Home Blog Page 112

पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरुस्तीला गती; डॉ. योगेश क्षीरसागर यांची जी.प. बांधकाम विभाग अधिकाऱ्यांसोबत बैठक

बीड — बीड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्यांसह पूल वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन काही गावांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.३०) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी तातडीची कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. काही ठिकाणी कामे सुरू असून प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच बीड विधानसभा मतदारसंघाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्या निवेदनानुसार तातडीची रस्ते व पुल दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार डॉ.क्षीरसागर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह बीड, शिरूर कासार तालुक्यातील रस्ते, पुल दुरुस्ती तसेच नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.मोमीन, वरिष्ठ, कनिष्ठ व शाखा अभियंता उपस्थित होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक झाली. यामध्ये कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे, उप कार्यकारी अभियंता चंद्रकांत बोराडे, श्री.हागवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काही ठिकाणची किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेल्याचेही सांगण्यात आले.

जि.प. बांधकाम विभागाकडे मांडलेले मुद्दे

पाडळी फाटा ते पाडळी रस्ता, तागडगाव-पाडळी दरम्यान सुमारे १.५ किमी रस्ता, काकडहिरा फाटा-गाव रस्ता, पाडळी खालापुरी ग्रा.क्र.१४ चा ३.५ किमी रस्ता, रौंधवस्तीचा पुल, मंझरीतील मुकादम व धसे वस्ती रस्ते, जांभ-शिरापूर गात ग्रा.क्र.१२१ चा रस्ता व काजळे वस्तीचा पुल, तरडगव्हाण -हाजीपूर -गाजीपूर ग्रा.क्र.१० रस्ता व पुल, पाडळी -जाटवड रस्ता व पुल, पाडळी -ढोकवड ग्रा.क्र.१५ रस्ता, हिंगणी खुर्द येथील ग्रा.क्र.५५१ व ४३६ रस्ते, रुद्रापूर -साक्षाळपिंपरी दरम्यान गीतेवस्ती ग्रा.क्र.२ प्रजामा क्र.२८० रस्ता व पुल, तसेच हिंगणी खुर्द, नाळवंडी व जुजगव्हाण येथील पुल आदी कामांचे प्रस्ताव मांडण्यात आले.

सूचना होताच पुल दुरुस्तीला सुरुवात

शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून त्याचाही आढावा घेण्यात आला. तसेच, साक्षाळपिंपरी पुलाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी डॉ.सारिका क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती.

कपिलधारवाडीत संरक्षण भिंत उभारणार

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी कपिलधारवाडी येथे जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. गावात झालेले भूस्खलन लक्षात घेता रस्त्याच्या बाजूने संरक्षण भिंत उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे यांना अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले असून तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

कर्जमाफी, विज बिल यासारख्या दुष्काळी सवलती शेतकऱ्यांना देणार – फडणवीस

मुंबई — महाराष्ट्रात  अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीस सुरुवात केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय देखील समोर आले आहेत.

नुकसानग्रस्त भागासाठी पुढच्या आठवड्यात घोषणा करू आणि दिवाळीच्या आधीच ही मदत पोहोचवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शेतकऱ्यांसाठी दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू होणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ई-केवायसी अट शिथिल, २२१५ कोटी वितरित

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २२१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे.

ई-केवायसी अट शिथिल: शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी सरकारने ई-केवायसीची (e-KYC) अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे मदतीची प्रक्रिया जलद होणार आहे.

दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा व वितरण!

मुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण आकडेवारी गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. “पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची अंतिम आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एक सर्वंकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ओला दुष्काळ’ नसेल, पण सर्व सवलती लागू

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची सातत्याने होणारी मागणी आणि त्यासंबंधीच्या धोरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले की, शासकीय मॅन्युअलमध्ये ‘ओला दुष्काळ’ असा कोणताही शब्द नाही आणि आजपर्यंत कधीही ‘ओला दुष्काळ’ जाहीर झालेला नाही.

‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याच्या मागणीचा मूळ उद्देश हा असतो की, दुष्काळसदृश्य परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व उपाययोजना व सवलती लागू व्हाव्यात.

त्यामुळे सरकारने थेट ‘ओला दुष्काळ’ जाहीर न करता, दुष्काळ काळात दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती (उदा. कर्जमाफी, शैक्षणिक शुल्क माफी, पाणीपट्टी व वीज बिल सवलती इ.) तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ मिळणार आहे. सरकारने नुकसानीची आकडेवारी जमा झाल्यानंतर त्वरित आणि ठोस निर्णय घेऊन पुढील आठवड्यात घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील पाच महत्त्वाचे निर्णय!

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार.

त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित. राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटींचा निधी.

उद्योग विभाग

महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर – GCC) धोरण २०२५ मंजुर. विकसित भारत २०४७ च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टीना प्रोत्साहन मिळणार.

ऊर्जा विभाग

औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी.

यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब व अन्य योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार.

नियोजन विभाग

महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी. भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) चा वापर करून प्रशासनात गतिमानता आणणार. या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होणार.

विधि व न्याय विभाग

सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजूरी

11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

बीड — जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत आज पार पडली. बीड पंचायत समिती ओबीसीसाठी राखीव आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत पुढील प्रमाणे
1. बीड – OBC
2. गेवराई – OBC महिला
3. आष्टी – OPEN महिला
4. शिरूर – OPEN महिला
5. पाटोदा – OPEN
6. परळी – अनुसूचित जाती (SC)
7. वडवणी – OPEN
8. धारूर – OBC महिला
9. माजलगाव – OPEN महिला
10. अंबेजोगाई – OPEN महिला
11. केज – OPEN
या आरक्षण सोडतीला उपजिल्हाधिकारी सामान्य शैलेश सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती होती.

आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बा.आं म विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

सिनेटच्या सदस्य पदी निवडीनंतर विद्यापीठाच्या बैठकीला उपस्थिती

बीड  — विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे.
आ.संदीप क्षीरसागर यांची निवड ही विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी विधानसभेचा प्रतिनिधी कोट्यातून केली आहे. आ.संदीप क्षीरसागर हे विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्याच्या मदतीसाठी सतत अग्रेसर असतात. तसेच त्यांनी विविध प्रश्न शासनदरबारी मांडून मार्गी लावले आहेत. या निवडी नंतर विद्यापीठाच्या उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या हस्ते आ.संदीप क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडी बद्दल त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड माझ्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब -संदीप क्षीरसागर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी महाराष्ट्र विधानसेचे प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मी शासनाचे आभार मानतो.तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात माझी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब असून या पदाला न्याय देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रगती व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

एस पी साहेब..!नेम प्लेट बदलली पोलीस दलाचा चेहरा बदलता आला नाही;चक्क 10 मर्डर ,दोन महिन्यात ? भाग – 1

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलाला नवनीत कांवत यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाला. कायदा सुव्यवस्था ताळ्यावर येईल असा विश्वासही वाटला होता. नव्याचे नऊ दिवस सरले अन् पुन्हा कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले. पोलीस कर्मचाऱ्यांची जात दिसू नये म्हणून नेम प्लेट बदलली पण एस पी साहेब पोलीस दलाची प्रतिमा बदलण्यात तुमची कारकीर्द अपयशी ठरू लागली. गुन्हेगारावर तर वचक राहिलाच नाही ती तर मोकाटच आहेत.पण नुकतीच मिसरूड फुटलेली कोवळी पोरं देखील खिशात चाकू घेऊन फिरू लागली. एवढंच नाही तर एस पी ऑफीस पासून हाकेच्या अंतरावर गजबजलेल्या ठिकाणी खूनही करू लागले. दोन महिन्याहून कमी काळात तब्बल दहा खून हे खाकी वर्दीच्या इज्जतीच्या चिरफाळ्या उडवणारे आहेत.अजूनही वेळ गेली नाही धृतराष्ट्राची व कच्च्या कानाची भूमिका सोडून डोळसपणाने स्टंटबाजी न करता वरिष्ठांच्या भूमिकेत या तरच तुमची कर्तव्यदक्षतेची प्रतिमा जपली जाईल अन्यथा बीडचा भेसूर बनलेला चेहरा बदलता आला नाही म्हणून अपयशाचं खापर फुटायला वेळ लागणार नाही. सध्या तरी “रातभर पाखडलं, काही नाही सापडलं” अशीच स्थिती तुमची बनली आहे.

अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना बीडला आणण्यात आलं. बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा चेहरा नक्कीच बदलेल अशी अपेक्षा व्यक्तही केली जात होती. सुरुवातीच्या काळात अतिशय चांगलं काम पोलीस दलाच झालं, बीडकर समाधानी झाले. पण थोड्याच दिवसात पोलीस अधीक्षकांकडून स्टंटबाजीचे फतवे निघू लागले. त्यातच जात कुणाला कळू नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट बदलण्यात आल्या.आता तर बीड पोलीस मुंबई पोलिसांची बरोबरी करेल का काय? अशी भावना देखील निर्माण झाली.पण ती फोल ठरली. थोड्याच दिवसात गुन्हेगारीने तोंड वर काढले. बीडच्या माध्यमानी जागरूकतेने आवाज उठवायला सुरुवात केली. तर पोलिसावर सत्यतेच्या बातम्यांचा मानसिक दबाव येतो असं नव मानसशास्त्र शोधत पोलिस आणि पत्रकारांमध्ये समन्वय ठेवणारा Beed police press ग्रुप फक्त पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या माहिती पुरताच मर्यादित ठेवला. इथेच धृतराष्ट्राची भूमिका घ्यायला एस पीं नी सुरू केल्याचं लक्षात आलं. माध्यमांच्या बातम्यांची दखल घ्यायची नाही. आपल्याच दिशाहीन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच ऐकून डोळेझाक करायची मग कुरुक्षेत्रावर (बीडच्या भूमीत) सुरू असलेल्या कारस्थानाची कितीजरी माहिती संजय (प्रसारमाध्यमं) ने दिली तरी विश्वासच ठेवला नाही. परिणामी अराजकतेने पुन्हा तोंड वर काढलं. अवैध धंदे प्रचंड वाढले. गुन्हेगारीत तर वाढच होऊ लागली. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी एम पी डी ए सारख्या कारवाया करण्यात आल्या. दुर्दैवाने त्या सुद्धा वरिष्ठांच्या आदेशापुढे सपशेल फेल ठरल्या. नुसते कागदी घोडे नाचवून वचक बसत नसतो. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले पण स्टंटबाजीलाच कर्तव्यदक्षता समजणाऱ्या धृतराष्ट्राला समजवणार कोण? मोठमोठे गुन्हे करणारे मोकाट तर आहेच पण आता परिस्थिती इतकी हाताबाहेर जाऊ लागली आहे की, पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इथेच खरी खाकीच्या इभ्रतीची लक्तर टांगली गेली होती. या घटनेनंतरही बोध घेण्यात आलाच नाही.
गुन्हेगारांकडून गोरगरिबांना होणाऱ्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. स्वतःची चाललेली ईभ्रत राखण्यासाठी एस पीं च्या सुपीक डोक्यातून नवी कल्पना उदयाला आली. स्टंटबाजीचा नवा फतवा काढत मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करणारा वर गून्हा दाखल करण्यात येईल त्यालाही सह आरोपी करण्यात येईल असं जाहीर करत.गुन्हेगारीवर पांघरून घालण्याचं व संविधानाने जनतेला दिलेल्या अधिकारावरच बंधन आणण्याच काम केलं गेलं.
याचीच परीनीती म्हणून आता तर
देशी कट्टे बाळगणारे अनेकजण बीडमध्ये मोकाट फिरू लागले आहेत. नेटकीच ओठावर कोवळी मिसरूड फुटलेली पोरं देखील खिशात चाकू बाळगून फिरू लागले आहेत. जिथे गुन्हेगारावरच वचक नाही तिथे या मुलांचं काय घेऊन बसलात? यातूनच काल एका पत्रकार बांधवांच्या मुलाचा गजबजलेल्या एस पी ऑफिस पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी खून झाला.आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी हाताबाहेर प्रकरण जात आहे. म्हणून एका आरोपीला तात्काळ अटक देखील केली. पण बाकीचे पाच-सहा आरोपी कोण? याचा उलगडा झाला नाही शेवटी यश देवेंद्र ढाका याच्या हत्येतील आणखी आरोपीचा शोध घ्या अन्यथा शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेत.बार्शी रस्त्यावर आंदोलन करावं लागलं तेही भर पावसात. दोन महिन्याहून कमी कालावधीत झालेला हा दहावा खून आहे. एस पी साहेब …! देवेंद्र ढाकाच्या मुलाच्या हत्येनंतर मात्र गुन्हेगारीचा कहर झाल्याचं दिसू लागला आहे.

नेमप्लेट बदलण्यासारख्या स्टंटबाजीतून काहीच साध्य झालं नाही.त्यासाठी ग्राउंड वर उतरून काम करावं लागेल. कच्चे कान व धृतराष्ट्राची भूमिका सोडून डोळसपणाने पाहावे लागेल. जनतेचा आक्रोश ऐकावा लागेल इथून पुढे तरी थोडाफार बदल होईल का? “येरे माझ्या मागल्या”अशीच बीडकरांची स्थिती होईल? असेच गुन्हेगार मोकाटच फिरत राहतील का? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही का? कोवळी पोर गुन्हेगारीच्या मार्गानेच जाणार का? बीड असाच बदनाम होत राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीची मदत द्या – संयुक्त किसान मोर्च्याचे आंदोलन

बीड — जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तरीदेखील शासनाने आजवर ओला दुष्काळ जाहीर न करणे व प्रती गुंठा अवघे ८५ रुपये मदत जाहीर करणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्च्याने केला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शासनास मागण्यांचे निवेदन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केले.

प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे म्हणाले की, “सरकारने असंवेदनशीलता सोडून ओला दुष्काळ जाहीर करावा. प्रती हेक्टर किमान १ लाख रुपयांची तातडीची मदत देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा. तसेच नदीकाठच्या गावांना वेगळी नुकसानभरपाई द्यावी.”आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस किसान सेल, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्ष, शिव संग्राम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इंटक, माहिती अधिकार संघटना, मराठा महासंघ, पत्रकार संघ, शिक्षक संघ, सामाजिक संस्था अशा विविध पक्ष-संघटना सहभागी झाल्या.नेत्यांनी संतप्त शब्दात सरकारवर टीका केली की, “२०२७ च्या कुंभमेळ्यासाठी तब्बल १२ ते १४ हजार कोटींची तरतूद होते, पण कोलमडलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ २२१५ कोटी? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”या आंदोलनात जेष्ठ कॉ. उत्तमराव सानप, प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे, कॉ. ज्योतिराम हुरकुडे, भाई मोहन गुंड, कॉ. पंकज चव्हाण, कॉ. नितीन जायभाये, गणेश मस्के, डॉ. गणेश ढवळे, प्राचार्य युवराज मुरुमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा:ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा.

प्रती हेक्टर किमान १ लाख मदत द्यावी.

नदीकाठच्या गावांसाठी स्वतंत्र नुकसानभरपाई जाहीर करावी.

सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्च्याने दिला.

केज मध्ये 35 लाखाचा गुटखा पकडला

बीड — साठवून ठेवलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मस्साजोग मध्ये कारवाई करून 35 लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात प्रतिबंधित असलेला गुटखा परराज्यातून आयात करून सर्रास विकला जातो. पोलिसांचा यावर कुठलाही नियंत्रण नाही. स्थानिक पोलीस ठाणे उलट गुटखा तस्करी करणाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यातच  अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा व सुगंधी तंबाखू पकडण्यात मोठे यश आले आहे. सदरची कारवाई ही मसाजोग, ता.केज, जि.बीड येथे करण्यात आली आहे.या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने एकूण 34 लाख46,हजार227 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली असतांना पण आरोपी  रोहित आसाराम देशमुख, 35 वर्ष रा. मसाजोग ता. केज व साहेबराव लिंबा आंधळे, वय 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी ता. केज जि.बीड यांनी स्वतःचे ताब्यात बाळगल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदार यांनी वरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशन केज येथील अधिकारी हे करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, श्रीमती चेतना तिडके  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले; सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा – आ.जयंत पाटील

शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजारांची थेट मदत देऊन २५ हजारांचा पहिला हप्ता द्यावा

बीड — मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे शुक्रवार (दि.२६) रोजी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी सामान्य अतिवृष्टी झाली नसून सर्वच गावे पाण्याखाली गेली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. काही जनावरे जागेवरच दगावली आहेत.शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या आहेत. घरामध्ये पाणी शिरल्याने सर्व वस्तू साधने वाहून गेली आहेत. घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे शासनाने चार पाऊल पुढे येऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी. शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. सरकारने शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कारण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे एकरी किमान ५० हजार रुपये इतकी थेट मदत तातडीने दिली पाहिजे. सरकारने हप्ते पडून २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला पाहिजे.

गायी म्हशी साठी ६० ते ७० हजारांची तर शेळ्या मेंढ्या साठी नुकसान भरपाई द्या

अतिवृष्टीमुळे शेतीसह जनावरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली आहे. जनावरांच्या किंमती वाढलेल्या आहेत. बाजारात सध्या ०१ लाख २० हजार पर्यंत गायी म्हशींची किंमत आहे. सरकारने किमान ६० ते ७० हजार रुपये गायी म्हशीं ज्या वाहून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, शेळ्या मेंढ्या साठी १० हजार रुपये द्यावेत.

ज्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या त्यांना एकरी ३० हजार मदत द्या

अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यांना शासनाने एकरी ३० हजार रुपयांची मदत द्यावी. यासोबतच नदी पात्रालगत संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

बीड : माने कॉम्प्लेक्स समोर तरुणाचा छातीत चाकू खूपसून खून, आरोपी पकडला

बीड — शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत यश देवेंद्र ढाका वय 22 वर्ष याच्या छातीवर चाकूचे वार करण्यात आले. छातीत आरपार चाकूचे वार गेल्याने तो जमिनीवर कोसळला. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच आरोपीला जेरबंद केले आहे. पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा तो मुलगा आहे.
शहरात गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका वय २२, रा. बीड या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
गूरूवारी रात्री शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे . दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात सुरज आप्पासाहेब काटे वय 21 वर्ष रा.. बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक दुबाले, राहुल शिंदे आणि मनोज परजणे यांनी केली.

SC आरक्षणातही होणार बदल, फडणवीस यांचे संकेत,

मुंबई — सध्या महाराष्ट्रात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत, राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरूद्ध ओबीसी, बंजारा विरूद्ध आदिवासी, तसेच धनगर विरूद्ध आदिवासी समाज असं चित्र पहायला मिळत आहे.

ओबीसीकडून मराठा समाजाच्या मागणीला विरोध होत आहे, तर दुसरीकडे बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी समाजाची मागणी आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनुसूचित जातींचं आरक्षण SC आरक्षणाच्या सूत्रामध्ये देखील बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या व्यासपीठावरून बोलताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्याकडून आरक्षण आणि जाती चळवळीच्या मुद्द्यावर बोलताना आरक्षण वर्गीकरणाचे संकेत देण्यात आले आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणात क्रीमी लेअरची व्यवस्था आहे, जर ओबीसी समाजातील एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. आरक्षणाचा लाभ हा फक्त ओबीसी समाजातील नॉन -क्रीमी लेअर वर्गासाठीच आहे. सुप्रीम कोर्टाकडून क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअरची स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आली आहे.

फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटलं की, सुप्रीम कोर्टानं आपल्या एका आदेशात अनुसूचित जातींना देखील क्रीमी लेअर फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात सांगितलं आहे. अनुसूचित जातींमध्ये देखील प्रत्येक राज्यामध्ये एकाच जातीचं वर्चस्व आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळत आहे. अशाही अनेक जाती आहेत, ज्यांना आजही आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळू शकलेला नाहीये, त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये देखील हे वर्गीकरण लागू केलं जाईल, अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, हाय कोर्टाच्या माजी न्याय‍धीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, सध्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर या समितीचं काम सुरू आहे. या समितीचा रिपोर्ट आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, रिपोर्ट आल्यानंतर तो लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.