Home Blog Page 9

9 वर्षीय बालिकेच्या खाजगी भागाची पूजा करून 83 वर्षीय नराधमाचा अत्याचार; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार

0

बीड — शाळेत जात असताना मैत्रिणीला भेटायला गेलेल्या 9 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अघोरी पूजा केली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 83 वर्षीय नराधमाचा जामीन केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका वाडीमध्ये ही धक्कादायक घटना 28 जानेवारी 2026 रोजी घडली होती. बाबुराव केरबा निरडे (वय 83 वर्ष) याने शाळेत जाताना मैत्रिणीला भेटायला गेलेल्या नऊ वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावले. सुरुवातीला तिला हात-पाय दाबायला लावून नंतर तिचे कपडे काढले. त्यानंतर आरोपीने पीडित बालिकेच्या खासगी भागाला हळद-कुंकू लावून, अंगावरून लिंबू फिरवले आणि तोंडातून मंत्रोच्चार करत किळसवाणी ‘अघोरी पूजा’ केली. तेवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अमानवीय प्रकारामुळे खळबळ माजली होती.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार (भारतीय न्याय संहिता/आयपीसी) पोक्सो कायदा, जादुटोणा विरोधी कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे .त्याने जामिनासाठी केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान जामीन अर्जावर सुनावणी करताना माननीय सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत. “आरोपीने केलेले कृत्य हे केवळ अत्याचार नसून समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत नेणारे आणि अत्यंत घृणास्पद आहे,” असे नमूद करत 26 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. आर. बी. बिरंगळ यांनी प्रभावी युक्तिवाद केला, त्यांना सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. डी. बी. इंगळे यांनी सहकार्य केले.

“झटका” मशीनचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

0

गेवराई — वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बसवलेल्या झटका मशीनचा शॉक लागून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मानमोडी येथे घडली.

सुधाकर रावसाहेब जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.मानमोडी येथील रहिवासी असलेले सुधाकर जाधव यांच्या मालकीची शेतजमीन गावालगत आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा व भुईमूग ही पिके उभी आहेत. वन्य प्राण्यांपासून विशेषतः रानडुक्कर व हरीण – पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेतात झटका मशीन बसवले होते.रविवारी सकाळी जाधव हे शेतात गेले असता तोल जाऊन झटका मशीनला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, दुपारी चार वाजता गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातू व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे मानमोडी परिसरात शोककळा पसरली असून शेतकऱ्यांनी अशा विद्युत यंत्रणांचा वापर करताना योग्य सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अंबाजोगाईत 14 लाखाचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

अंबाजोगाई — अंबाजोगाई येथे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या संयुक्त पथकाने सुमारे १३ लाख ७० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

   सटवाजीनगर परिसरातील ड्रिमसिटी येथे २८ फेब्रुवारी रोजी चारचाकी वाहनातून अवैधरित्या गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन थांबवले. सिमेंट रस्त्यावर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यात दोन निळ्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये ओलसर, उग्र वास येणारा दाबलेला गांजा सापडला. गांजाचे वजन अंदाजे २८ किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनासह गांजा जप्त केल्यामुळे एकूण १३ लाख ७० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या प्रकरणी पुढील व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीम राम तरकसे (वय २७, रा. आडस, ता. केज, जि. बीड), प्रतिक भगवान पाटोळे (रा. आसरडोह, ता. धारूर, जि. बीड), अजय पाटोळे (रा. आसरडोह, ता. धारूर, जि. बीड), अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव), पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम २० व ८ (सी) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद जोगदंड,पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, शिंदे आणि इतर अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत.आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

अधिवेशनात अमृत योजना आणि जलजीवन योजनेचा मुद्दा आ. क्षीरसागरांनी मांडला

0
बीड — बीड शहराच्या अमृत अटल योजनेचा आणि ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचा अर्थातच शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मुलभूत असलेला प्रश्न आ.संदिप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.27) रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. बीड शहर आणि ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे. बीड शहरातील अमृत अटल योजना सुरू करण्यासाठी थकलेले लाईट बील आणि ग्रामीण भागात जलजीवन मिशनची निधी अभावी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या अर्थसंकल्पात सदरील बाबींसाठी आर्थिक तरतूद व्हावी अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी सभागृहात केली.
                 बीड शहराला गरजेनुसार पाणी पुरवठा व्हावा या करीता तब्बल 125 कोटी रूपयांची अमृत अटल पाणी पुरवठा योजना मंजुर होऊन त्याचे काम देखील पुर्ण झालेले आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे असलेली वीज बीलाची थकबाकी आणि त्या थकबाकी वरील प्रचंड झालेले व्याज नगरपालिका भरू शकत नसल्याने नविन पाणी पुरवठा योजनेला वीज कनेक्शन दिले जात नाही. त्यामुळे बीड शहराला जुन्या योजनेतून पाणी पुरवठा होतो. हा होणारा पाणी पुरवठा बीड शहराची लोकसंख्या आणि गरज यांच्या तुलनेत अतिशय अपुरा आहे. त्यामुळे बीड शहरात 08 ते 10 दिवसातून एकदा पाणी येते. बीड शहराला ज्या जलस्त्रोतांमधून पाणी पुरवठा होतो त्या, माजलगाव बॅकवॉटर आणि बिंदुसरा प्रकल्पात मुबलक पाणी असताना देखील केवळ थकलेले वीज बील आणि त्यामुळे मिळत नसलेले वीज कनेक्श्न यांच्यामुळे बीड शहराला पाणी उपलब्ध असून देखील पाणी मिळत नाही. हि बाब लक्षात घेवून या अर्थसंकल्पात बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या करीता वीज बीलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्याकरीता आर्थिक तरतुद करण्यात यावी अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी अधिवेशनात शासनाकडे केली.
                  तसेच, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी असलेली योजना म्हणजे जलजीवन मिशनची कामे मागील अनेक काळापासुन निधीच्या अभावामुळे रखडलेली आहेत. जलजीवन मिशन ही योजना ग्रामीण भागातील सर्व घरांना वैयक्तिक घरगुती नळजोडणीव्दारे सुरक्षीत आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्याची एक सुंदर संकल्पना आहे. परंतु निधी न मिळाल्यामुळे हि योजना रखडत पडलेली आहे. सदरील योजनेला निधी उपलब्ध करून न दिल्यास या योजनेवर आत्तापर्यंत झालेला शासनाचा खर्च देखील व्यर्थ जाईल. हि बाब लक्षात आणून देत आ.क्षीरसागर यांनी जलजीवन मिशन योजने करीता निधीची स्वतंत्र तरतुद करण्याची मागणी केली.

केजच्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू

0

केज — नांदूर घाट येथील मूकबधिर विद्यालयातील शिक्षकाच्या मोटार सायकल ची ट्रॅक्टर ट्रॉली चा अपघात झाला यामध्ये शिक्षकाचा मृत्यु झाला आहे.

केज शहरातील रहिवासी खमरोद्दिन सदरोद्दीन फारुखी वय 38 वर्ष हे तालुक्यातील नांदूर घाट येथील मूकबधिर शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. मात्र शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शाळेतून केजकडे येत असताना केज-बीड रोडवरील बरड फाट्या जवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची ही घटना घडल्यानंतर त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यु झाला.

एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाखाचा गुटखा जप्त

0

बीड — पेठ बीड भागातील चांदणे वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास छापा मारून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कारवायांचा सपाटा सुरू असला तरी तो प्रयत्न एकाकी पडत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना ठाणे प्रमुखांकडून आश्रय मिळत असल्यामुळे राजरोस धंदे सुरू आहेत. शनिवारी सकाळी बीड शहरातील पेठ बीड भागातील चांदणे वस्तीत फेरोज दस्तगीर तांबोळी रा. चांदणे वस्ती ता. जि.बीड याने स्वतःच्या फायद्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये व घरामध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच या ठिकाणी कारवाई केली. यावेळी तीन लाख 59 हजार 358 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस कारवाई दरम्यान आरोपी फेरोज तांबोळी हा पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळून गेला असून याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचेपो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पो.ह.राहुल शिंदे, युनूस बागवान, गोविंद राख, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे यांनी केली.

डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी पकडली

0

बीड — सोने विक्री करण्यासाठी मोटार सायकल वरून जात असलेल्या सोनारास होळ ते डिघोळ आंबा रोडवरील दर्ग्याजवळ मोटार सायकल वर येऊन दोघा जणांनी अडवले. सोनाराच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण केली व सोने ठेवलेली पिशवी घेऊन गेलेल्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.
सोनार सोने विक्री करण्यासाठी जुन्या डिघोळअंबा रोडने मोटार सायकलवर बसुन जात असताना होळ ते डिघोळअंबा येथील दर्गाजवळ अज्ञात दोन मोटार सायकलवर चार जनांनी येवुन सोनाराला अडवले. सोनाराच्या डोळ्यात तिखट चटणी टाकुन व त्यास चाकुचा धाक दाखवुन मारहाण करत हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेतील अज्ञात आरोपीचा शोध पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत होते परंतु आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता,या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना एकुण जवळपास 50 पेक्षा जास्त सिसिटिव्ही फुटेज तपासण्यात आले होते. सिसिटिव्ही फुटेज मधील संशयीत ईसमांची माहीती घेणे सुरु असताना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सिसिटिव्ही फुटेज मधील संशयीत व्यक्ती रोहीत रंजीत धिमधिमे हा असुन तो अंबाजोगाई बसस्थानक लगत राज मेडीकल जवळ उभा आहे. पोलिसांनी त्यास तात्काळ ताब्यात घेतले. विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा सुदाम गणपत सोनवणे, रा डिघोळअंबा ता.धारुर व पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार वीरसिंग रिसपालसिंग टाक, रा, अंबाजोगाई, यांचे सांगण्यावरुन त्याचे साथीदार अभिषेक अशोक घाटुळ रा कन्हेवाडी ता. परळी,कानिफनाथ विलास डुरकर, रा क्रांती नगर अंबाजोगाई, यशोदिप कल्याण किर्दन, रा सातेफळ, ता. अंबाजोगाई याना सोबत घेऊन केला असल्याचे सांगीतले.
या गुन्हयात एकुण सहा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या एक लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल, नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल व जबरदस्तीने चोरुन नेलेले तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागीने असा एकुण पाच लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहा आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस ठाणे युसुफ वडगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गिते, मारुती कांबळे, दिपक खांडेकर, गणेश मराडे, विकी सुरवसे यांनी मिळुन केली आहे.

सर्वांसमोर सर्व काही…’ वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मीक कराडने जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र बीड जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि आता सर्वोच्च न्यायालयातही कराडला दिलासा मिळू शकला नाही. यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार…”, अशी फेसबुक पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात कराडवर लावण्यात आलेल्या मकोकावर चर्चा झाली. मकोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला, असा युक्तीवादही कराडच्या वकिलांनी केला. मात्र कराडच्या सुटकेसाठी हाच मकोका महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला असल्याचे दिसत आहे.
काल जामीन फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडचा मोठा मुलगा सुशिल वाल्मिक कराड याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार…”, अशी पोस्ट सुशीलने आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिल्यामुळे या प्रकरणाची चर्चा बीड जिल्ह्यात रंगली आहे. ही पोस्ट स्वतः सुशील कराडने केलीय की, या अकाउंटवरून दुसरे कुणी केली आहे हे सांगणं अवघड आहे ही पोस्ट सुशील कराडनेच केली असेल तर त्याला नेमके काय सांगायचे आहे? याचीही चर्चा होत आहे. सुशील कराडला नेमके काय बाहेर काढायचे आहे? याचा कयास बांधला जात आहे. याच पोस्टवर अनेकांनी कराड परिवाराच्या समर्थनार्थ कमेंट केल्या असून, काहींनी तर थेट परळीतील मोठ्या नेत्याचे नाव घेत त्यांच्याकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे सुशील कराड विरोधकांवर बोलणार की त्यांच्यातीलच काही अंतर्गत गोष्टी बाहेर काढणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत
सुशील कराडवरही मारहाण करणे, धमकावणे, आर्थिक गैरव्यवहार असे आरोप करण्यात आले आहेत. महादेव मुंडे प्रकरणातही कराडच्या मुलांची नावे घेतली गेली होती.याआधी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनीही “भानगडी बाहेर काढणार, माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतला, निवडणुकीत वापर केला” असे म्हणत काही गोष्टी बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. तेव्हाही त्या काही अंतर्गत गोष्टी बाहेर काढतात का? अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर विशेष असे काही त्या बोलल्या नाहीत. आता मात्र वाल्मिक कराडचा अर्ज थेट सर्वोच्च न्यायालयानेच फेटाळल्याने कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यात त्याच्या मुलानेच अशी पोस्ट केल्याने मोठा काहीतरी गौप्यस्फोट होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

मनपा, न.प.प्रमाणेच जिल्हा परिषद पंचायत समितीतही स्वीकृत सदस्यांची एंट्री होणार!

0

मुंबई — राज्यातील जि.प प.स निवडणुका होताच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10 टक्के तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20 टक्के सदस्य निवडता येतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार किमान 5 सदस्य निवडणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात लवकरच विधिमंडळात कायदा पारीत केला जाणार आहे.
जि.प‌ आणि पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामीण भागात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल,या उद्देशाने महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई केली आहे. राज्यात आता 22 जिल्हा परिषदा आणि त्यांअतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयानं उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास मनाई केली आहे.

वकिलास मारहाण; आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी

0

बीड — जिल्हा न्यायालय परिसरात ऍड. राम डोंगरे यांना मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपी राधाकिसन करपे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राधाकिसन करपे याने काही महिलांना सोबत घेऊन येत एड. राम डोंगरे यांना मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. मात्र आरोपीचे पोलिसांशी असलेले हितसंबंधाच्या कारणावरून गुन्हा नोंद करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणात वकील संघाने एकजूट दाखवत न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर करून न्यायालयाच्या पायऱ्यावर बसून बुधवारी आंदोलन केले. त्यानंत मोर्चा शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील तक्रार करण्यात आली. सगळीकडून दबाव वाढल्यानंतर पोलीस यंत्रणा तळ्यावर आली 27 तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राधाकिसन करपे याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे आजही वकील संघाने न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नव्हता दरम्यान पाच वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वकिलांना तक्रार द्यायला गेले असताना तुमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलिसांनी एड. राम डोंगरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाच तर पुन्हा अनिश्चित काळासाठी वकील संघ काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा वकील संघाने दिला आहे.