बीड — राज्यात फडणवीस आणि केंद्रातल मोदी स्वतःला हिंदुत्ववाद्यांचं सरकार म्हणून किती जरी टेंभा मिरवत असले तरी यांची हिंदूविरोधी धोरणं चार चार पाच पाच तास वीज कपात करून ऐन सणासुदीच्या काळात ग्रामीण जनतेच्या मुळावर उठू लागली आहेत.
सध्या राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. शहरांमधून मोठ्या प्रमाणावर रोषणाई करून आनंदोत्सव केला जात आहे. गौराईच्या आगमनाची ही प्रतीक्षा हिंदूधर्मीय करत आहेत अशावेळी ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणीत आणखी वाढ करण्याचा विडाच महावितरण ने उचलला आहे. ग्रामीण भागातील जनता देखील बहुतांश हिंदू आहे याचा विसर सरकारला देखील पडला आहे. हिंदू विरोधी धोरण राबवत महावितरण ग्रामीण भागातील सिंगल फेज फिडरवर चार चार पाच पाच तास वीज कपात करून दुष्काळाच्या तोंडावरच कपातीचा झटका देऊन मुळावर उठले आहे. महावितरणचे अधिकारी ठराविक वेळ ग्राह्य धरून देखील वीज कपात करत नाहीत. ज्यावेळी लहर येईल त्यावेळी वीज पुरवठा चालू करण्याचे आदेश दिले जातात. एखाद्या वेळी अधिकारी नशेत असला तर किती तासाने वीज येईल हे सांगणं अवघड होऊन बसत आहे.
बीड ग्रामीण मधील चौसाळा, लिंबागणेश, नेकनूर, नाथापूर, शिवणी, साक्षाळ पिंप्री भागातील बहुतांश जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सणासुदीच्या दिवसात देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा गोडधोड मिळू नये याची व्यवस्था महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज कपातीच्या माध्यमातून केली आहे. संध्याकाळी शेतातून घरी येताच वीज कपात होते. मग घरात प्यायला पाणी नसलं तर अंधाऱ्या रात्री विहिरी बारवावर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे घरात दळण नसलं तर रात्री बारा वाजता एक वाजता ज्यावेळी वीज पुरवठा होईल त्यावेळी घरात आहे ते शिजवून खाण्याची वेळ यांनी आणली आहे. महावितरण च्या अधिकाऱ्यांनो कदाचित ग्रामीण भागात राहणारा कष्टकरी वर्ग हा हिंदूंमध्ये मोडत नाही का? एवढा वेळ पूर्व सूचना न देता शहरी भागाचा वीज पुरवठा खंडित करून दाखवा म्हणजे सरकारचा जनतेचा, लोकप्रतिनिधींचा हिसका काय असतो हे कळेल ? ग्रामीण भागात फक्त मतदानापुरतच तोंड दाखवणारे नेते या प्रश्नावर आवाज उठवणार का? आमदार खासदार या प्रश्नावर तोंड का उघडत नाहीत? ग्रामीण भागात गावठाण फिटर चालू करताना वेळेचा बंधन गुत्तेदारांना या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी का घातलं नाही? गावठाण फिडर च्या नावाखाली बिल काढून टक्केवारी घेण्यात मश्गूल असलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामीण जनतेच्या अडचणी समजत नाहीत का? कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कपातीचे आदेश देताना अधिकाऱ्यांच्या तोंडाला लकवा का मारला जात नाही असा प्रश्न देखील ग्रामीण भागातील वृद्धांकडून विचारला जात आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांना महावितरण चे अधिकारी वीज कपात करून खतपाणी घालत आहेत का? खतपाणी घालत असतील तर चोरांकडून किती टक्केवारी मिळते हे देखील जाहीर करावं म्हणजे गावकऱ्यांकडून पट्टी करून या अधिकाऱ्यांना देता येईल असा संतप्त सूर देखील ग्रामीण जनतेतून उठू लागला आहे.

