Home Blog Page 116

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : चौसाळा महाविद्यालयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

चौसाळा —  नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 15  सप्टे.2025 रोजी सोमवारी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये स्पर्धा महाविद्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी चौसाळा परिसरातील जवळपास 15 शाळेतील एकूण 321 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याची माहिती, प्राचार्य डॉ. पंडित खाकरे व इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रशांत साबळे यांनी दिली आहे.


सदरील परीक्षेमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन, 50 सामान्य ज्ञान चाचणी प्रश्न 100 मार्काचे ठेवले होते . स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम पारितोषिक 2500 रुपये, स्वातंत्र्य सेनानी कै. भगवानराव जयवंतराव भिलारे उर्फ अण्णा राहणार चौसाळा, यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ. विलास भिलारे यांची तर्फे, व द्वितीय पारितोषिक, स्वातंत्र्य सैनिक कै. गणपतराव बाजीराव माने राहणार मानेवाडी, यांच्या स्मृती प्रित्यर्थ  प्रा. सुधीर माने यांचे तर्फे 2000 रुपये, आणि तृतीय पारितोषिक कै. अर्जुनराव नामदेवराव साबळे गुरुजी आडसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थ डॉ प्रशांत साबळे यांचे कडून 1000 रुपये, याशिवाय प्रोत्साहन पर पाचशे रुपयाचे पारितोषिक, सुधाकर वनवे डबल शंख पंढरीनाथ हिरवे यांचे कडून प्रत्येकी पाचशे रुपये हे प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि सहभाग प्रमाणपत्र, ठेवण्यात आलेली असून, सदरील बक्षीस वितरण समारंभ हा दिनांक 18 सप्टे. गुरुवारी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर व डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांचे हस्ते वितरित होणार असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पदव्युत्तर संचालक, डॉ. सुधाकर वनवे कनिष्ठ चे उपप्राचार्य प्रा. गणपती ढवळशंक प्रा. वायबसे प्रा. अश्विनी तोवर डॉ. माणिक चव्हाण डॉ. पंढरीनाथ हिरवे प्रा. सुधीर माने माझी प्रभारी प्राचार्य, डॉ. विलास भिलारे डॉ. कुशाबा साळुंखे संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेख अमजद प्रा. फुटाणे प्रा. नागरे प्रा. सय्यद आफ्रीन , मॅडम डॉ. सय्यद शहानुर डॉ. अमर आलदे, डॉ. संजय कदम डॉ. देशमुख प्रा. कुरुंद प्रा. घाडगे प्राध्यापिका सौ सय्यद शाईन, श्रीमती नावेकर सौ मनीषा गिराम व डॉ. मंजुषा रसाळ प्रा. स्वाती हांगे खडके मॅडम ओ एस, पवार सर, प्रा. ओम चाळक डॉ. मुंडे महादेव, बबन घोडके शितल मुंडे, सवयी मॅडम प्रा. देवगुडे प्रा. प्रा. लहू शेळके प्रा. बाळासाहेब कोल्हे, सुधीर तेलप इत्यादी कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

बीडकरांची स्वप्नपूर्ती: अहिल्यानगर बीड रेल्वे सेवेला सुरुवात

बीड — मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात प्रथमच रेल्वे धावणार आहे. त्यामुळे17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. चाळीस वर्षांपूर्वी बीडकरांनी पाहिलेलं रेल्वेचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ हा 261 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी बीड वासियांना मोठा व दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या रेल्वे मार्गाचा स्वप्न तब्बल दोन पिढ्यांनी पाहिलं. अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या मार्गावर एकूण 19 स्थानके असतील, ज्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांचा थेट संपर्क देशाच्या इतर भागांशी होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 4100 कोटी रुपये खर्च झाले असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीतून हे काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निम्मा निधी पुरवला असून, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.

अहिल्यानगर ते बीडदरम्यान १६ स्थानके आहेत. नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरीमार्गे बीड येथे पोचेल.अहिल्यानगरहून सकाळी ६:५५ ला रेल्वे सुटेल व दुपारी १२:३० ला बीडला पोचेल. परतीच्या प्रवासात बीडहून ती दुपारी एकला सुटेल आणि सायंकाळी साडेसहाला अहिल्यानगरला पोचेल. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असेल.

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अर्चना कुटे जेरबंद

बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांना सीआयडी च्या टीमने पुण्यातून ताब्यात घेतले आहे ‌ भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या.

कुटे ग्रुप वर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर याचा परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेट वर झाला. यामध्ये ग्राहकांची हजारो कोटी रुपयांची रक्कम अडकली गेली. गडगडलेला कारभार सांभाळताना सुरेश कुटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाचा पैसा दिला जाईल मला थोडा वेळ द्या असा आवाहन करून वेळ मारून नेली. ज्ञानराधा मध्ये अडकलेला पैसा मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे पती-पत्नी अनेक दिवस भूमिगत झाल्यासारखे झाले. दरम्यानच्या काळात दोघा जोडीने कुटे ग्रुपच्या मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचं उघडकीस आलं

पोलिसांनी सुरेश कुटेला अटक केल्यानंतर अर्चना कुटे पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या होत्या मात्र पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्या राजरोसपणे निघून गेल्या. त्यानंतर त्या फरार आहेत पोलीस शोध घेत आहेत असं सांगितलं गेलं असलं तरी जनतेच्या बुडवलेल्या पैशाच्या जोरावर अटक टाळणं आतापर्यंत शक्य झालं.मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला .सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी

मुंबई — महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

त्यावर मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवडणूक आयोगाला आता ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या लागतील.

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. यामुळे निवडणूक आयोगासह राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ही मुदतवाढ मिळावी यासाठी आयोगाने कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा, सणसमारंभासह वेगवेगळी कारणं दिली होती. न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत त्यांना निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस याप्रकरणी मे महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आणि चार महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबर २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणे, मतदारयाद्या अद्यायावत करणे, आदी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह इतर काही कारणे पुढे करत निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना स्पष्ट केलं आहे की ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितलं आहे की ईव्हीएमची मागणी, कर्मचाऱ्यांची मागणी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवा. सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील, कामाचे टप्पे कसे असतील यासंदर्भात न्यायालयाने आयोगाला वेळापत्रक दिलं आहे. “मागील सुनावणीवेळी चार महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या निडणूक आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत आहे”, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने यावेळी केली.

कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका, ग्रामस्थांना धोका होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात – आ.संदीप क्षीरसागर

जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकातून केली मागणी

बीड —  तालुक्यातील कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आ. संदीप क्षीररसागर यांनी केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील मौजे कपिलधार ग्रामपंचायत पाली अंतर्गत येत आहे. सदरील गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. तसेच त्याच्या बाजूला कपिलधार हे तीर्थक्षेत्र हे ठिकाण आहे. याठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत पूल देखील कोसळली आहे. याबाबतीत आ. संदीप क्षीरसागर यांनी वारंवार शासनाकडे पत्र व्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. १३ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंत देखील कोसळली आहे. तसेच रहदारी साठी योग्य असलेला रस्ता देखील खचत चालला आहे. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी व कपिलधारवाडी ग्रामस्थांना कोणताही धोका होणार नाही यासाठी सर्वतोपरी तथा उचित कार्यवाही करावी. तसेच पुढील धोका टाळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करावे व आजघडीला जी हानी झालेली आहे याबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकातून केली आहे.

बीड, शिरूर (का),वासनवाडी येथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या

वासनवाडी ता.बीड येथील गाव तलाव फुटला असून परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी. तसेच बीड व शिरूर (का) तालुक्यातील नदी पात्रावरील रहदारी योग्य असणारा पुल वाहुन गेलेले आहेत. त्या बाबतीत तातडीने उपया योजना बाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; शाळा महाविद्यालयांना सुट्टी

बीड — जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे शिरूर पाटोदा आष्टी बीड वडवणी गेवराई अंबाजोगाई परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख क्युसेक  पेक्षा अधिकच पाणी विसर्ग करण्यात येत आहे तसेच वडवणीच्या उर्ध्व कुंडलिका माजलगाव मांजरा या धरणातून देखील गेटमधून हजारो क्यू सेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बीड सह महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाची संततधार सुरूच राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आश्रम शाळा अंगणवाडी यांना सुट्टी दिली आहे.

शाळांना सुट्टी दिली असली तरी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचारी यांनी शाळेत हजर राहावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बायको नांदायला आली नाही; मेव्हण्याचे हॉटेल पेटवले

बीड — बायको नांदायला येत नसल्याच्या कारणावरून  आपल्याच  मेव्हण्याचे हॉटेल पेटविले. यात हॉटेल मधील ७० ते ८० हजार रु. चे सामान जळून नुकसान झाले आहे.या प्रकरणी आरोपी दाजी  विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील कदमवाडी नानाभाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचे लग्न आठ वर्षा पूर्वी सोनिजवळा येथील तानाजी रामदास गायकवाड याचे सोबत झालेले आहे. त्यांना तीन मुलेदेखील आहेत. तानाजी गायकवाड हा नेहमी त्याची पत्नी ज्ञानेश्वरी हिला मारहाण करीत असल्याने; ज्ञानेश्वर ही तिच्या तिन्ही मुलांसह माहेर कदमवाडी ता. केज येथे तिचा भाऊ आसाराम कदम यांच्याकडे रहायला आलेली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी ती माहेरी गेली आहे. त्यामुळे तिचा पती तानाजी गायकवाड हा कदमवाडी येथे येऊन जर त्याची बायको ज्ञानेश्वरी हिला त्याच्याकडे नांदायला पाठविले नाही तर जीवे मारणार. अशी धमकी मेव्हणे आसाराम कदम याला दिली.

दरम्यान दि. १५ सप्टेंबर रोजी तानाजी गायकवाड याने रात्री मेव्हणा आसाराम कदम याचे केज-बीड रोडवर टाकळी शिवारातील असलेले चहापाण्याचे हॉटेल  पेटवून दिले. या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेडसह हॉटेलमधील डीप फ्रिज, साधा फ्रिज, काउंटर, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार व इतर साहीत्य जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे ७० ते ८० हजार रूपयाचे नुकसान झालेले आहे.

आसाराम कदम यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात तानाजी गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे तपास करीत आहेत.

आष्टी : सात गावातील पूरात अडकलेल्या 51 जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने बाहेर काढले

बीड — काल झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्याने आष्टी तालुक्यातील कडा, सुलेमान देवळा, पिंपरखेड, धानोरा, शिरापुर, टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कडा गावातील 11 नागरिक तर सुलेमान देवळा 06, पिंपरखेड 03, धानोरा 03, डोंगरगण 03, शिरापुर 10 व टाकळी अमिया 15 असे एकूण सात गावात 51 लोक अडकलेले आहेत. यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे तसेच एयरलिफ्टिंग ची व्यवस्था जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडुन मा. जिल्हाधिकारी यांचे प्रयत्नांनी करण्यात आलेली आहे. एअर फोर्सच्या माध्यमातून पूर बाधित गावांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांचे माध्यमातून बचाव कार्य सुरू केलेले आहे.

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी, पूरबाधित गावांतील नागरिकांना आवश्यक ते मदतकार्य तात्काळ करणेबाबत जिल्हाधिकारी यांना सूचित केले. त्यानुसार तात्काळ कार्यवाही स्थानिक पथक व शोध व बचाव पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष, मंत्रालय नियंत्रण कक्ष, एनडीआरएफ, आर्मी, विभागीय नियंत्रण कक्ष यांचे सोबत समन्वय स्थापन करण्यात येत असून स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे सोबत मा. जिल्हाधिकारी स्वतः संपर्क ठेवून आहेत व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पूरग्रस्त गावातील नागरिकांनी घाबरू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत सर्वांशी समन्वय साधून आवश्यक ठिकाणी मदत पाठवण्यासंदर्भात व बचाव कार्य करण्याची कार्यवाही करण्यात आली. स्थानिक आमदार. सुरेश धस हे प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित होते संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे मदतीत प्रत्यक्ष पूरबाधित क्षेत्रात मदत कार्य सुरू आहे

बंजारा समाजाचा विराट मोर्चा; एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी

बीड — स्वाभिमानाने जगणारा बंजारा समाज आपल्या हक्काचा वाटा मागतोय, आम्ही भिक मागत नाहीत, कोणाचा घेऊन आपलं भलं व्हावं अशी भावना न ठेवता कष्ट करत जगणारा हा समाज आहे. बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, १७ सप्टेंबर पुर्वी एसटी आरक्षणाची घोषणा करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन म्हणून साजरा केला जाईल असा इशारा बंजारा समाज बांधवांनी आजच्या विराट मोर्चातून राज्य सरकारला दिला आहे.
                        बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी एक नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, आण्णाभाऊ साठे चौक, बसस्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपारिक वेषभुशेत सहभागी झाला होता. एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली. या मोर्चाला जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील युवतींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरू बापूसिंग महाराज, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, मराठा समन्वयक, गंगाधर काळकुटे, योगश क्षीरसागर यांच्यासह समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाला होता.

धर्मगुरू बाबूसिंग महाराज मोर्चा रॅलीत सहभागी

बंजारा समाजाची कशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी देवी येथील महंत बाबूसिंग महाराज बीड येथील एसटी आरक्षण मोर्चा रॅलीत सहभागी झाले होते.

पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी वेधले लक्ष

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातून दाखल झालेल्या महिला भगिनींना पारंपरिक वेशभूषेत येत आपली मागणीची घोषणा देतांना शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

एकीचे अन् नेकीचे दर्शन

जिल्ह्यातून दाखल झालेल्या बंजारा समाज बांधवांकडून मोर्चा सुरू झाल्यापासून ते समारोप होऊ पर्यंत एकजुट दाखवत शिस्तीत आणि शांतता प्रिय मोर्चा पार पडला. त्यानंतर पोलीस प्रशासनाला सहकार्य करत समारोप करण्यात आला.

भविष्याच्या लढाईसाठी चिमुकल्याच्या हाती फलक

जिल्ह्यातील तांड्यांमधून सर्वच समाजबांधव आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरले होता. यावेळी अनेक मताभगिनीसोबत लहान लेकर मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी  अनेक लेकरांचकडून स्वतःच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या लढाई घोषणेचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे दिसले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन साजरा करणार

लाखोंच्या संख्येने दाखल झालेले बंजारा बांधव आपल्या न्याय हक्काची मागणी करत आहे. इंग्रज सरकारांपासून ते निजाम सरकारांपर्यंत सर्वांनीच बंजारा समाजाला आदिवासी म्हणून नोंदी केलेले आहेत. इतर सर्व राज्यात बंजारा समाजाला एसी आणि एसटी मध्ये आरक्षण आहे मग महाराष्ट्रातच व्हीजेएनटी आणले कुठून? असा सवाल उपस्थित करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पहिले आरक्षण बाबत हालचाली न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काळा दिन म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाज साजरा करणार असे मोर्चाला संबोधित करणाऱ्या मुलींनी व्यक्त केली.

यांनी दिला मोर्चात जाहीर पाठींबा

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या सूचनेवरून मराठा कृती समितीचा जाहिर पाठींबा, धनगर महासंघ, वंजारी महासंघ, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर यांनी मोर्चात सहभागी होत जाहिरात पाठिंब्याचे पत्र दिले.

आरडीसी यांनी मोर्चात येऊन स्वीकारले निवेदन

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चा ठिकाणी प्रशासनाने येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मोर्चा ठिकाणी येत मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारावे.

विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी करणार- आ.विजयसिंह पंडित

बंजारा समाजाच्या कुठल्याही लढाईत शिवछत्र परिवार कायम सोबत राहिला आहे. आज लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या न्याय हक्काची लढाईत पंडित कुटुंबीय नेहमी सोबत राहिला आहे. यापुढे सोबत राहत फक्त पाठींबाच देत नसून येणाऱ्या काळात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे मत गेवराईचे आ.विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले.

रस्त्यावरची अन कायदेशीर लढाईत मी सोबत- आ.धनंजय मुंडे

अनेक वर्षापासूनच्या असलेल्या मागणीला वाचा फुटली आहे. तर राज्यात असलेल्या बंजारा बांधवांना एसी आणि एसटीचा आरक्षण मग आमच्या महाराष्ट्रातीलच बंजारा बांधवांनी काय पाप केले. सरकारने एका समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केले तोच गॅझेट बंजारा  समाजाला लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. माझे नशीब नेहमीच बलत तर आहे मी आज सरकारच्या मंत्रीपदावर नाही म्हणून मला समाजाच्या न्याय मागणीला रस्त्यावरची लढाई लढताना येता आले. समाजाच्या रस्त्यावरच्या आणि कायदेशीर लढाईत मी सोबत राहणार असून सरकारला आरक्षण देण्यासाठी मागणी करणार असे मत आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

अतिवृष्टी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ.संदीप क्षीरसागर

शेतकऱ्यांना, नागरिकांना स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे केले आवाहन

बीड –जिल्ह्यासह शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसाभरपाई देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा तसेच इतर छोटे-मोठे तलाव,नदी,ओढे तुडुंब भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार तसेच बीडच्या जिल्हाधिकारी यांना बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्र देऊन केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि.२८ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या आणि १३ सप्टेंबर २०२५ पासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील उभा असलेला सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिकांचे तथा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी बांधवांच्या पाळीव पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. यासह शहरी व ग्रामीण भागात देखील पावसामुळे मोठी पडझड झाली आहे. आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने विद्युत पोल, तारा व रोहित्र नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना व ग्रामस्थांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे

शेतकऱ्यांनी, नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी

पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांना स्वतःच्या आणि आपल्या पशुधनाची सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे तसेच आज दिवसभर अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे
आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

आ.संदीप क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना करत तात्काळ पंचनामे करण्यासाठी पत्र दिले

अतिवृष्टीमुळे मतदार संघातील सर्वच तलाव पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जायकवाडी यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांना रस्ते व पुलाचे तात्काळ पंचनामे करणेसाठी पत्र व्यवहार देखील केला आहे.