बीड — जिल्ह्यातील विविध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सुरू केलेल्या समांतर तपासात मोठे यश मिळाले आहे. चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल चोरी प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात आला आहे.

चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 167/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या तसेच गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चकलांबा रोडवरील महार टाकळी परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये
कार्तिक विरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) आणि हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असून, इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना चकलांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा रजि. नं. 153/2026 कलम 331(4) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल घरफोडी प्रकरणाचाही स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला.
तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेला सुमारे 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,जोगदंड,पठाण, गित्ते, घोडके व मराडे यांनी केलेली आहे तसेच चकलांबा येथील कारवाई पोउपनि श्रीराम खटावकर, पोउपनि शेखर औटे, राहुल शिंदे, आनंद मस्के, बबन सलगर, अशफाक सय्यद, अश्विनकुमार सुरवसे, सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.

