हलगीच्या कडकडाटात शेतकऱ्यांचा आक्रोश; दुष्काळ आणि पीकविम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बीड —  दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानभरपाई द्यावी आणि प्रलंबित पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बुधवारी (१६ सप्टेंबर) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले.

तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फटका बसल्याने शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई द्यावी, २०२० सालचा प्रलंबित पीकविमा तातडीने जमा करावा, तसेच यावर्षीचा पीकविमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अतिवृष्टीच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या मदतीनुसार हेक्टरी १७ हजार रुपयांची नुकसानभरपाई पीकविम्यातून देण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली.

 

३० ते ३५ गावांत बैठका

आंदोलनासाठी शेतकऱ्यांना संघटित करण्याच्या उद्देशाने शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील ३० ते ३५ गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. नाळवंडी, लिंबागणेश, राक्षसभुवन, कुक्कडगाव, पिंपळगाव मांजरा, माळसापूर, एकनाथवाडी, उमरी, उमरत खालचा, नागापूर खुर्द, नागापूर बुद्रुक, बराणपूर, भाटसांगवी, कुर्लादगाव, माळापुरी, कामखेडा, बकरवाडी, घाटसावळी, कोल्हारवाडी, समनापूर, मोची पिंपळगाव, पाली, नेकनूर, मंजरी फाटा आणि पिंपळनेर आदी गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमाले, बाळासाहेब मोरे, कुलदीप करपे, राजू गायके, सादिक पठाण, हनुमान घोडके, अर्जुन सोनवणे यांच्यासह मोर्चाचे पदाधिकारी तसेच शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles