Home जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीला गैरहजेरी; केज तहसीलदारांचा पदभार काढला

दुष्काळ आढावा बैठकीला गैरहजेरी; केज तहसीलदारांचा पदभार काढला

0
7
बीड —  मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाकडून उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी  पक्षातील लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत असतानाच केज तहसीलदार भारत गंगावणे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गंगावणे यांच्याकडील केज तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार काढून तो नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपविला आहे.

केज तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शनिवारी (दि. २६) केज तहसील कार्यालयाला भेट दिली. आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला तहसीलदार भारत गंगावणे गैरहजर राहिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच दुष्काळ आढावा बैठकींना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही गंगावणे बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदभाराबाबत निर्णय घेतला.
दुष्काळी परिस्थितीत तहसीलदार हा तालुकास्तरावरील उपाययोजनांचा महत्त्वाचा समन्वयक असतो. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये आणि उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेने पदभार बदलण्याचा आदेश काढला आहे.
आदेशानुसार, केज तहसीलदार भारत गंगावणे यांच्याकडील अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार (महसूल-२) अशोक भंडारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना, शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी तसेच तालुकास्तरावरील प्रशासकीय कामकाजाचा सातत्याने आढावा घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here