गेवराई — महामार्गाच्या दुभाजकात अपघात ग्रस्त अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात सहा तरुण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री गढी येथील उड्डाणपूलावर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे ८.३० च्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. यात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले. दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सूरय्या, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

