Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड जिल्हा परिषद चौकशी आता उच्चस्तरीय पातळीवर सुरू झाली आहे. नियमबाह्य पदोन्नती, अधिकाऱ्यांना मर्जीने दिलेले अतिरिक्त कार्यभार…
बीड — नियमबाह्य पदोन्नती, अधिकाऱ्यांना मर्जीने दिलेले अतिरिक्त कार्यभार, निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती, दिव्यांग आरक्षणातील अनियमितता आणि निधी वितरणातील कथित गैरव्यवहार अशा अनेक तक्रारींमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. तक्रारींशी संबंधित सर्व मूळ अभिलेखे, संचिका आणि कागदपत्रे २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आष्टी तालुक्यातील करेवाडी येथील राम सूर्यभान खाडे यांनी १९ मे, २६ मे आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन तसेच विभागीय आयुक्तांकडे विविध पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील प्रशासकीय निर्णय, पदभार वाटप आणि आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या तक्रारींच्या अनुषंगाने आता थेट मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच बीड, आष्टी, पाटोदा आणि गेवराई पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार देताना नियमांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप आहे. निलंबित तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला सामोरे गेलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिनियुक्ती देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असताना काही आदेश काढण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. दिव्यांग आरक्षणातून नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी पुरेशा प्रमाणात झाली नसल्याची तक्रार आहे. या आरक्षणातून नियुक्त झालेल्या सुमारे दीड हजार शिक्षकांपैकी केवळ २०० शिक्षकांचीच वैद्यकीय पुनर्तपासणीसाठी यादी पाठविण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यसैनिक पाल्य कोट्यातून झालेल्या कथित बोगस नियुक्त्यांचाही या प्रकरणात समावेश आहे.
आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या निधी वितरणात पदभार बदलल्यानंतरही जुन्या लॉगिन आयडी आणि डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. धारूर तालुक्यातील हंगामी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षापेक्षा अधिक दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले उचलल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
याशिवाय तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या ३० पेक्षा अधिक कारणे दाखवा नोटिसा आणि त्यानंतर झालेल्या कारवाईची माहिती दडपण्यात आल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणावर यापूर्वी सुनावणी झाली होती. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशातून अनेक मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने आता मूळ अभिलेखे मागविण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी दिलेल्या उत्तरांवरच अवलंबून न राहता प्रत्यक्ष आदेश, नोंदी, आर्थिक व्यवहारांच्या संचिका आणि इतर कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली जाणार आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत कोणती कागदपत्रे सादर होतात, त्यातून कोणत्या प्रशासकीय निर्णयांवर प्रकाश पडतो आणि तक्रारींमधील आरोपांमध्ये कितपत तथ्य आढळते, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कारभाराची ही तपासणी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे आता बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
📌 हे पण नक्की वाचा
शेतकरी असाल तर तुमचे Farmer ID Registration – AgriStack झाले आहे का? नसेल झाले तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.
अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र शासन – अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?
बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री
WhatsApp चॅनल Follow करा →✓ 100% फ्री • ✓ रोज अपडेट • ✓ कधीही Unfollow करू शकता