मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५,०८६ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५,०२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. त्या वेळी ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता.
दोन टप्प्यांत १२.५८ लाख शेतकऱ्यांना लाभ
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाकडून कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे नेली जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे नियोजन आहे. तसेच २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलने केली. सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर योजना जाहीर करण्यात आली.
सुरुवातीला २०१९च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत काही मर्यादा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर या निर्णयात बदल करून अशा शेतकऱ्यांचेही २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
योजनेसाठी ४०,९८० कोटींचा खर्च अपेक्षित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारला अंदाजे ४० हजार ९८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या वेळोवेळी अद्ययावत केली जात असून, कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.




