कुणाला मुद्दाम अडकवणे हेतू नाही, पण गुन्ह्यात सहभाग असल्यास, सुटला नाही पाहिजे – धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती
पीडितांच्या कुटुंबियांना धमकावले जात असेल तर पोलिस काय करतात? मुंडेंचा संताप
केज — चार दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी हत्याकांडात मृत पावलेल्या स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज टाकळी येथे जाऊन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवायला गेलेल्या विकासाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुटुंबियांना विलासच्या मृतदेहासहित तीन दिवस तिष्ठत बसवण्यात आले, हे क्लेशदायक आणि संतापजनक असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्यावर आणि त्यांच्या तपासावर घुले कुटुंबीय समाधानी नाहीत. पीडित उमेश माने व विलासच्या कुटुंबियांना देखील धमकावले जात असून वेगवेगळ्या केसेस मध्ये गुंतवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. याबाबत पोलिसांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून, असे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
एकूण तपासात पोलिस यंत्रणेमार्फत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? जाती – पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास केला जाईल का? याबाबत शंका असून आवश्यकतेनुसार मी पुन्हा याबाबत सभागृहात बोलेन, असेही मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कुणाला मुद्दाम अमुक गुन्ह्यात अडकवा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. मात्र सर्व साक्षीदार, वस्तुस्थिती, डंप डेटा अशा सगळ्या गोष्टी तपासून योग्य तपास व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये पोलिस यंत्रणा कमी पडल्या तर घुले आणि माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
इतका संताप का?
जाती जातीचे राजकारण सोडून न्यायाच्या लढाईत आपण आपल्या एका बांधवासाठी सहभागी होतोय. उमेश मानेला वाचवायला गेलेल्या विलासचा खून झाला. यात जातीचे राजकारण कुठून आले? आम्ही न्यायासाठी लढायचे नाही का? फक्त तुम्हालाच न्याय हवा इतर लोकांनी न्याय मागायचा नाही का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
माध्यमांमधील काहीजणांचा आततायीपणा थांबवा
अशी एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला ती गुन्हेगारी प्रवृत्ती जबाबदार असते, मात्र त्याआडून संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. तशा आशयाच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्याचे प्रकार काही दिवसांपासून काही ठराविक लोकांनी केले. मात्र गुन्ह्याकडे गुन्हा, गुन्हेगारीकडे वृत्ती म्हणून बघितले पाहिजे, जातींना दूषणे देण्यापेक्षा गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे परखड मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.




