पिकअप-टिप्परची जोरदार धडक; दोन तरुण भावांसह पाच जनावरांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील जोला-सारुळ पाटीजवळ पिकअप-टिप्परची समोरासमोर धडक; पाच जनावरांचाही अंत, जेसीबीच्या मदतीने जखमींना बाहेर काढले
केज — केज-मांजरसुंबा मार्गावरील जोला-सारुळ पाटीजवळ रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी भीषण रस्ते अपघात झाला. जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिल्याने पिकअपमधील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टिप्पर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून पिकअपमधील पाच जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूर येथील आठवडी बाजारातून जनावरे घेऊन पिकअप (एमएच ४४, यू ४३०७) अंबाजोगाईच्या दिशेने जात होता. दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास केजपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर, रेणू पेट्रोल पंपाजवळील जोला-सारुळ पाटी येथे समोरून येणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या टिप्परने (एमएच ४४, यू ९५५७) पिकअपला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात पिकअपच्या केबिनमध्ये बसलेले हनीफ शौकत कुरेशी (वय २०) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०, दोघे रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कुरेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्परच्या केबिनमध्ये अडकले चालक-क्लिनर

अपघातानंतर टिप्परच्या केबिनमध्ये चालक अमोल खंदारे (रा. कारेगव्हाण, ता. वडवणी) आणि उत्तर प्रदेशातील क्लिनर पप्पू यादव अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. केबिनचा दरवाजा उघडून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बीड येथील रेणू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाच जनावरांचाही मृत्यू

या अपघाताची झळ मुक्या जनावरांनाही बसली. पिकअपमधून वाहतूक करण्यात येत असलेल्या पाच गोवंशीय जनावरांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. वाहनांचे नुकसान, दोन तरुणांचा मृत्यू आणि जनावरांची हानी यामुळे अपघाताची तीव्रता स्पष्ट झाली.

अपघाताचा आवाज ऐकून नागरिक धावले

अपघातस्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या चालकांनी अपघाताचा प्रचंड मोठा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने बाहेर येऊन पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

केज पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

अपघाताची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, अमीरोद्दीन इनामदार आणि बाळासाहेब रोडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या हनीफ कुरेशी यांचा मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर आरेफ कुरेशी यांचा मृतदेह नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्घटनेमुळे केज-मांजरसुंबा मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles