बीड — बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर १९ वर्षीय महिलेच्या पोटात ग्लोज आणि टिश्यू पेपर राहिल्याचे आढळून आले आहे. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच महिलेची प्रकृती बिघडली. पोटात राहिलेल्या या साहित्यामुळे संसर्ग वाढला आणि अखेर महिलेला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे तब्बल पाच तासांची शस्त्रक्रिया करून पोटातील साहित्य बाहेर काढण्यात आले.
वडवणी तालुक्यातील संध्या सुरज गायकवाड (वय १९) यांना १ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसूतीनंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले.
घरी गेल्यानंतर संध्या गायकवाड यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर शस्त्रक्रियेदरम्यान पोटात साहित्य राहिल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात हातमोजे आणि टिश्यू पेपर आढळले. पोटात हे साहित्य राहिल्याने गंभीर संसर्ग झाला होता. संसर्गाची तीव्रता वाढल्याने तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करून पोटातील साहित्य बाहेर काढण्यात आले.
मात्र संसर्ग गंभीर असल्याने संध्या गायकवाड यांची प्रकृती अद्याप अत्यंत चिंताजनक आहे. त्या सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
नवजात मुलीला आईच्या दुधापासून वंचित राहण्याची वेळ
सिझेरियनदरम्यान संध्या गायकवाड यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात बाळाला गेल्या १० ते १२ दिवसांपासून आईचा स्पर्शही मिळालेला नाही. आई रुग्णालयात उपचार घेत असल्याने चिमुकली आईच्या दुधापासूनही वंचित राहिली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न
शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात ग्लोज आणि टिश्यू पेपर राहणे आणि त्यानंतर गंभीर संसर्ग होऊन जीवाला धोका निर्माण होणे, हा प्रकार बीड जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील शस्त्रक्रियेदरम्यान साहित्याची मोजदाद, रुग्णाची तपासणी आणि ऑपरेशननंतरची वैद्यकीय देखरेख याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एका तरुण आईचा जीव धोक्यात आल्यानंतरही प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात अशा प्रकारांना आळा कसा बसणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वैद्यकीय आणि प्रशासकीय चौकशी होणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

