परळी — परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून अपहरण झालेल्या 54 वर्षीय व्यक्तीची स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने सुटका केली आहे. पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 4 जून 2026 रोजी रात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54, रा. संगम, ता. परळी वै., जि. बीड; सध्या थर्मल कॉलनी, परळी) यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 266/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मारुती सुझुकी कंपनीची एक गाडी संशयास्पद आढळून आली. या वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत तपास पथक अमरावतीपर्यंत पोहोचले.
अमरावती येथे तपास करत असताना अपहरण झालेल्या तुकाराम मुंडे आणि आरोपींची माहिती मिळवण्यात आली. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डोळ्यावर पट्टी बांधून सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
तपासात हे अपहरण पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे (दोघे रा. परळी), अल्केश विष्णुजी अवजाडे आणि शुभम राजू पिंपळकर (दोघे रा. मंगरूळ चावला, जि. अमरावती) यांचा सहभाग असल्याचे समोर आले.
यातील संतोष नारायण वंजारे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर उर्वरित आरोपींचा नागपूर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथे शोध घेण्यात आला. परळी ग्रामीण पोलिसांनी सचिन वंजारे, अल्केश अवजाडे आणि शुभम पिंपळकर यांनाही अटक केली आहे.
सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.




