बीड — जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने नवगण राजुरी येथे मोठी कारवाई केली. एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 60 किलो 70 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 30 लाख 3 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गौसखान उर्फ बाबू उमरखान पठाण (वय 60, रा. नवगण राजुरी, ता. जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहिती; मध्यरात्री छापा
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला नवगण राजुरी येथील गौसखान पठाण याच्या घरात विक्रीच्या उद्देशाने गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 10.15 वाजता संबंधित घरावर छापा टाकला. घराची तपासणी केली असता चार वेगवेगळ्या गोण्यांमध्ये हिरवट रंगाचा, पाने, फुले, बिया आणि बोंडे असलेला गांजासदृश पदार्थ आढळला. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केल्यानंतर त्याचे एकूण वजन 60 किलो 70 ग्रॅम भरले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
NDPS कायद्यानुसार गुन्हा; आरोपीला अटक
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 378/2026 नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act), 1985 मधील कलम 8(c) आणि 20(b)(ii)(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.
माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
बीड जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणारे, विक्री करणारे, वाहतूकदार तसेच या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांची माहिती नागरिकांनी निर्भयपणे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्ष संपर्क क्रमांक : 9270243200
माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

