महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा SSC Result 2026 उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव वापरून अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार असून डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध होणार आहे.
मुंबई — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केली असून राज्यभरातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर रोल नंबर आणि आईचे नाव टाकून पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने सर्व्हर स्लो होऊ शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SSC निकाल 2026 पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
results.navneet.com
डिजीलॉकरवरही उपलब्ध होणार डिजिटल मार्कशीट
यंदा विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवरून डिजिटल मार्कशीट डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाची अधिकृत डिजिटल प्रत सहज मिळणार आहे.
गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज
निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
पुनर्परीक्षेची संधी
जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवावी. ही प्रत पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपयोगी ठरू शकते

