बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने 10 वर्षांच्या मामेबहीणीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून युसुफ वडगाव पोलिसांनी पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
केज — सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने दहा वर्षाच्या आपल्याच चिमुकल्या मामी बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे.
केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षीय नराधम भाच्याने आपल्या अवघ्या 10 वर्षांच्या लहान बहिणीवर (मामाच्या मुलीवर) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन दिवसांतील ही अत्याचाराची तिसरी घटना असल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या मामाच्या गावी आला होता. ज्या घरात आश्रय घेतला, ज्या मामाने प्रेम दिले, त्याच घराचा विश्वासघात केला. घटनेच्या रात्री मामा आणि मामी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. घरात दहा वर्षांची चिमुकली एकटीच असल्याचे पाहून आरोपीची वाईट नजर गेली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने या चिमुकलीवर अत्याचार केला आणि मामा घरी परतण्यापूर्वीच तिथून पळ काढला.
आई-वडील घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. पोटच्या पोरीची अवस्था पाहून पालकांनी तातडीने युसूफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पाॅक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने चक्रे फिरवून आरोपीचा माग काढला आणि त्याला ईटकूर येथून बेड्या ठोकल्या.




