आष्टी — नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ करणारा कृत्रिम दूध निर्मितीचा धंदा आष्टी तालुक्यात पुन्हा बिनधास्त सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने या धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धाकानंतर काही काळ कृत्रिम दूध आणि भेसळीच्या धंद्याला काही प्रमाणात लगाम बसल्याचे चित्र होते. मात्र त्यानंतर FDA च्या कारवाईतील शिथिलतेचा फायदा घेत भेसळखोरांनी पुन्हा डोके वर काढल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय राहते आणि अखेर पोलिसांना कारवाई करावी लागते, ही बाब अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
पोलिसांच्या धडक कारवाईने भेसळखोरांचा पर्दाफाश
आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्ससमोर पोलिसांनी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम.एच — 13 सीयू — 4141 अडवून तपासणी केली. वाहनामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडरच्या 47 गोण्या आढळून आल्या.
चालकाची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वी आणखी 25 गोण्या आष्टीतील हर्षद हॉटेलसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये उतरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणीही कारवाई केली.
दोन्ही ठिकाणांहून एकूण 72 गोण्या भेसळयुक्त पावडर आणि बोलेरो पिकअप असा 2 लाख 69 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एफ डी ए च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांची वाहतूक तालुक्यात सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाच्या यंत्रणेला याचा थांगपत्ता कसा लागला नाही? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.
दूध हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थ असताना भेसळखोरांवर नियमित छापे, नमुना तपासणी आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पावडर सापडते, यामुळे FDA च्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भेसळखोरांना कारवाईची भीती राहिली नाही, तर त्यामागे केवळ प्रशासनाची उदासीनता आहे की भेसळखोर आणि संबंधित अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळे कारवाईला जाणीवपूर्वक ब्रेक लावला जात आहे, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
तिघांवर गुन्हा; एकाला अटक
या प्रकरणी वाहनचालक सुशांत उर्फ बाबु लक्ष्मण गोपाळघरे (वय 20, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), मालाचे मालक हरीदास एकनाथ गोपाळघरे आणि माल स्वीकारणारा कैलास हंबर्डे (रा. आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबु गोपाळघरे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.
पोलिसांनी धाड टाकली; आता FDA वर कारवाईची वेळ
आष्टीतील या कारवाईने केवळ भेसळयुक्त पावडरचा साठा उघड केलेला नाही, तर दूध भेसळीच्या संपूर्ण साखळीवरच प्रकाश टाकला आहे. पावडर कुठून आली, कोणासाठी आणली होती, तिचा वापर कुठे आणि किती दिवसांपासून होत होता, या सर्व बाबींचा तपास होणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर FDA च्या स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका, यापूर्वी झालेल्या कारवाया, केलेल्या तपासण्या आणि भेसळखोरांविरोधातील नोंदी यांचीही चौकशी झाली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणात कारवाई करणाऱ्यांपेक्षा कारवाई न करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस निरिक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक नाना सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. वाघमोडे, पो ह. तागड, जगताप, वाणी, सजगणे व गुजर यांनी केली असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




