MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची पुन्हा तपासणी, SIT चौकशीचे आश्वासन

मुंबई — राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये मंत्रालयात तब्बल पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपरची पुन्हा तपासणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. तसेच परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांची विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांनी सांगितले.

आठ दिवसांत ठोस कारवाईचे आश्वासन

पेपरफुटीच्या प्रकरणात पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेतील गुणांची पुन्हा तपासणी करण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. गुणांशी संबंधित प्रश्नांवर दळवी समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

परीक्षेशी संबंधित विविध प्रश्न व्ही. राधा समितीसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षेचे पेपर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले.

मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती पुढे ढकलण्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. परीक्षा प्रक्रियेतील प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत या मुद्द्यावरही विद्यार्थ्यांनी भूमिका मांडली.

MPSC अध्यक्षांच्या राजीन्याची मागणी कायम

दरम्यान, बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ नयेत यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक आणि ठोस बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

उपोषण मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. बैठकीनंतर विद्यार्थी प्रतिनिधी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. सरकारकडून दिलेली आश्वासने आणि त्यावर होणारी कार्यवाही याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे आता SIT चौकशी, पेपरची फेरतपासणी आणि गुणांबाबतच्या निर्णयाकडे राज्यसेवा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles