Home सामाजिक आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने बीडमध्ये उभारले जाणार मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने बीडमध्ये उभारले जाणार मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र

0
8

नसबंदी व लसीकरण मोहिमेला गती;५० लाखांचा निधी मंजूर

बीड —  शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर अखेर मोठी आणि दिलासादायक कारवाई सुरू झाली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आ. विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत मोकाट कुत्र्यांच्या निवारा केंद्रासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. हा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.


शहरातील धानोरा रोडवरील पंढरी नगरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आ. विजयसिंह पंडित यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

राजीव गांधी चौकाजवळ उभारले जाणार निवारा केंद्र

नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत, राजीव गांधी चौक परिसरात मोकाट कुत्र्यांसाठी आधुनिक निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना

आ. विजयसिंह पंडित यांनी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि पालिका पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीने मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानंतर पालिकेने शहरात नसबंदी आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, खंडेश्वरी रोड परिसरात आतापर्यंत ५०० हून अधिक मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता शहरभर विशेष शोध मोहिम राबवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित असताना दुर्लक्ष झाल्याची टीका होत होती. मात्र आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आ. विजयसिंह पंडित शहर विकासासाठी “ॲक्शन मोड”मध्ये असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here