बीडमध्ये बंद घरं फोडणारा चोरटा अटकेत; दोन घरफोडीचे गुन्हे उघड

बीड — बंद घराचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कलीम अलीम शेख (वय 32, रा. दहीफळ, ता. जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून बीड शहरातील दोन घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.


प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी दिनांक 9 जून 2026 रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 155/2026 अन्वये कलम 331(3)(4) बी.एन.एस. प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरील घरफोडी कलीम अलीम शेख याने केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते. मात्र आरोपी फरार होता.
दरम्यान, दिनांक 15 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, कलीम शेख हा बीड येथील नाळवंडी नाका परिसरात कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने शिवाजीनगर येथील घरफोडीची कबुली दिली. तसेच बीड शहरातील हिना नगर भागात देखील एका बंद घरात चोरी केल्याची माहिती दिली. पोलीस अभिलेख तपासल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 कलम 331(3) बी.एन.एस. प्रमाणे दाखल असलेला गुन्हाही त्यानेच केल्याचे समोर आले.
आरोपीकडून उघड झालेले गुन्हे :
शिवाजीनगर पोलीस ठाणे — गु.र.नं. 155/2026 कलम 331(3)(4) बी.एन.एस.
बीड शहर पोलीस ठाणे — गु.र.नं. 126/2026 कलम 331(3) बी.एन.एस.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नगदी मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक  चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक  समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख  शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, गोविंद राख, पोलीस अंमलदार आश्पाक सय्यद, मनोज परजणे व चालक नितीनजी वडमारे यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles