वडीगोद्री/अंबड (जालना) अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून ‘केणी’ आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ प्रमुख वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय तपासात असे उघड झाले की, नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेत बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांब अंतरावर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात होती. महसूल पथक नदीत पोहोचू शकणार नाही, या अंदाजावर तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू होती.

१८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने वारंवार धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा यंत्रसामग्रीच्या मदतीने शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवली. त्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलत गुन्हे दाखल केले.
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली.
गुन्हा दाखल आरोपी (मुख्य)
माळस पिंपळगाव (ता. गेवराई) हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे, प्रवीण राऊत
सावळेश्वर (ता. गेवराई), बंटी उदे, मुकेश कुटे
भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख
तसेच राक्षसभुवन व सुरळेगाव येथील इतर साथीदारांचा समावेश
ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रशासनाचा इशारा
“पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करी सुरू राहिली, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत,” असा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिला आहे.

