Home Blog Page 111

ठाकरे बंधूंसह जनतेच्या विरोधा पुढे सरकार नमले;त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द

0

मुंबई — गेल्या काही दिवसांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता.
मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत होता. मराठी भाषा वाचवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत 5 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाला हा निर्णय महागात पडणारा होता.आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केली.यावेळी बोलताना, त्रिभाच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली तसेच, या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र या रिपोर्टच्या आधारावच लागू केला जाईल. म्हणूनच 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.

उमाकिरण अत्याचार प्रकरण:विजय पवारच्या चेहऱ्यावर माज कायम; दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

बीड — अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री विजय पवार व प्रशांत खटोकरला पकडले. दरम्यान दुपारी न्यायालयात हजर करत असताना विजय पवार च्या थोबाडावर अजूनही माज,मस्ती कायम असल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी पुकारण्यात आलेला जिल्हा बंद मागे घेण्यात आला आहे.
रविवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन्हीही नराधमांना शहर पोलीस ठाण्यातून न्यायालयात घेऊन जाण्यात आले.यावेळी विजय पवार च्या हालचालीत मग्रुरी व चेहऱ्यावर माज कायम असल्याचं दिसत होतं. झालेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप चेहऱ्यावर नव्हता. सराईत गुन्हेगाराला लाजवेल अशी त्याची चाल होती. दरम्यान न्यायालय परिसरात यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी न्यायालयाने 1जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उद्याचा जिल्हा बंद मागे ..

उमाकिरण संकुलमधील क्लासेसच्या विद्यार्थीनीची छेड काढून फरार असलेले प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना बीड पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून अटक केली. यामुळे पवार, खाटोकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.30) पुकारण्यात आलेला बीड जिल्हा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश धांडे, राष्ट्रवादीचे युवा नेते शिवराज बांगर, वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी सांगितले. दरम्यान, पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे प्रा.उबाळे,अॅड धांडे यांनी सांगितले.

वैद्यकीय रजेवर गेलेल्या अधिकाऱ्याने रात्रभर जागून पकडले उमाकिरणचे दोन्ही आरोपी

0

बीड — अनाकलनीय घटना चित्रपटातच घडतात असं नाही तर बीडच्या पोलीस दलातही घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.उमाकिरणमधील दोन शिक्षकांवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपी विजय पवार व प्रशांत खटोकर यांच्या अटकेसाठी राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती.अधिवेशनाच्या तोंडावर सरकारवरही दबाव वाढणार होता.मात्र त्याचवेळी आरोपींना दुर्बुद्धी सुचली अन ते गुन्हा केलेल्या ठिकाणीच म्हणजे बीडमध्ये येत असताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.विशेष म्हणजे मागच्या आठ दिवसांपासून जे वैद्यकीय रजेवर गेले होते ते पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभिले यांचा आरोपींचा अटकेसाठी मोठा प्रयत्न राहिला आहे ते कळते.
सूर्यकांत गुळभिले यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी त्यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली.त्यांना जिल्हा विशेष शाखेतून माजलगावचे काम करण्यासाठी पाठविण्यात आले.मात्र त्यांना त्या ठिकाणी रुजू व्हायचे नव्हते.म्हणून त्यांची पुन्हा गेवराई येथे बदली करण्यात आली.पण त्याच वेळी सूर्यकांत गुळभिले यांची तब्येत बिघडली अन ते वैद्यकीय रजेवर गेले.मागच्या आठ दिवसांपासून ते रजेवर होते. मात्र अचानकच त्यांना उमाकिरणमधील आरोपींच्या संदर्भाने माहिती मिळाली अन ते आजारी असताना रात्रभर जागून आरोपीला पकडण्यासाठी थांबले.दरम्यान या कारवाईचे सध्या अभिनंदन करण्यात येत आहे.

पुन्हा सेवेत राहणार की रजेवर जाणार…
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी कर्मचाऱ्यांच्या रजेसाठी मूल्यमापन हा निकष लावला होता.रजा हवी असेल तर कामे दाखवा असे आदेशच त्यांनी काढले होते.तसेच दीर्घकाळापासून वैद्यकीय रजेवर गेलेल्या सुनील नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.आता गुळभिले यांच्यासारखे अधिकारी वैद्यकीय रजेच्या नावाखाली पोलीस खात्यातून काम न करता दांडी मारत असतील अन कारवाईच्या वेळी हजर होत असतील तर हा गंभीर प्रकार आहे.पोलीस अधिक्षक काय करतात हे पाहणे यात महत्वाचे ठरेल.

शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे नासके किडे विजय पवार,प्रशांत खटोकर अखेर पकडले

0

बीड — उमाकिरण संकुलात असलेल्या प्रोफेशनल क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याच्या प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून फरार असलेले प्रा. विजय पवार व खाटोकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मांजरसुंभा परिसरातून सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.
बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रोफेशनल क्लासेस मध्ये 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थीनीला केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. तिला नग्न करत आपल्या मोबाईल मध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी 26 जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली होती. दरम्यान विजय पवार व प्रशांत खटोकर हे दोघेही फरार झाले होते. उमाकिरण संकुला बाहेर आंदोलन करून शैक्षणिक बंद शनिवारी पाळण्यात आला. आरोपींच्या अटकेसाठी सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथक स्थापन करून रवाना करण्यात आली होती. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या काळीमा फासणाऱ्या दोन्ही शिक्षकांना पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली.

खाजगी क्लासेसच्या शिक्षकांचा अल्पवयीन मूलीवर लैंगिक अत्याचार;पालकात संताप

0

शैक्षणिक संकुल बाहेर तगडा बंदोबस्त; आरोपी पकडण्यासाठी तीन पथक रवाना

बीड — उमा किरण शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानसिक, लैंगिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून, सर्व स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. मात्र आज सकाळी उमाकिरण बंद ठेवण्यात आले असून पालक आणि विद्यार्थी यांनी परिसरात गर्दी केली होती. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा तगडा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.


असं आहे प्रकरण

पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने एप्रिल 2024 मध्ये बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये निट परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला. नियमितपणे वर्गात हजेरी लावत असताना, तिला प्रशांत खाटोकर नावाच्या फिजिक्स विषयाच्या शिक्षकाकडून सतत त्रास सहन करावा लागला. प्रशांत खाटोकर पीडित विद्यार्थिनीला वर्ग संपल्यानंतर कॅबिनमध्ये बोलवून बॅड टच, कपडे उतरवायला लावणे, व अश्लील फोटो काढणे यांसारखी कृत्ये करत असे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, ती घाबरलेल्या अवस्थेत त्याचा विरोध करत असे, पण शिक्षक तिला धमकी देत की, “जर कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन.”प्रशांत खाटोकरकडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध मदतीसाठी पीडित विद्यार्थिनीने दुसऱ्या शिक्षक विजय पवार यांच्याशी संवाद साधला. मात्र धक्कादायक म्हणजे, विजय पवार यानेही तिच्यावर अशाच प्रकारचा छळ सुरू केला. त्याने पीडितेला सांगितले की, “प्रशांतला मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवलंय”, आणि त्यानेही तिच्यासोबत अश्लील वर्तन केले.या घटनेचा मानसिक ताण वाढल्यानंतर पीडित मुलीने आपल्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाॅक्सो कायद्याअंतर्गत, भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे केवळ उमा किरण शैक्षणिक संकुल नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसमधील मुलींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी अशी मागणी केली आहे की, जिल्ह्यातील सर्व क्लासेसची तपासणी करून पोलीस प्रशासनाने विद्यार्थिनींसोबत थेट संवाद साधावा व सूरक्षेसाठी उपाययोजना कराव्या.दरम्यान या घटनेमुळे बीडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, उमा किरण क्लासेसची विश्वासार्हता धुळीला मिळाल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. जिथे शिक्षकच अश्लील वर्तन करत असतील, तिथे मुलींच्या सुरक्षेची खात्री कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेकनूर पोलीसांची अजब कहाणी,वारकऱ्यांसाठी लावली चौकी बाहेर अत्तरदाणी?

0

चौसाळा — गेल्या तीन दिवसांपासून मांस वहातूक करणारा कंटेनर क्र एम.एच.13 ए एक्स 4898 नेकनूर पोलीसांनी पकडून चौसाळा चौकीत आणून लावला आहे.या प्रकरणात कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आली तर नाहीच नाही पण पंढरीच्या वारी मार्गात प्रचंड दूर्घंधी पसरल्याने वारकऱ्यांना नाक मूठीत धरुन चालावे लागत आहे.त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरीत्या जनावरांचे मांस घेऊन जाणारा कंटेनर तीन दिवसांपूर्वी नेकनूर पोलिसांनी पकडला. कारवाई करण्यासाठी तो पोलीस चौकीला आणून उभा करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली. ही तीन दिवस झाले तरी गुलदस्त्यातल गुपित बनून राहिली आहे. टेम्पो मात्र जागेवरच उभा आहे. यात असलेलं मांस सडून गाडी भोवती अळ्यांचा खच पडला आहे. परिसरामध्ये जीवघेणी दुर्गंधी पसरली असली तरी कर्तव्यदक्ष ठाणे प्रमुखांने अद्याप कुठलीच कारवाई केली नाही किंवा करावी अशी सद्बुद्धी त्यांना मिळाली नाही. फक्त संत मुक्ताबाई पालखीच्या वारकऱ्यांना फळ वाटप करत कसे वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत याचा डांगोरा वाजवला गेला. पालखी मार्गावरील मांस विक्री बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्या घोषणेला ठाणे प्रमुखांनी हरताळ तर फासलाचपण टेम्पोमुळे पसरलेली दुर्गंधी वारकऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करेल एवढी सारासार विचार विवेक बुद्धी त्यांना आली नाही. या कंटेनर मध्ये मांस नेमके कोणत्या जनावरांचे? ते गोमांस तर नाही ना?, त्या कंटेनर मध्ये हाड असल्याचं सांगितलं जात तरी नेमकी ती कशाची आहेत? हे पाहायची जबाबदारी नेमकी कोणाची? कंटेनर मुळे पसरलेली दुर्गंधी घेत पंढरीच्या दर्शनाला जायचं म्हणजे चौकीचा परिसर ओलांडताना नर्क यातना वारकऱ्यांना सहन करावी लागत आहे. पोलीस चौकी समोरच महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग आहे. विद्यार्थ्यांसह जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस अधीक्षक साहेब,नेकनूरच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काही कारवाई केली नसेल, मलिदा लाटला असेल तरीही आम्हाला देणंघेणं नाही कमीत कमी महामार्गावरची कंटेनर हटवून दुर्गंधी तरी दूर करावी‌. पांडुरंग या प्रकरणात कंटेनर हटवण्याची सद्बुद्धी नक्कीच देईल अशी अपेक्षा सर्वसामान्य वारकऱ्यांसह जनतेतून व्यक्त केली जात आहे.नेकनूर पोलीसांची अजब कहाणी,
वारकऱ्यांसाठी लावली चौकीत अत्तरदाणी? असं उपहासाने म्हटलं जाऊ लागला आहे.

बीडच्या समस्यांवर आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

0
भुयारी गटार, नगर रोडचे डिव्हायडर, नळ कनेक्शन बाबत झाली चर्चा
बीड —   शहरातील अनेक महत्त्वाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (दि.२३) रोजी आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी जिल्हाधिकार यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत बीड शहरातील भुयारी गटार योजना, नगर रोडवर जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी दुभाजक खुला करणे, नवीन अटल अमृत योजनेचे नळ कनेक्शन तसेच शहरात सुरू असलेली स्वच्छता मोहीम या महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
                     बीड शहरात भुयारी गटार योजना अर्धवट अवस्थेत बंद पडली आहे. ही बंद पडलेली कामे तातडीने पुनरुज्जिवीत करण्याची मागणी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली. तसेच नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयात जाण्यासाठी नागरिकांना रस्ता दुभाजक खुला करण्याची गरज व्यक्त केली. यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असे मत आ. क्षीरसागर यांनी मांडले.याशिवाय, अमृत अटल जल योजनेंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे अनेक नागरिकांना अद्याप कनेक्शन मिळालेले नाहीत. ही कनेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. यासोबतच, बीड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, यंत्रणांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन आ. क्षीरसागर यांनी केले.
                 दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह बीड नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

परीक्षेत कमी गुण मिळाले; बापाने जाब विचारला मुलगी उलट बोलली, वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

0

आटपाडी — मुलांकडून पालकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्यापुढे त्यांचा जीव स्वस्त झाला आहे. खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्यानंतर संतापलेल्या बापाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली.
नेलकरंजी येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत मृत झालेल्या मुलीचे साधना धोंडिराम भोसले वय सतरा वर्ष असे नाव आहे.या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती यांच्यावर आपल्याच पतीविरोधात पोलिसांत फिर्याद देण्याची वेळ आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडिराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्याचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पोलिसपाटील होते. पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच. धोंडिराम यांना एक मुलगा आणि साधना अशी मुलगी. साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. तिला दहावीला 92.60 टक्के गुण मिळाले होते. तिचा गावातील शाळेत पहिला क्रमांक आला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती.तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खासगी शिकवणी लावली होत्या. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे वडील धोंडिराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडिराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले, याचा जाब विचारला. एवढा खर्च करतोय, कशी डॉक्टर होणार, तुझं कसं होणार, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. साधना हिने, ‘पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षक झालाच ना?’ असे उलट उत्तर दिले. त्यामुळे धोंडिराम यांना राग अनावर झाला.त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. पोटात लाथा घातल्या. पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते थांबले. त्यानंतर पुन्हा तासाभराने मुलीला मारहाण केली. त्या रात्री मुलीला अनेकवेळा वारंवार जबर मारहाण केली.
साधनाच्या डोक्याला जबर मार लागला. संपूर्ण शरीराला इजा झाली. ती अस्वस्थ होती. तिला शनिवारी दवाखान्यात नेले नाही. धोंडिराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले. घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर घाबरलेल्या भोसलेंनी साधनाला घेऊन सांगलीला दवाखान्यात आले. ‘मुलगी बाथरूममध्ये पडून जखमी झाली आहे’, असे भासवून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान शवविच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक व्रण आढळले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. शवविच्छेदन करून शनिवारी रात्री अंत्यविधी केला. आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी धोंडिराम यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भगवान फुलारी च्या गावाचं नावच गिरवी; पांघरून घालून बेडस्करची शिंदळकी जिरवी

0

बीड — शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदेने केलेल्या 500 कोटीच्या घोटाळ्यामुळे शिक्षण विभाग चर्चेत आला आहे. त्यातच आता भगवान फुलारी हा लाचेच शेण खाताना एसीबीने पकडलेल्या लक्ष्मण बेडसकर वर मेहेरबान झाला आहे. त्याच्याकडे केजच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देऊ नये अशी तक्रार येताच ती बेकायदेशीर निकाली काढून भगवान फुलारी च्या “गावाचं नावच गिरवी; पांघरून घालून बेडसकरची शिंदळकी जिरवी”असं म्हणण्याची वेळ आणली आहे. याप्रकरणी सादेक इनामदार यांनी सीईओ यांच्याकडे तक्रार केली आहे.
बीडचा शिक्षण विभाग म्हणजे भगवान फुलारी व नागनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवून टाकला. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 500 कोटीचा मलिदा या दोघांनी लाटला. यांनी केलेल्या कारनाम्यांच्या तक्रारींचा ओघ सुरू होता. दरम्यान नागपूर येथील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आयुक्तांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या प्रकरणाची सध्या चौकशी देखील सुरू आहे. अनेक जण या चौकशी फेऱ्यात अडकले असले शिंदेच्या “नाग”नाथाची बदली झाली असली जोड गोळी फुटली असली तरी रक्तातच असलेली भ्रष्टाचाराची शिंदळकी भगवान फुलारी च्या सवयीतून जायला तयार नाही. भ्रष्टाचाराचा शेण अजूनही खाण्यात ते धन्यता मानत आहेत. फुलारी च्या काळ्या कारनाम्याचा आणखी एक नमुना पुन्हा उजागर झाला आहे. लाचेच शेण वरपून गडर झालेल्या केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर वर मेहेरबान झाले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादेक इनामदार यांनी लाच घेताना एसीबी ने पकडलेल्या लक्ष्मण बेडसकर याच्याकडे केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देऊ नये त्याची इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. याच पदावर काम करताना बेडसकर याने 31 डिसेंबर 2024 रोजी मुख्याध्यापकामार्फत विडा येथील शिक्षकाकडून लाच मागितली होती. शासनाच्या नियमाला डावलून पदाचा गैरवापर करत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दिशाभूल करत ज्या ठिकाणी लाच घेतली होती त्याच ठिकाणी पुन्हा पदभार बेडसकरला देण्यात आला. सादेक इनामदार यांनी तक्रार केल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रकरणी तात्काळ अहवाल सादर करा असे आदेश दिले होते‌. मात्र त्यांची बदली होताच शिक्षणाधिकारी भगवान फुलारी याने तो अर्ज बेकायदेशीर निकाली काढला आहे. भगवान फुलारी व लक्ष्मण बेडसकर यांच्या दिलजमाईची तक्रार सादेक इनामदार यांनी सीईओ जितिन रहमान यांच्याकडे पुन्हा केली आहे. याप्रकरणी सीईओ नेमकी काय कारवाई करतात? फुलारी च्या मस्तवालपणाला आळा घालणार का? लक्ष्मण बेडसकर वर काय कारवाई करतात? शिक्षण विभागाला फुलारीची लागलेली वाळवी दूर करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विहिर मंजुरीसाठी 10 हजाराची लाच घेतली; किट्टी आडगाव चा सरपंच एसीबीने पकडला

0

बीड — शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यासह शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. गावपातळीवर सरपंचांनी या योजना वर कमाई चे साधन बनवले आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी लोकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र गाव पातळीवर वैर नको म्हणून कोणीही तक्रार करायला धजावत नव्हतं त्यातच माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडल आहे. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर विहीर मिळावी, अशी मागणी आपल्या आईच्या नावे केली होती. यासाठी प्रयत्न करत असताना, गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी “तुला विहीर मंजूर करून देतो” असे सांगून, गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी आणि मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये, म्हणजे एकूण 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानन नगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचण्यात आला. या वेळी 20 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली आहे.