंच (पौंडूळ), रवीदादा गंगावणे सरपंच जुजगव्हाण), जयराम गीते सरपंच (रुद्रापूर), बालाजी शिंदे सरपंच (खांबा लिंबा), संतोष तांदळे सरपंच (हिंगणी. खू) श्रीराम सुरवसे उपसरपंच (जुजगव्हाण),
रेवणनाथ धांडे उपसरपंच (खांबा लिंबा) यांचा समावेश आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील; सरपंच, उपसरपंचांचा प्रवेश

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अनेक सरपंच, उपसरपंच यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे सर्व जाती धर्मातील सोबत घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे. सुख-दुःखात धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कसलेही संविधानिक पद नसताना आमच्या सर्कलमध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. मागील पाच वर्षात आमच्या भागातील विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मतधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे पाठिंबा देणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले.