बैलगाड्या निघाल्या, शेतकरी एकवटले; आष्टीच्या पाण्यासाठी बीडमध्ये महामोर्चा

बीड — कडक उन्हाची तमा न बाळगता शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि पाण्यासाठीचा आक्रोश थेट बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन करावे, या मागण्यांसाठी सोमवारी (२८ सप्टेंबर) बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आला. माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली.

चऱ्हाटा फाटा येथून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक, सोबत बैलगाड्या आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले शेतकरी-महिला, असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. पाण्याचा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नसून गावागावातील कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेला असल्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला.

या मोर्चाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे पारंपरिक बैलगाड्यांचा सहभाग. शेतकऱ्यांसोबत माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांनीही बैलगाडीतून प्रवास करत मोर्चात सहभाग घेतला. अहिल्यानगर मार्गाने पुढे सरकणारा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे दोन्ही माजी आमदारांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी पाण्याच्या प्रश्नावरून नेत्यांनी सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.

समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवा

सभेत भीमराव धोंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते दुष्काळी भागाकडे वळविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तालुक्यांचा अशा पाणीवाटपाच्या योजनांमध्ये प्राधान्याने समावेश करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पाणीप्रश्नासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून ठोस निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रश्नावर वर्षभरात निर्णय झाला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही धोंडे यांनी दिला.

उजनीच्या पाइपलाइनवरून आजबेंचा सवाल

बाळासाहेब आजबे यांनी आपल्या भाषणातून उजनी धरणातून आष्टी तालुक्याला पाइपलाइनद्वारे पाणी देण्याच्या योजनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. आपण आमदार असताना या योजनेला मंजुरी मिळाली होती आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती, असे त्यांनी सांगितले.

मात्र, सत्ताबदलाच्या काळात झालेल्या तक्रारींमुळे काम रखडल्याचा आरोप आजबे यांनी केला. पाण्यासाठी महत्त्वाचा असलेला एक ते दोन वर्षांचा कालावधी यामुळे वाया गेला आणि मतदारसंघाला हक्काच्या पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली, असे ते म्हणाले.

दुष्काळात टँकर ग्रामपंचायतींच्या हातात द्या

दुष्काळाच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी टँकरचे खासगीकरण करण्यास भीमराव धोंडे यांनी विरोध केला. टँकरची व्यवस्था खासगी कंत्राटदारांकडे देण्याऐवजी ग्रामपंचायतींच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हाताला तातडीने काम मिळावे यासाठी रोजगार हमीची कामे सुरू करावीत, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी आणि फळबागांसाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

हा मोर्चा सत्तेविरोधात नाही

मोर्चाच्या राजकीय भूमिकेबाबतही भीमराव धोंडे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. आपण सत्तेत असल्याने हा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नसून जनतेचे प्रश्न वेळेत सोडवले जावेत, यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

आष्टी, पाटोदा आणि शिरूरचा पाणीप्रश्न हा राजकारणाचा विषय नसून नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सुरेश धस यांच्या भूमिकेवर धोंडेंचा पलटवार

महामोर्चात सहभागी न होण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही सभेत राजकीय वातावरण तापले. धोंडे यांनी धस यांच्या भूमिकेवर टीका करत, चांगल्या कामात खोडा घालण्याची जुनी सवय असल्याचा टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकल्पाला मंजुरी कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. समुद्राकडे वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत अद्याप ‘डिटेल सर्व्हे’ झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आजबेंचा ‘मॅडम’च्या मुद्द्यावरून टोला

बाळासाहेब आजबे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील जमीन व्यवहाराचाही मुद्दा उपस्थित केला. अनेक गावांमध्ये लोकांच्या जमिनी हडपण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कोण करत आहे, हे सर्वांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी, ‘साहेब, जरा मॅडमला आवरा,’ असा सल्ला दिला.

या वक्तव्यामुळे सभेत पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन

मोर्चानंतर दोन्ही माजी आमदारांसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पाणी वळविणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे आणि ग्रामपंचायतींकडे टँकर व्यवस्था देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

आष्टी, पाटोदा आणि शिरूरच्या पाणीप्रश्नावर आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष निर्णय हवा, असा सूर या महामोर्चातून उमटला. बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles