Home राज्य मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम!

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम!

0
20

बीड —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावून उपचार देण्यात आले. उपचार घेतल्यानंतरही मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

मी १०० टक्के मुंबईला जाणार आहे. उद्या दुपारी १ वाजेनंतर येथून मुंबईकडे निघणार आहे. सलाईन लावल्यामुळे आज मला उठता आले नाही,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

उपोषण सुरू असताना मोठा प्रवास करणे शरीरासाठी त्रासदायक ठरत असल्याचेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र आता उपचार घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे.

गाडी कुठेही थांबवू नका’

मुंबईकडे जाताना आपल्याला उशीर होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी समर्थकांना दिल्या. “माझी गाडी कुठेही थांबवू नका. मी थेट मुंबईत जाणार आहे. मला आझाद मैदानात कोण जाऊ देत नाही, ते बघतो,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

मुंबईत मराठ्यांनी नेमके कधी यायचे, हे सध्या सांगणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारसोबत कोणतीही चर्चा झाली तर त्याची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अडवलं तर मराठ्यांना बोलावून घेणार’

मुंबईच्या मार्गावर अडविण्याचा प्रयत्न झाल्यास समर्थकांना बोलावून घेण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. “मला अडवलं तर मराठ्यांना बोलावून घेणार,” असे ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत पोलिसांनी आंदोलनासाठी पर्यायी व्यवस्था किंवा गणेशोत्सवानंतरचा कालावधी विचारात घेण्यास सांगितले आहे.

सरकारचा मसुदा आधी पाहणार

सरकारकडून आलेला मसुदा आधी पाहून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. “राज्य सरकारचा मसुदा आलेला आहे. आधी तो काय आहे ते बघून घेतो,” असे ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा वेळोवेळी अवमान झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील, असे विधान त्यांनी केले.

प्रश्न कधी सोडवायचे? माणसं मेल्यावर, समाज उध्वस्त झाल्यावर? तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे का?” असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेमुळे आता पुढील प्रवासाकडे आणि सरकारकडून होणाऱ्या हालचालींकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आंदोलनाचा निर्णय पुढे ढकलावा, असे आवाहन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here