मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता प्रत्यक्षात येत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांचा स्वतंत्र गट तयार करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या राजकीय घडामोडींना सध्या काही अडथळे निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचा व्हीप; उद्या ठरणार खासदारांचे भवितव्य
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. संसदीय दलाची तातडीची बैठक उद्या सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते.
ठाकरे गटाने संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर सल्लाही घेतल्याची माहिती आहे. फुटीर खासदारांविरोधात पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार संजय दिना पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे या घडामोडींना वेगळे वळण मिळाल्याची चर्चा आहे. दोन्ही खासदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
ओमराजे निंबाळकर यांनी आपण सध्या पुण्यात असून २० तारखेच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. मुलाची तब्येत ठीक नसल्याने आपण पुण्यात थांबल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपशी संवादाची चर्चा
दरम्यान, काही खासदारांच्या भवितव्याबाबत भाजप नेत्यांशी संवाद सुरू असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांचा विचार करून काही नेते निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मात्र या सर्व घडामोडींमध्ये उद्याची संसदीय दलाची बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील किती खासदार बैठकीला उपस्थित राहतात आणि त्यानंतर पक्ष कोणती कारवाई करतो, यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील दिशा ठरणार आहे.

