बीड — दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त यंत्रणा प्रत्यक्ष शेतांवर पोहोचली असून, २३८ गावांमध्ये गावनिहाय पथकांमार्फत नुकसानीची नोंद केली जात आहे.
प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मंडळ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांकडून या कामावर देखरेख ठेवली जात आहे.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी १ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून पंचनामे अचूकपणे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनाम्यांच्या कामाला गती देण्यात आली आहे.
शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यावर भर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पंचनामे प्रत्यक्ष बांधावर जाऊन अचूकपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यात नोंदविलेली माहिती शेतकऱ्याने तपासल्यानंतर त्याची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीकविमा तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीसाठी पंचनाम्याची अचूक नोंद महत्त्वाची ठरणार आहे.
बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी बेलूरा येथे पाहणी करून पंचनाम्याच्या कामाचा आढावा घेतला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून गावनिहाय प्रगतीचा पाठपुरावा सुरू आहे. गटविकास अधिकारी डॉ. विलास डोंगरे आणि तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांच्याकडूनही संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, पंचनामा पथक शेतात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीची अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि पंचनाम्यातील नोंद तपासून स्वाक्षरी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


