Home Blog Page 7

गेवराई बाजार समितीकडून  कांदा मार्केटचा भव्य शुभारंभ

0

कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराई — गेवराईसह बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावत वाढलेले आहेत व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, वेळेत पैसे मिळावे व फसवणुक होऊ नये या दृष्टीकोनातून बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गेवराई येथे कांदा मार्केट सुरु केलेले आहे. अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा योग्य पध्दतीने लिलाव व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यांची फसवणुक होवू नये यासाठी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आणावा असे प्रतिपादन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई बाजार समितीकडून गेवराई शहरात कांदा माकेटचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

गेवराई बाजार समितीमध्ये नवीन फळे व भाजीपाला मार्केट यार्ड आणि भव्य कांदा लिलावाचा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासहेब मोटे, खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष गणपत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवाजीराव मोटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, गेवराई बाजार समितीने कायम शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. कोल्ड स्टोरेज झाल्यानंतर याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांच्या मालाला अधिकचा भाव मिळेल, नवीन मार्केट यार्ड येथे शेतकरी भवन बांधल्यानंतर शेतकरी मेळावा, मार्गदर्शन शिबीरे, आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन अशा प्रकारचे शेतकरी हिताचे आणि समजोपयोगी उपक्रम बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येतील. अलिकडच्या काळात गेवराई तालुक्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झालेले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी गेवराई बाजार समिती कटिबध्द राहील. यावर्षी बाजार समितीच्या माध्यमातून कांदा लिलावाचा पहिला प्रयोग केलेला आहे तो शंभर टक्के यशस्वी करू, शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा, त्यांची फसवणुक होऊ नये म्हणून हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत जास्तीत जास्त प्रमाणात आणावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

याप्रसंगी जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, किसान सेलचे सुनिल पाटील, गजानन काळे, नंदकिशोर गोर्डे, गेवराई न.प.गटनेते शेख खाजामामू, शाहरूख पठाण, शांतीलाल पिसाळ, चंद्रकांत पंडित, बाबूराव काकडे, बप्पासाहेब घाटूळ यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, रामभाऊ चाळक, कृष्णा राऊत, हनुमान कोकणे, बाबुराव जाधव, रमेश साखरे, जगन्नाथ शिंदे, सुभाषराव मस्के, शिवाजी मोटे, दिनकर काळे, पांडुरंग कोळेकर, अशोक लांडे, शंकर पवार, शंकर तौर, संभाजीराव पवळ, साळीकराव चव्हाण, खालेद कुरेशी, श्रीराम आरगडे, अण्णा गव्हारे, विकास सानप, बिपीन डरपे, बळीराम साबळे, गोकुळ चोरमले, शरद आष्टेकर, बाळकृष्ण सोनकांबळे, कांदा उत्पादक शेतकरी नारायण राऊत, लहूराव राऊत, रावसाहेब कापले, विकास आगलावे, जालिंदर कोळेकर, सतिष कदम, हनुमान दिवे, अशोक शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेव मुंडे खून तपास प्रकरणी खोटी माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई – पोलिसांचा इशारा

0
खोटे आरोप करणाऱ्या राजाभाऊ फड यांच्यावर कारवाई होणार?

बीड — जिल्ह्यातील परळी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या आणि संपूर्ण राज्यभर गाजलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडच्या विशेष तपास पथकाने (SIT) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

सदर प्रकरणातील तपास, विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल व इतर तपासाशी संबंधित माहिती ही अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून ती कुठेही प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यात आलेली नाही, तसेच ती प्रसारमाध्यमे किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परळी शहरातील शरदचंद्र पवार गटाचे राजाभाऊ फड या कार्यकर्त्याने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडे खून प्रकरणात काही लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप केले होते. हे आरोप करताना ब्रेन मॅपिंग व लाई डिटेक्टर चाचणीतून पुढे आलेली माहिती आपल्याला समजली असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र आता स्वतः पोलिसांनीच प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकरणात स्पष्ट खुलासा केल्याने अशा प्रकारची माहिती अधिकृतपणे कोणालाही देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खोटी माहिती देऊन अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे परळी शहर, जि. बीड येथे गुन्हा क्र. 191/2023, भा.दं.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (SIT), बीड यांच्या मार्फत सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयित इसमांच्या पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर), BEOS / ब्रेन मॅपिंग तसेच व्हॉईस अॅनालिसिस अशा मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, प्रसारमाध्यमांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अलीकडे या प्रकरणाबाबत विविध माध्यमांतून तसेच सोशल मीडियावरून अप्रमाणित माहिती व अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणीही खोटी माहिती प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक, बीड यांच्यामार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नवरी अल्पवयीन, सासरचा त्रास; पाॅक्सोसह बालविवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल

0

बीड — सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याने या बाबतची तक्रार मुलीने पोलीस ठाण्यात दिली पण मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी पती विरोधात पोक्सो व बालविवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदरील ही घटना बर्दापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

एका अल्पवयीन मुलीचे सहा महिन्यापुर्वी गोविंद नागनाथ चाटे वय २४ वर्ष रा. खापर टोण ता. अंबाजोगाई यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरची मंडळी मुलीचा छळ करू लागले. या छळाची तक्रार मुलीने बर्दापुर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर सदरील मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समोर आले आज स्थितीत मुलीचे वय १७ वर्षे ६ महिने आहे. कमी वय असतांना मुलीसोबत लग्न केल्याने तिचा पती गोविंद चाटे याच्या विरोधात पोक्सो आणि बालविवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्याच बरोबर मुलाच्या आई वडीलांवर देखिल कारवाई करण्यात आली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

गेवराई मतदार संघातील विकास कामांना ७२ कोटी रु. चा निधी मंजुर

0
आ. विजयसिंह पंडित यांनी मानले महायुती सरकारचे आभार
गेवराई — यंदाच्या अर्थसंकल्पात गेवराई विधानसभा मतदार संघातील ७२ कोटी १६ लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांना निधीची तरतुद झाली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विधानसभा निवडणुक दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे. रस्ते, इमारत बांधकाम यांसह सिंचन विषयक कामांचा यामध्ये समावेश आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, संबंधित विभागांचे मंत्री आणि महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना मंजुरीसह निधीची उपलब्धता व्हावी यासाठी आ. विजयसिंह पंडित सातत्याने प्रयत्नशील आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यंदाच्या अर्थसंकल्पात गेवराई विधानसभा मतदार संघातील ७२ कोटी १६ लक्ष रुपये किंमतीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सिंदफणा नदीवरील टाकळगाव बॅरेज बांधकामासाठी १९.६६ कोटी रुपये, गेवराई शहरातील न्यायालयीन इमारतीवर पहिल्या मजल्यासह ४ कोर्ट रुम बांधकामासाठी १० कोटी रुपये, घोसापूरी, ता.बीड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय बांधकामासाठी १२.५१ कोटी रुपये, नाबार्ड अंतर्गत सिरसदेवी ते काजळ्याचीवाडी रस्त्यावरील पुलाचे बांधकामासाठी १.९७ कोटी रुपये, लिंबारुई ते पाटेगाव रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी ९९ लक्ष रुपये, भाटसांगवी-बऱ्हाणपूर ते वाकनाथपूर रस्त्यावर व्हेंटेड कॉजवे बांधकाम करण्यासाठी २ कोटी रुपये यांसह मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची प्रतिक्रिया देऊन गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी निधीच्या उपलब्धते बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, संबंधित विभागांचे मंत्री आणि महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहे. या निधीतील मंजुर कामे अतिशय दर्जेदार करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदार संघातील उर्वरित कामांनाही मंजुरीसह निधीच्या उपलब्धते बाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

भारतातल्या “या” राज्यात तिसरं अपत्य जन्मलं तर मिळणार 85 हजार !

0

अमरावती — जपान चीन सारख्या देशांमध्ये मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात पण भारतातही याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी विधानसभेत बोलताना दिली. राज्यात जन्मदर कमी होत आहे. जर पुढील काही वर्ष अशीच स्थिती राहिली तर राज्यात तरुणांची संख्या कमी होईल, परिणामी क्रयशक्ती कमी होईल.ही समस्या लक्षात घेऊन आता सरकार नवीन लोकसंख्या धोरण आणण्याची तयारी करत आहे. या धोरणांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर आर्थिक मदतीची योजना सरकार आणणार असल्याचं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. दक्षिण भारतामधील अनेक राज्य अशी आहेत ज्या राज्यांमध्ये मुलांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे, यामुळेच आता अनेक राज्य ही लोकसंख्या कमी करण्याऐवजी लोकसंख्येचं प्रमाण संतुलीत कसं राहील याकडे सध्या लक्ष देत आहेत. याच धोरणाचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे. तिसरं आपत्य जन्माला आलं तर सरकारकडून 25000 रुपयांची मदत मिळणार आहे.

तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर मिळणार 25 हजार

आंध्र प्रदेश सरकार नवं धोरण आणण्याच्या तयारीमध्ये आहे. या नव्या लोकसंख्या धोरणानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावेळी सरकारकडून 25 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच तिसऱ्या मुलाचा जन्म झाला तर त्याला सरकारच्या वतीनं अतिरिक्त सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार तिसऱ्या अपत्याला पहिले पाच वर्ष दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच 18 वर्षांपर्यंत त्याला मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. जर आर्थिक मदत मिळाली तर लोक तिसऱ्या मुलाला जन्म देतील असं येथील सरकारला वाटत आहे. याचाच अर्थ आंध्र प्रदेशमध्ये जर आता तिसरं आपत्य जन्माला घातलं तर एकूण 85 हजारापर्यंतची मदत सरकारकडून मिळणार आहे.

एक एप्रिलपासून नवी योजना लागू करणार

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश सरकार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेला अंतिम रूप देणार असून, येत्या एक एप्रिलपासून राज्यभरात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे लोकसंख्या वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

मनोज जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; बीडची पोद्दार शाळा पुन्हा आरटीई प्रवेशासाठी खुली

0

बीड —  अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि नंतर तो निर्णय रद्द झालेल्या राज्यातील ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्याची मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शाळांचा आरटीई पोर्टलवर पुनःसमावेश करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये बीड येथील पोद्दार शाळेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही शाळा आरटीई प्रवेशासाठी पुन्हा उपलब्ध झाली आहे.

मनोज जाधव यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, शिक्षण मंत्री तसेच प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा मांडला होता. या मागणीची दखल घेत शिक्षण संचालकांनी दि. ४ मार्च रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्याबाबत आदेश जारी केले.

दरम्यान, अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ७५ शाळांची नावे आरटीई पोर्टलवरून वगळण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातील पोद्दार शाळेचाही समावेश होता.यामुळे या शाळेत आरटीईमार्फत आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक पालकांना अर्ज प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे प्रवेशप्रक्रियेत नुकसान होत असल्याची बाब मनोज जाधव यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि या शाळेचा आरटीई पोर्टल वर समावेश करण्याची मागणी केली होती.

ज्या तत्परतेने शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देऊन त्यांची नावे आरटीई पोर्टलवरून वगळण्यात आली, त्याचप्रमाणे निर्णय रद्द झाल्यानंतर त्या शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. शासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला असून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता राज्यातील संबंधित शाळांचा आरटीई पोर्टलवर पुन्हा समावेश झाला असून बीड येथील पोद्दार शाळा देखील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली.
त्याच बरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, शिक्षण मंत्री तसेच प्राथमिक शिक्षण संचालक यांचे त्यांनी या निर्णया संदर्भात आभार मानले आहेत.

आनंदाची बातमी! सरकारने केली शेतकरी कर्जमाफीची घोषणा

0

मुंबई —   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.केवळ शेतकरीच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतमजुरांसाठीही सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.

कर्जमाफीचा लाभ कोणाला आणि कधी?

या योजनेचा मुख्य रोख अशा शेतकऱ्यांवर आहे ज्यांचे पीक कर्ज नैसर्गिक संकटामुळे किंवा इतर कारणांमुळे थकीत राहिले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल. दरम्यान, या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना नवसंजीवनी मिळणार आहे.

शेतमजुरांसाठी ऐतिहासिक निर्णय

या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’. आतापर्यंत या योजनेचा लाभ केवळ खातेदार शेतकऱ्यांना मिळत असे. मात्र, आता शेतमजुरांनाही याचा लाभ घेता येणार आहे. शेतात काम करताना होणारे अपघात किंवा दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास आता शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक संरक्षण मिळेल.

500 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

केवळ कर्जमाफीवर न थांबता, सरकारने शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दीर्घकालीन आखणी केली आहे:

  • कृषी जीडीपी: सध्याचा 55 अब्ज डॉलरचा कृषी जीडीपी 2047 पर्यंत 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • मूल्यसाखळी: कापूस, सोयाबीन आणि कांदा यांसारख्या 10 ते 15 प्रमुख पिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘व्हॅल्यू चेन’ उभारली जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळेल.
  • डिजिटल क्रांती: महाडीबीटी (MahaDBT) आणि महावेध यांसारख्या प्लॅटफॉर्मला एकत्र जोडून एकच ‘डिजिटल परिसंस्था’ तयार केली जाईल. यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबेल.

शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि कर्जमाफीच्या पुढील अर्जा प्रक्रियेसाठी स्थानिक सेवा केंद्र किंवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर लक्ष ठेवावे.

जि.प तील अतिरिक्त कारभारातले सूत्रधार बडे; खुर्चीला चिटकून पडले हे किडे

0

बीड — शासन निर्णयापेक्षा आपणच मोठे, जिल्हा परिषद बापाचीच जहागिरी पाहिजे त्या टेबलवर बसायची आपलीच मक्तेदारी, एकाच खुर्चीवर बसून बुडाला घटे पडायची वेळ आली तरी हातातली सूत्र सोडायची नाहीत असा जणू जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी चंग बांधला आहे की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

 अधिकाऱ्यांशी जवळीकता असली की, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती भेटते हे जिल्हा परिषदेतलं सूत्र सर्वश्रुत आहे. मूळ पदस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो. कारण मूळ पदस्थापनेवर असलेला कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कुठल्याच फायद्याचा नसतो तर प्रतिनियुक्ती वर आलेला कर्मचारी हा अधिकाऱ्यांचा जावई असल्याचा थाटात आपला कारभार हाकतो. मग काय “मेहुणी बायको मिंधा संसार” या म्हणी प्रमाणे मिंधे असलेले अधिकारी देखील मूग गिळून गप्प बसतात पाण्यावर कसं लोणी निघल याकडेच दोघेही लक्ष देतात. आरोग्य विभागात तर काही कर्मचाऱ्यांना हुंड्यात सासर्‍यांने खुर्ची दिली आहे. अशा अविर्भावात खुर्चीला कायम चिकटले आहेत. बाहेरून बदली होऊन आलेली हा राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक कर्मचारी बाहेरून बदलून आला. प्रतिनियुक्ती वर जिल्हा परिषदेत घेतलं गेलं. या कनिष्ठ कर्मचाऱ्याला जी एक खुर्चीवर टेबल दिला तो अंदन दिल्यासारखा प्रकार झाला. कर्मचारी खुर्चीला असा चिकटला की, दहा वर्षांहून अधिक काळ लोटत असला तरी टेबलही बदलला नाही अधिकारही त्याचे बदललेले नाहीत खुर्ची तर फेविकॉल चा मजबूत जोड आहे अशी स्थिती बनलेली आहे. यामध्ये मात्र मूळ पदस्थापनेवरच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर गदा येत आहे पण जि प.तील गाढवाच्या गोंधळात लाथाळी शिवाय दुसरं काय भेटणार न्यायाची, कायद्याची, नियमांची अपेक्षा कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. असाच आणखी एक अतिरिक्त कार्यभारावर कारभार करणारा महाभाग तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणजेच विभाग प्रमुखाच्या कृपाछत्रदृष्टीत मस्तवाल बनला आहे की, त्याला रजेचे बंधन नाही कार्यालयात येण्याचे कार्यालय सोडण्याचे असे कोणतेच बंधन नाही. शिवाय हुकूमशहा असल्याचा थाट माज दाखवणारा आहे. थोडक्यात विभागप्रमुखांनी तो मोकाट सोडल्याचं पाहायला मिळत आहे. हा महाभाग इतका करामती आहे त्याने अपंग असल्याचं बनावट प्रमाणपत्र काढलं. त्याचा कोणता अवयव कामातून गेलता हे त्याच्या जीवाला माहित पण हा धडधडीत कारनामा त्याने केला. अपंगाचे सगळे लाभ देखील पदरात पाडून घेतले. पण दुर्दैव आडवे आले. अपंगाचे लाभ घेतले म्हणून तक्रारी झाल्या गेल्या. मग काय या महाभागाला पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले. जिल्हा परिषदेतच हा तपासणीचा कॅम्प लावण्यात आला होता. मात्र तो गैरहजर राहिला. पदरात पाडून घेतलेला दिव्यांग भत्ता तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर शासनाला परत केला. मग ही शासनाची घोर फसवणूक नव्हती का? हा भ्रष्टाचार नव्हता का? मग एवढं होऊनही “मी आहे तोपर्यंत तुझं कोणीच वाकड करणार नाही. तुला काय करायचं ते कर”असं म्हणत विभाग प्रमुखाने पाठराखण केली. या महाभागाचा कारनामा झाकणाऱ्या या विभाग प्रमुखाची ही हरामखोरी नाही काय? विभागप्रमुखांनी अतिरिक्त कार्यभारावरील कर्मचाऱ्यांचा लाड करण्यामागचं नियोजन काय? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून या बनावट दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती लपवण्याचा कारण काय? यासारखे एक ना अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

मोमीनपुऱ्यातील सय्यद अरहानचा पहिला रोजा पूर्ण 

0

बीड — मोमीनपुरा भागातील सय्यद अरहान सय्यद इरफान यांनी वयाच्या आठव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण करून सय्यद अरहान यांनी सर्वांपर्यंत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

रमजान महिन्यातील या पवित्र उपवासाला लहान मुलाने संयमाने पार पाडले, ज्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक भावुक झाले. सय्यद अरहान यांनी
कमी वयात धार्मिक कर्तव्य पार पडल्याने परिसरभर आनंदाची लहर उसळली असून, सर्वजण त्यांचे जोरदार अभिनंदन करत आहेत.या छोट्या मुलाच्या साध्या पण मोठ्या यशाने रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक एकता व धार्मिक उत्साह दिसून आला. अरहान सारखी उदाहरणे लहान पिढीला प्रेरित करणारी ठरत आहेत.

बीड बस स्टँडच्या मागील बाजूस तरुणाचा मृतदेह आढळला

0

बीड — शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आज सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गांधीनगर भागात राहणाऱ्या नौशाद नावाचा 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. ही घटना बीड बसस्थानकाच्या
पाठीमागून जाणाऱ्या रस्त्यालगत घडली.

मृतदेहाच्या डोक्याला मार लागल्याची खूण नसली तरी नाका कानातून रक्त आल्याने त्याचा खून झाला की आणखी काही हे सांगण अवघड झाल असून घटनेची माहिती मिळताच हे.काॅ.सह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मधूनच मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान संशयास्पद रित्या वर्दळीच्या ठिकाणी मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.