Home Blog Page 11

इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलासह आष्टीत दोघे जेरबंद

0

आष्टी — इंग्लिश बनावटीची पिस्तूल घेऊन चारचाकी वाहन ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी कारवाई करत सापळा रचून या चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले आहेत.

आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली . या रस्त्यावर सापळा लावून राहूल खोटे रा. मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

यामध्ये दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत त्यांना अटक करण्यात आली आहे. यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरील आरोपीकडे दोन पिस्तूल मिळून आल्याने या पिस्तूल च्या माध्यमातून काही घातपात घडवला जाणार होता का याची चौकशी केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा शोध आता आष्टी पोलीस घेत आहेत. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे,पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, नितीन काकडे,गणेश जगताप, परमेश्वर तागड,बब्रुवाण वाणी यांनी केली.

बीडात काय बी होतयं.‌.! दहावी विद्यार्थ्यांना मांडवात परीक्षेला तोंड द्यावं लागतंय !!

0

बीड — शिक्षण विभागाचा गलथान कारभार आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.परीक्षेसाठी चक्क नियम पायदळी तुडवून मांडव घातला. या मांडवातच विद्यार्थ्यांना दहावीचा पेपर सोडवावा लागला. हा लाजिरवाणा प्रकार कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाला.
बीडमध्ये कधी कुठे काय घडेल व त्यासाठी कसे नियम पायदळी तुडवले जातील याचा थांग पत्ता लागणं अवघड आहे. कॉपी मुक्त अभियान राबवले जात असताना ” मांडव पॅटर्न”उदयाला आणला गेला. कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी चक्क मांडव घालण्यात आला. तेथे बाकडे मांडण्यात आले. उन्हाची काहिली वाढलेली असताना तब्बल 85 विद्यार्थी पायावरती पॅड ठेवून ताटकळत कसाबसा पेपर सोडवावा लागला. या विद्यार्थ्यांच्या तारांबळीचा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झालेल्या परिणामाला जबाबदार शिक्षण विभाग राहणार आहे. एक महिन्यापासून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू असताना या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नाही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही का? विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवणं आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हा कुटाणा केला. नियमानुसार, बोर्डाची परीक्षा ही सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकृत परीक्षा कक्षातच होणे बंधनकारक असताना, कुर्ला केंद्रावर मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरू झाली आहे.या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ‌

शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार – आ. पंडित

0

गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

गेवराई — समाजातील वंचित, गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचे हास्य काम करण्याचे बळ देते असे सांगत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीय प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देत गेवराई विधानसभा मतदार संघातील एकही दिव्यांग व्यक्ति लाभापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. ते गेवराई तहसिल कार्यालय येथे दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप प्रसंगी बोलत होते.

गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना शुक्रवार, दि.२० रोजी आ. विजयसिंह पंडित यांच्याहस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, गटनेते शेख खाजाभाई, नायब तहसिलदार सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी आपल्या आयुष्यातील अडचणी, संघर्ष आणि स्वाभिमानाने उभे राहण्याची जिद्द खरोखर प्रेरणादायी आहे. समाजात प्रत्येकाला समान संधी आणि सन्मान मिळावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे अधिकतेने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजना खऱ्या अर्थाने दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील एकही दिव्यांग व्यक्ति शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी तळेवाडी येथील दिव्यांग राहुल थोटे, योगेश पवार, वैशाली चिकणे, अशोक यमगर, गीता येवले, विश्वांभर यमगर, गणेश येवले, कटचिंचोली येथील काका कोकणे, किरण कोकणे, दुर्गा काळे, लिंबाजी शिंदे, आगरनांदुर येथील शिवराज काळे, संतोष काळे, आप्पासाहेब काळे, लुखामसला येथील मिरा बरगे, ज्ञानोबा नलभे, अंजनाबाई नलभे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. गेवराई तहसिल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसेवक श्री. शहारुख पठाण, माजी नगरसेवक श्री. गोरख शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. शितल धोंडरे,  तौर,  पठाण, श्री. संदिप मडके, श्री. गोकुळ चोरमले, श्री. गणेश सावंत, श्री. वसीम फारोकी, श्री. दिनकर काळे, श्री. हनुमान कोकणे, श्री. बाबासाहेब जाधव, श्री. महेश ढेरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

ऐपतीच्या नादात “पत” घालवून बसला; तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात अडकला

0

बीड — वादग्रस्त म्हणून ओळख निर्माण केलेला परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे ऐपत प्रमाणपत्रासाठी वीस हजार रुपयाची लाच मागितल्याच्या कारणावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हा महाभाग इतका खतरनाक होता की, एसीबीच्या जाळ्यात अडकताच लोकांनी आनंदाने फटाके फोडून जल्लोष केला.
या ना त्या कारणावरून अनेक वेळा व्यंकटेश मुंडे वादग्रस्त राहिला. मोकाट कारभार हाकतांना तहसीलदार पदाची मर्यादा ही अनेक वेळा भंग केली. शेवटी पापाचा घडा भरला अन् एसीबीच्या जाळ्यात अडकला.या प्रकरणी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराला ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात वीस हजार रुपयांमध्ये तडजोडीने हे प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. या अनुषंगाने शुक्रवारी एका पथकाने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात दाखल होत या लाच प्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे याच्यावर कारवाई केली आहे.तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला संशय आल्याने त्याने प्रत्यक्षात ही लाच स्वीकारली नसली तरी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक सर्व पुरावे संकलित केले. सर्व शहानिशा केल्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे हा दोषी असल्याचे आढळले. त्यानुसार त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत अधिकृत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शना खाली पथकाने ही कारवाई केली आहे.

व्यंकटेश मुंडे कायम वादात राहिला

लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेला निवडणूक कामकाजापासून दूर करा, अशी मागणी केली होती.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वारंवार त्याच्या नावाचा उल्लेख करत त्याची बीड जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही परळीतील तहसीलमधून अनेक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आल्याचे प्रकरण हाती घेतले होते. या प्रकरणातही व्यंकटेश मुंडे याच्याकडे संशयाची सुई होती. तसेच अनेक वेळा काम करताना तहसीलदार हे वस्तुनिष्ठ काम करत नसल्याचे नागरिकांमधूनही वारंवार आरोप त्याच्यावर होत होते.वैद्यनाथ मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणातही तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष या नात्याने व्यंकटेश मुंडे हा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप झालेला आहे. एकंदरीतच सतत वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार व्यंकटेश मुंडे अखेर लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

तहसील परिसरात फटाके फोडले
दरम्यान, सतत वादग्रस्त ठरलेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती कळाल्यानंतर काही नागरिक तहसील परिसरात जमा झाले. यातील काही नागरिकांनी तर तहसील परिसरात येताना सोबत फटाके ही आणले. ‘अतिशय योग्य झाले’, ‘ही कारवाई व्हायलाच पाहिजे होती’ अशा प्रतिक्रिया व्यक्त करत याचा एक प्रकारे आनंद व्यक्त केला. या नागरिकांनी तहसील परिसरातच फटाके फोडून जल्लोष केल्याचेही बघायला मिळाले.

चोरीसाठी फ्युज काढून गावात अंधार केला;कपाट फोडून 9लाखासह सोन्याचा मुद्देमाल गायब केला

0

पाटोदा — डीपीतील फ्युज काढून गावात अंधार केला. घरात फोडत प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या नऊ लाखासह लाखोंच सोन घेऊन चोरटे पळाले असल्याची घटना जवळाला येथे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी गावात अंधार करून पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरात मध्यरात्री कडी-कोंडा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाट फोडून तब्बल ९ लाख रुपये रोख रक्कम आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील कपाट उघडे तर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून अंधाराचा फायदा घेत घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजच्या घडीला सोन्याचे दर उच्चांक गाठत असताना, कष्टाने कमावलेली रक्कम आणि भविष्यासाठी साठवलेले दागिने चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबीयांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. “माझ्या मुलाने ऊसतोडणी करून मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे चोरांनी नेले. आमचे पैसे परत मिळावेत, अशी भावनिक मागणी कुटुंबातील महिलांनी केली आहे.या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

कांद्याच्या पिकात अफूची शेती; साडेपाच लाखाची झाड जप्तं

0

केज — कांद्याच्या पिकात अफूची शेती केली जात असल्याचा प्रकार युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील सातेफळ येथे उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून साडेपाच लाख रुपये किमतीची साडेतेरा किलो अफूची झाड जप्त केली
अधिक माहिती अशी की, दि.17 फेब्रुवारी रोजी बन्सी घाडगे यांच्या सातेफळ येथील घाडगे वस्ती जवळील शेतात कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्या वरून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा मारला. त्यावेळी बन्सी महादेव घाडगे याने त्याच्या शेतातील कांद्याच्या पिकात लावलेले अफूची झाडे आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, महसूल मंडळ अधिकारी दयानंद मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारखे, सहाय्यक कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्या समक्ष अफूची झाडे उपटून त्यांचे वजन केले असता त्याचे वजन साडेतेरा किलो ग्रॅम असल्याचे आढळून. त्याची बाजार किंमत साडेपाच लाख रु. एवढी आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक भागवत शेलार महेश जोगदंड, दीपक खांडेकर, गणेश मरांडे यांच्यासह युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांनी कारवाई केली.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अफूची लागवड करणारा शेतकरी बन्सी महादेव घाडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

सोशल मीडियावर स्टोरी, स्टेटस वरून रक्तरंजित थरार;एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी

0

आष्टी — समाज माध्यमावर एकमेकांविरोधात स्टोरी स्टेटस टाकण्याच्या कारणावरून रक्तरंजीत थरार आष्टी तालुक्यातील रुईनालकोल मध्ये झाला. तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला गेला यामध्ये एकाचा मृत्यू होऊन दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
रूईनालकोल येथे सोमवार दि 16 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक शिवाजी नालकोल या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला‌. जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर ही भयानक घटना घडली असून सोमवारी तरूणांच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद भडकला. काही वेळातच, हा वाद टोकाला पोहोचला आणि वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीररित्या जखमी झाले.जखमी झालेल्या तरूणांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक नालकोल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर इतर 2 जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, याच्यासह अंमलदारांनी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

उघड्या ट्रांसफार्मर ने घेतला मुलाचा बळी; वीज कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

बीड — शहरातील गोरे वस्ती भागात असलेल्या एका उघड्या विद्युत रोहित्राला चिटकल्याने 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.शेख आवेज शेख परवेज असं या मृत मुलाचं नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमधून महावितरणविरोधात तीव्र संतापव्यक्त केला जात आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर विज कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.

गोरे वस्ती परिसरात नेहमीप्रमाणे जनजीवन सुरू असताना शेख आवेज हा परिसरातून जात होता. याच भागात महावितरणची एक उघडी डीपी आहे, ज्याची दारे उघडी होती आणि तारा बाहेर लोंबकळत होत्या. या उघड्या डीपीला आवेजचा अचानक स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्का लागून तो तिथेच कोसळला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित विभागाला माहिती दिली.

आवेजला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर गोरे वस्तीसह संपूर्ण शहरातील नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या डीपीची दुरवस्था आणि त्यातून होणारा धोका याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बीड शहरात अशा अनेक ठिकाणी उघड्या डीपी मृत्यूचा सापळा बनून उभ्या आहेत.

महावितरणचे अधिकारी शहरातील विजेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी केवळ कंत्राटदार (गुत्तेदार) पोसण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. कधी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागतात, तर कधी अशा प्रकारे निष्पापांचा बळी जातो, तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. दरम्यान, आवेजच्या मृत्यूला पूर्णपणे महावितरणचा निष्काळजीपणा जबाबदार असून वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी पीएम रूम समोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल असा आश्वासन दिल्यानंतर शेख अवेज याचे शव नातेवाईकांनी ताब्यात घेऊन आंदोलन मागे घेतले. उघड्या ट्रान्सफॉर्मर चा मुद्दा समाजसेवक डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी अनेक वेळा उपस्थित केला. लोकांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत जिल्हाधिकारी कार्यालय समोर अनेक वेळा आंदोलन देखील केली मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले परिणामी आज दुर्घटनेला सामोरे जावे लागले.अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्व उघड्या डीपी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुःखट्यात ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा

0

मुंबई — राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले  राज्य सरकारकडून राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत शासकिय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून  ७५ शाळांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अजित पवार ज्या फायलींवर मंत्री म्हणून विचार करीत होते, त्याच फायलींवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सह्या केल्याचा दावा केला जात आहे. हा सर्व प्रकार अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच घडल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, यातील पहिले प्रमाणपत्र २८ जानेवारी रोजी म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी देण्यात आले. त्यामुळे राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या निर्णयावर युवक काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, शासकीय सुटीच्या काळात कार्यालये बंद असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मान्यता देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली? या घाईगडबडीत नेमके कोणते कारण होते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चार दिवसांत ७५ प्रमाणपत्रांचं वाटप

२८ जानेवारीला एकूण ७ संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप

२९ आणि ३० जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना दर्जा

२ फेब्रुवारी: पुन्हा अनेक शाळांना दर्जा

अनेक प्रमाणपत्रे शासकीय वेळ संपल्यानंतर संध्याकाळी ६.४५ ते ६.५८ दरम्यान
७५ पैकी २५ शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या २९ जानेवारीला एकाच दिवशी देण्यात आली. तर सेंट झेवियर्सच्या ५ शाळांना दर्जा देण्यात आला.

स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या ४ शाळांना प्रमाणपत्रं देण्यात आली.

काँग्रेसने केली कारवाईची मागणी

युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या घाईघाईच्या प्रक्रियेमागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सिआयडी चौकशी आणि मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.

फायलींना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाइल्सवर दुपारी ४ वाजता सह्या करण्यात आल्या आणि ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. या घटनेची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसंच या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे.

स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

0

माजलगाव — स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शहरातील मुख्य रस्त्यावरील चव्हाण हॉस्पिटल समोर रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी  पाच जणांना विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रूपचंद कांबळे हा युवक स्कुटी क्र. एमएच 23 बीके 5193 ने मुख्य रस्त्यावरून जात होता. याचवेळी रवि कु-हाडे याने त्याच्या स्कुटीला कट मारला. याबाबत शुभमने विचारणा केली असता, आरोपीने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत स्कुटीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर शुभमला खाली पाडून रवि कु-हाडे व लक्ष्मण शिंदे यांनी इतरांना बोलावून मारहाण केल्याचा आरोप आहे.दरम्यान, शुभम तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना विशाल चव्हाण, विलास चव्हाण व राहुल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले. त्यावेळी रवि कु-हाडे याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. तसेच लक्ष्मण शिंदे यांनी छाती, पोट व इतर अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना घडत असताना शुभमचे वडील रूपचंद कांबळे घटनास्थळी आले. यावेळी त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणी शुभम रूपचंद कांबळे व रूपचंद साधोजी कांबळे यांच्या फिर्यादीवरून रवि मारोती कु-हाडे, विशाल नागोराव चव्हाण, विलास नागोराव चव्हाण, राहुल नागोराव चव्हाण व लक्ष्मण भगवान शिंदे सर्व रा. वडारवाडा, माजलगाव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.