माजलगावात डीपी बसवताना वीजप्रवाह सुरू; ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

माजलगाव —  शहरातील बायपास रोडवर नवीन डीपी बसविण्याचे काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून ३२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. आवेज पाशा देशमुख (रा. केसापुरी, ता. माजलगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. रविवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

बायपास रोडवरील चाऊस यांच्या तबेल्यासमोर नवीन डीपी बसविण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले होते. रविवारी चार मजूर हे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडून दुपारी चार वाजेपर्यंतचे शटडाऊन अथवा परमिट घेण्यात आल्याचे सुपरवायझरकडून मजुरांना सांगण्यात आले होते.

मात्र, काम सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास अचानक वीजप्रवाह सुरू झाला. त्यावेळी खांबावर अथवा डीपीजवळ काम करत असलेल्या शेख आवेज पाशा देशमुख यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ते खाली कोसळले.

घटना लक्षात येताच सहकारी कामगार आणि नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत कामगाराच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचे सहायक अभियंता, संबंधित लाईनमन, कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे आणि सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक वीजपुरवठा कसा सुरू झाला, शटडाऊन किंवा परमिटच्या प्रक्रियेत नेमकी काय त्रुटी झाली आणि या दुर्घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, याचा पोलीस तपास सुरू आहे.

या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वीज विभागाच्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles