अंबाजोगाई — न्यायालयात फौजदारी खटल्याचे कामकाज सुरू असतानाच एका आरोपीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अंबाजोगाई न्यायालयात एकच खळबळ उडाली. आरोपीने पेट्रोल ओतल्यानंतर आगपेटी काढल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र, उपस्थित वकिलांनी वेळीच हस्तक्षेप करून आगपेटी काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक एकमध्ये घडली. विलास कुंडलिक घुगे (रा. लाडेवडगाव, ता. केज) हा एका फौजदारी खटल्याच्या सुनावणीसाठी मुलगा आणि वकिलांसह न्यायालयात उपस्थित होता.
फिर्यादीला लगेच बोलवा, म्हणत पेट्रोल अंगावर ओतले
खटल्यातील फिर्यादीकडून आपल्या पत्नीविषयी गावात आक्षेपार्ह चर्चा केली जात असल्याचा आरोप घुगे याने केला. याच कारणावरून फिर्यादीला तातडीने न्यायालयात बोलावण्याची मागणी त्याने केली. फिर्यादीला लगेच बोलावले नाही तर आत्महत्या करणार असल्याचे सांगत त्याने अचानक खिशातून पेट्रोलची बाटली बाहेर काढली.
काही कळण्याच्या आत आरोपीने सुमारे अर्धा लिटर पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर त्याने खिशातून आगपेटी बाहेर काढल्याने न्यायालयातील उपस्थितांमध्ये मोठी धावपळ उडाली.
वकिलांनी वेळीच रोखले
आरोपीच्या हातात आगपेटी दिसताच वकील आय. ए. गवळी यांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेत त्याला पकडले. त्याचवेळी सरकारी वकील एस. एम. वाघमारे यांनी आरोपीच्या हातातून आगपेटी काढून घेतली. इतर वकिलांनीही आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती सरकारी वकील वाघमारे यांनी पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांना दिली. माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांचे पथक न्यायालयात पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले.
सहाय्यक बालाजी चाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा
या प्रकरणी दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयाचे सहाय्यक बालाजी चाटे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात विलास घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आवारातच घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


