लिंबागणेश वाणीवस्तीवर बिबट्याचा हल्ल्यात  शेळी ठार, परिसरात भीतीचे वातावरण

लिंबागणेश.— तालुक्यातील लिंबागणेश येथील वाणीवस्ती परिसरात मध्यरात्री बिबट्याने घुसखोरी करत बाबुराव वाणी यांच्या गोठ्यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वाणीवस्ती तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील असा की, वाणीवस्ती येथील बाबुराव वाणी यांचे एकत्रित कुटुंब असून घरासमोर असलेल्या गोठ्यात गायी, म्हशी आणि शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोठ्यात जनावरांची धडपड सुरू झाल्याने बाबुराव वाणी यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काही जनावर पळताना दिसले.

बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करत असताना एका शेळीचा नरडा तोडलेला असून मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसले. याचवेळी बॅटरीच्या प्रकाशात समोरच बिबट्या उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकाश पडताच बिबट्या तात्काळ पळून गेला.

या घटनेनंतर वाणीवस्ती व परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याच्या भीतीने अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांमध्ये विशेषतः भीती असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना अयोध्या वाणी म्हणाल्या,“आम्ही शेतात राहतो. आमच्या अंगणात लहान मुले खेळत असतात. कुटुंबातील पुरुष कामानिमित्त बाहेर जातात. रात्री बिबट्याने शेळी ठार केल्यामुळे आम्हाला मोठी भीती वाटत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा.”

दरम्यान, वनविभागाने पिंजरे लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात लिंबागणेश परिसरात बिबट्या आढळून आल्यामुळे डॉ. ढवळे यांच्या मागणीनुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन जनजागृती केली होती.

परिसरात ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवावी, पिंजरे लावावेत, तसेच गस्त वाढवावी. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून सुरक्षिततेची हमी द्यावी

डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर 

सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles