Monday, February 2, 2026

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण: संशयीताला कोर्टात का आणले नाही, जनता आक्रमक

मालेगाव — डोंगराळे येथील साडेतीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या घटनेचे गुरुवारी न्यायालय परिसरात तीव्र पडसाद उमटले. संशयीताची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.मात्र, न्यायालय परिसरात संतप्त महिला व तरुणांचा मोठा जमाव जमला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला आताच फाशी द्या, असा हेका धरत हा जमाव आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. जवळपास दोन-अडीच तास हा आक्रोश सुरू होता.

रविवारी रात्री चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रवींद्र खैरनार (२४) या संशयीताला तात्काळ अटक केली. यानंतर न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने दुपारी अडीच वाजेनंतर त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.

खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी संतप्त महिला व तरुणांची न्यायालय आवारात मोठी गर्दी उसळली. जमावाचा संताप बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशी शक्यता गृहीत धरत पोलिसांनी संशयीताला न्यायालयात आणणे टाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वेळ टळून गेल्यावरही संशयीताला न्यायालयात आणले जात नसल्याचे बघून जमाव आणखी आक्रमक झाला. त्यानंतर महिला पुरुषांनी न्यायालय आवारात ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली.

काही वेळानंतर संतप्त महिला व तरुणांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. नंतर मोसम पुलाजवळ जाऊन काही काळ तेथील वाहतूक रोखून धरली. लोकांचा हे रौद्ररूप बघता संशयीताला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर केले गेले. संशयीताने हत्येसाठी वापरलेले हत्यार काढून दिले नाही, गुन्ह्याचा सूक्ष्म तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय सोनवणे यांनी न्यायालयात केला. त्यानुसार न्यायालयाने सात दिवसांकरिता त्याची पोलीस कोठडी वाढवली आहे.

या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध नोंदविला जात आहे. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचा रेटा वाढला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी यापूर्वीच निर्देश दिले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गावी भेट देऊन मृत चिमुकलीच्या पालकांचे सांत्वन केले. तसेच मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. त्यानंतर गेल्या दोन दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राम भदाणे, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी डोंगराळे गावी भेट देऊन मृत चिमुकली व गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुवारी सायंकाळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डोंगराळे येथे भेट दिली. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा द्या तसेच या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles